१७२ गावांचा ऐतिहासिक संकल्प; एकतारा गुरुकुलची ‌‘गृह गुरुकुल‌’ चळवळ

25 Mar 2026 13:31:45

पालघर जिल्ह्यातील वाडा येथे एक महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. दि. १९ मार्च रोजी गुढीपाडवा व चैत्र नवरात्रीनिमित्त ‌‘एकतारा गुरुकुल‌’तर्फे आयोजित ‌‘त्रिकर्म उत्सवा‌’दरम्यान १७२ गावांतील १ हजार, ८ कुटुंबांनी ‌‘गृह गुरुकुल‌’ उभारण्याचा सामूहिक संकल्प घेतला. हा उपक्रम देशासाठी नवे सामाजिक मॉडेल म्हणून पुढे येत आहे. या उपक्रमाचा सारांश मांडणारा हा लेख...

"भारतीय संस्कृती ही कुलपरंपरेवर आधारित असून कुलदेवता, कुलगुरू, कुलविद्या, कुलाचार आणि कुलवृत्ती या घटकांचे संरक्षण केल्यास सर्वांगीण विकास साध्य होतो. ‌‘एकतारा गुरुकुल‌’ने उचललेले ‌‘गृह गुरुकुल‌’ पाऊल अत्यंत प्रशंसनीय आहे," असे कुडळी श्रींगेरी शारदा पीठाचे शंकराचार्य श्री श्री अभिनव शंकर भारती यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे सांगितले. त्यांनी हा संदेश पालघर, वाडा येथे ‌‘एकतारा गुरुकुल‌’तर्फे आयोजित ‌‘त्रिकर्म उत्सवा‌’च्या भव्य कार्यक्रमानिमित्त दिला. या उत्सवाला खासदार डॉ. हेमंत सवरा, ज्येष्ठ नेते बाबाजी काठोले, वाडा नगर पंचायत अध्यक्षा रीमा गंधे, ‌‘संस्कार भारती‌’चे अखिल भारतीय कार्यकर्ते संजय गोडसे, ‌‘वाडा इंडस्ट्रियल असोसिएशन‌’चे अध्यक्ष प्रमोद खोसला, ‌‘गोवर्धन इको व्हिलेज‌’चे प्रतिनिधी अभिमन्यु प्रभुजी, तसेच ‌‘एकतारा गुरुकुल‌’चे संचालक आकाश बिस्वास आणि कार्यक्रम व्यवस्थाप्रमुख मिलिंद वाडेकर उपस्थित होते.

यावेळी 172 गावांतील सरपंच, पोलीस पाटील, माध्यम प्रतिनिधी आणि हजारो ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमात खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी ‌‘एकतारा गुरुकुल‌’च्या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात भारतीय परंपरा जपण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. परंपरा, चालीरिती आणि संस्कार हे भारताचे वैशिष्ट्य असून त्यांचे जतन होणे अत्यावश्यक आहे.”

उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरलेले ‌‘गृह गुरुकुल अभियान‌’ हे कुटुंबाला पुन्हा शिक्षण, संस्कार आणि कुलपरंपरेशी जोडणारे केंद्र बनवण्यावर आधारित आहे. कुटुंब म्हणजेच पहिला गुरुकुल या संकल्पनेतून १७२ गावे आणि १ हजार, ८ कुटुंबांनी एकत्र येत जीवनमूल्यांच्या पुनर्जागरणाचा संकल्प केला. कार्यक्रमाचे आयोजक आकाश बिस्वास म्हणाले, “जोपर्यंत माता आणि पिता स्वतः गुरू बनत नाहीत, तोपर्यंत घर प्राथमिक गुरुकुल बनू शकत नाही. ‌‘घर गुरुकुल‌’ नसेल, तर नवी पिढी मुळांपासून दूर जाईल आणि त्यामुळे स्थलांतर, जमीन वाद व कुटुंब विघटन वाढेल. ‌‘गृह गुरुकुल‌’ हा यावर प्रभावी उपाय ठरू शकतो.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरलेले ‌‘आईचा पदर‌’ हे भव्य स्वागतद्वार १७२ गावांतील सुमारे ४५० मातांच्या साड्यांपासून उभारण्यात आले होते. हे दृश्य मातृशक्तीची एकता आणि सांस्कृतिक जागृतीचे प्रभावी प्रतीक ठरले. कार्यक्रमात गावदेवी सजावट स्पर्धेत कोने गावाला प्रथम (रु. २५ हजार) व भोपिबली गावाला द्वितीय (रु. १५ हजार) पारितोषिक मिळाले. तसेच सर्वांत मोठ्या संयुक्त कुटुंब सन्मानात श्रीराम भास्कर अंबावणे परिवार प्रथम, जयवंत मोतीराम अंबावणे परिवार द्वितीय व पालकर बंधू परिवार तृतीय क्रमांकाने सन्मानित झाले. कुलवृक्ष स्पर्धेत १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, तर ३५ महिलांनी गुढीपाडवा फॅशन-शोमध्ये पारंपरिक वेशभूषेत सादरीकरण केले. ‌‘एकतारा गुरुकुल‌’च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले भरतनाट्यम्‌, तबलावादन, गायन, तारपा नृत्य आणि नाट्यप्रयोग यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. गुरुमाता अरुणा देवी बिस्वास यांच्या संगीत सादरीकरणाने कार्यक्रमाला आध्यात्मिक उंची प्राप्त झाली. सहभागी कलाकारांनी आम्ही केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर समाजनिर्मितीसाठी सादरीकरण करतो, असा संदेश दिला. १७२ गावांचा सहभाग आणि १ हजार, ८ कुटुंबांचा संकल्प यांमुळे हा उपक्रम देशभर राबवता येण्यासारखे विस्तारक्षम मॉडेल म्हणून पुढे येत आहे. कुटुंबाला पुन्हा संस्कार आणि शिक्षणाचे केंद्र बनवण्याच्या या संकल्पनेतून अनेक सामाजिक समस्यांवर मूळातून उपाय मिळू शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. वाड्यातील त्रिकर्म उत्सव हा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नसून, एक सांस्कृतिक जागरण आणि राष्ट्रनिर्मितीकडे नेणारी चळवळ ठरत आहे. राष्ट्रनिर्मितीची सुरुवात घरापासून होते, हा संदेश देत ‌‘गृह गुरुकुल अभियान‌’ देशाला नवी दिशा देण्याची क्षमता दर्शवत आहे.

- आकाश विश्वकर्मा
Powered By Sangraha 9.0