रामनवमीचा उत्सव भारतभरात अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. अवघी अयोध्यानगरी यावेळी प्रभू श्री रामचंद्रांच्या नामाचा गजर करत असते. या उत्सवाचे प्रतिबिंब जागोजागी उमटलेले दिसते. कल्याणमधील ‘सकल हिंदू समाज, कल्याण पूर्व’ आयोजित भव्य ‘श्री रामनवमी शोभायात्रा’ यंदा आपल्या पाचव्या वर्षात पदार्पण करत आहे. रामनवमीला दि. 26 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता कल्याण (पूर्व) येथील दादासाहेब गायकवाड क्रीडांगण ते गुणगोपाळ मंदिर येथे भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. या शोभायात्रेचे नेमके वैशिष्ट्य काय? या शोभायात्रेच्या माध्यमातून लोकांना काय संदेश दिला जातो? यासंदर्भात दै. ‘मुंबई तरुण भारत’सोबत संवाद साधला आहे, ‘श्रीराम नवमी आयोजन समिती, कल्याण पूर्व’चे अध्यक्ष हेमंत दरगोडे तथा ‘हिंदू सेवा संघा’चे उपाध्यक्ष डॉ. विवेक मोडक यांनी.
शोभायात्रा ही गुढीपाडव्यानिमित आपल्याला बघायला मिळते; मात्र कल्याणमध्ये रामनवमीच्या दिवशी शोभायात्रेची कल्पना कशी सूचली?
हेमंत दरगोडे : मागचा काही काळ, काही स्वयंसेवक याविषयी विचाररमंथन करीत होते. स्वतः डॉ. मोडक यांच्यासह अनेक स्वयंसेवक होते. त्यावेळी चर्चेमध्ये असा विचार मांडण्यात आला की कल्याण पूर्वेमध्ये एक असं व्यासपीठ असावं, जे बिगर राजकीय असेल. त्या व्यासपीठासंदर्भात विचार करताना आमच्या समोर विचार आला, तो रामनवमीचा. डोंबिवलीमध्ये ज्या प्रकारे नववर्ष स्वागतयात्रा आहे, त्यापद्धतीने कल्याण पूर्वेमध्ये आपण काहीतरी केले पाहिजे, हा विचार त्यामागे होता. आता या मागचा उद्देश हाच होता की, प्रभू श्रीरामचंद्रांचा एक जरी गुण आम्ही दरवष आमच्या समाजबांधवांना देऊ शकलो, यानिमित्ताने हिंदू समाजाचे संघटन तथा जागरण प्रसारण व्हावे, हा या मागचा हेतू आहे, जो मागच्या चार वर्षांमध्ये यशस्वी झाला आहे.
आपल्या या शोभायात्रेच्या परंपरेबद्दल सांगा. याचं समाज म्हणून हिंदूंसाठी महत्त्व काय?
डॉ. विवेक मोडक : भारतामध्ये रामनवमीनिमित्त ज्या शोभायात्रा निघतात, त्यांना एक इतिहास आहे. कल्याण पूर्वेमध्ये या शोभायात्रा काढण्यामागचा विचार लक्षात घेतला, तर आपल्याला असे दिसून येईल की, कल्याण पूर्वेतील समाज हा ‘कोस्मोपोलिटन’ समाज आहे. वेगवेगळ्या भाषेचे, वेगवेगळ्या प्रांतातून आलेले लोक इथे एकत्र राहतात. या सगळ्यांना हिंदू म्हणून एका सूत्रात आम्हाला बांधायाचे असेल, तर ते प्रभू श्रीरामचंद्रांच्या भक्तीतूनच शक्य आहे. त्यामुळे रामनवमीनिमित्त अशी एक शोभायात्रा काढावी, त्याची जबाबदारी खुद्द नागरिकांनीच घ्यावी, हा यामागचा विचार आहे.
हेमंतजी, आपण मागची इतकी वर्षे याचं सारथ्य करीत आहात. आपला काय अनुभव राहिला आहे?
हेमंत दरगोडे : मी असं मानतो की, हा प्रभू श्रीरामचंद्रांचा आशीर्वाद आहे की, समाजाने मोठ्या मनाने हे सारथ्य माझ्याकडे दिले आहे. 2022 साली ज्यावेळी आम्ही हा विचार केला होता, त्यावेळी अवघ्या चार दिवसांत या शोभायात्रेची तयारी झाली. मात्र, त्या काळातसुद्धा अडीच ते तीन हजार रामभक्त एकत्र आले. त्यावेळी विचार पक्का झाला की, या व्यासपीठाचे एक विस्तृत स्वरूप आपण समाजासमोर आणायचे आहे. अशातच मागच्या वष या शोभायात्रेने उच्चांक गाठला आणि जवळपास 15 हजार रामभक्त या यात्रेच्या निमित्ताने एकत्र आले.
या यात्रेच्या माध्यमातून दरवष मोठ्या प्रमाणात समुदाय एकत्र येतो. अशा वेळी काय विशेष नियोजन केले जाते?
हेमंत दरगोडे : आमची स्वागत समिती ही पूर्णपणे बिगर राजकीय आहे. जी माणसं आमच्या समितीमध्ये आहेत, ती सर्वसामान्य आणि स्वकर्तृत्वावर मोठी झालेली माणसं आहेत. आता सहभागी होणाऱ्या लोकांचा आकडा जर दरवष वाढत असेल, तर अर्थातच काही आव्हानं असतात, काही वेळेला विशेष नियोजन करावे लागते. कल्याण पूर्वेला आम्ही ‘मिनी भारत’ म्हणतो; कारण प्रत्येक राज्यातून, प्रत्येक समाजाचं प्रतिनिधित्व करणारी मंडळी इथे राहतात. या सर्वांची इच्छा असते की प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी मला माझी सेवा अर्पण करू द्यावी. सेवाभाव अर्पण करावा, म्हणून ही चढाओढ लागलेली असते. त्यामुळे त्याचं व्यवस्थापन करणं, सर्वांना यामध्ये संधी मिळत आहे का, हे तपासणं, याचीसुद्धा जबाबदारी आमच्यावर असते.
डॉ. मोडक वैचारिक आणि आजच्या सांस्कृतिक परिप्रेक्षातून या उत्सवाचं नेमकं महत्त्व काय?
डॉ. विवेक मोडक : आपण या शोभायात्रेच्या निमित्ताने प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरित्राकडेच पाहात असतो. आज आपण पर्यावरणाचा विचार करतो, कुटुंब संस्थेसमोरील आव्हानांचा विचार करतो, त्यावेळी प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनाकडे बघताना आपल्याला अनेक प्रश्ननांची उत्तरं सापडतात. समरसतेचा विचार हा सर्वप्रथम श्रीरामांच्या कार्यातून पुढे आला आहे. भारतीय संस्कृतीवर सर्वांत मोठा ठसा जर कुणाचा असेल, तर तो प्रभू श्रीरामचंद्रांचा आहे. आज आपण लोकशाही राज्यामध्ये राहात असलो, तरी अपेक्षा करतो रामराज्याची. महात्मा गांधींनीसुद्धा रामराज्याची कल्पना मांडली आहे. नजीकच्या काळात, पूजनीय सरसंघचालकांनी राष्ट्रीय मंदिराची आणि मनामनातील अयोध्या जागविण्याची आवश्यकता प्रतिपादन केली आहे, तर या मागचा मतितार्थ आपण ओळखला पाहिजे, त्यावर विचार केला पाहिजे.
कल्याणमधील नागरिकांनी या सोहळ्यात सहभागी होताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि या उत्सवातून त्यांनी काय सोबत घेऊन जावे, असे तुम्हाला वाटते?
डॉ. विवेक मोडक : हा उत्सव समाजाला एका सूत्रात बांधणारा उत्सव आहे. त्यामुळे आपले सर्व किंतु-परंतु हे भेद घरी ठेवूनच नव्हे, तर गाडून यायचे आहे. इथून ज्यावेळी आपण घरी जाल, त्यावेळी हा जो उत्साह आहे, जो भक्तिभाव आहे, तोच घरी न्यायचा आहे, इथल्या कार्यकर्त्यांचे जे अनुशासन आहे, ते पाहावं, अंगीकारावं आणि समाजामध्ये आपलं कार्य सुरू ठेवावं.
हेमंत दरगोडे : मी मगाशी म्हणालो तसं, हे एक बिगर राजकीय व्यासपीठ आहे. सर्व पक्षांतील हिंदू धमयांनी एकत्र येऊन गुण्यागोविंदाने या उत्सवामध्ये सहभागी व्हावं. प्रभू श्रीरामचंद्रांनी दिलेला समरसतेचा जो विचार आहे, तो त्यांनी अंगीकारावा. या रामभक्तीला जोड अनुष्ठानाची आहे, ते अनुष्ठान जर तरुणांनी स्वीकारलं, तर निश्चितच अध्यक्ष म्हणून मला त्याचा आनंद आहे.
पाच वर्षांचा टप्पा पूर्ण होत आहे, पुढील पाच वर्षांत या उत्सवाला आणखी व्यापक करण्यासाठी तुमच्या काही विशेष संकल्पना आहेत का?
हेमंत दरगोडे : आजच्या ‘एआय’च्या जगामध्ये आम्ही जाणीवपूर्वक तरुणांना यामध्ये जोडून घेतलेलं आहे. आपलं तरुण रक्त हीच आपली ताकद आहे. हजारो वर्षांचा जो वारसा आपल्यापर्यंत आलेला आहे, तो तरुणांकडे सुपूर्द करण्याचे काम आपण करीत आहोत. मागच्या वष आम्ही ‘राममंदिर ते राष्ट्र मंदिर’ अशी व्याख्यानमाला आयोजित केली होती, अशी व्याख्यानमाला आयोजिक करणे, द्वैमासिकातून नवीन विषय मांडणं, अशा अनेक गोष्टी आमच्या सुरू आहेत. काही तरुणांनी डीजेची मागणी केली होती; मात्र घराघरांत विचारमंथन घडवून आणत डीजेचे दुष्परिणाम काय, हे आम्ही त्यांना पटवून दिलं. प्रभू श्रीरामचंद्रांच्या विचारांचा तरुण या देशामध्ये तयार व्हावा, हा यामागचा उद्देश आहे.