भारत टॅक्सी : सहकाराधारित परिवहनाची नांदी

25 Mar 2026 12:54:39

‌‘सहकारातून समृद्धीकडे‌’ हा सामाजिक विकासाचा मूलमंत्र परिवहनसेवेतही पथदर्शी ठरू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे गेल्याच महिन्यात शुभारंभ झालेली ‌‘भारत टॅक्सी‌’ सेवा. तेव्हा, नेमके या टॅक्सीसेवेचे स्वरूप, चालकांना-प्रवाशांना होणारे लाभ याचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख...

भारतातील परिवहन व्यवस्थेत सातत्याने बदल होताना दिसतात. वाढती लोकसंख्या, दळणवळणातील गुंतागुंत आणि वेगाने विस्तारणाऱ्या डिजिटल सेवांमुळे प्रवासाच्या पद्धतींना नवे स्वरूप प्राप्त करुन दिले आहे. गेल्या काही वर्षांत ॲपआधारित टॅक्सीसेवांनी नागरिकांचा लोकांचा प्रवास सुकर केला आहेच. मात्र, त्यामुळे काही आव्हानेदेखील समोर आली आहेत. या आव्हानांचे उत्तर ‌‘भारत टॅक्सी‌’च्या (सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड) स्वरूपात समोर आले आहे.

‌‘भारत टॅक्सी‌’ सहकाराधारित राष्ट्रीय टॅक्सी बुकिंग सेवा आहे, ज्यासाठी मार्च 2025 मध्ये केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पुढाकार घेतला आणि या सेवेचे औपचारिक उद्घाटन दि. 5 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न झाले. याचा उद्देश म्हणजे, टॅक्सीसेवा क्षेत्रात पारदर्शकता आणणे, चालकांना आर्थिक पातळीवर सशक्त करणे आणि प्रवाशांना विश्वसनीय व परवडणारी सेवा देणे असा आहे. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‌‘सहकारातून समृद्धीकडे‌’ या विचारांनी प्रेरित आहे. यामध्ये सहकारी संस्थांच्या माध्यमातून आर्थिक विकास आणि सामाजिक सशक्तीकरणाला चालना देणे, हे अपेक्षित आहे.

भारतातील टॅक्सीसेवा क्षेत्रातील आव्हाने

भारतातील डिजिटल प्लॅटफॉर्मआधारित टॅक्सीसेवांचा मागील दशकात वेगाने विस्तार झाला. मोठमोठ्या शहरांमधील लाखो प्रवासी दररोज या सेवांचा उपयोग करतात. जरी या सेवांनी नागरिकांचा प्रवास सुखकर केला असला, तरीही टॅक्सीचालक आणि प्रवासी दोघांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

डिजिटल टॅक्सीसेवा क्षेत्रातील प्रमुख समस्या

डिजिटल टॅक्सीसेवा पुरवणाऱ्या कंपनीद्वारे आकारले जाणारे प्रचंड कमिशन शुल्क, ‌‘सर्ज प्राईसिंग‌’मुळे अचानक होणारी भाडेवाढ, चालकांच्या मिळकतीतील अनिश्चितता, निर्णय-प्रक्रियेतील चालकांची मर्यादित भागेदारी या प्रामुख्याने डिजिटल टॅक्सीसेवा क्षेत्रातील प्रमुख समस्या म्हणता येतील.

या समस्या लक्षात घेता, सहकारावर आधारित एका नव्या यंत्रणेची आवश्यकता समोर आली, ज्यामध्ये चालक आणि ग्राहक अशा दोघांनाही अधिकाधिक लाभ होऊ शकेल.

सहकारी मॉडेलची संकल्पना

‌‘भारत टॅक्सी‌’ला बहुराज्यीय सहकारी संस्थेच्या रूपात स्थापित केले आहे. म्हणजेच, या प्लॅटफॉर्मचे संचालन कोणत्याही खासगी कंपनीद्वारे नव्हे, तर सहकारी माध्यमातून केले जाणार आहे. या प्रारूपात टॅक्सीचालक केवळ सेवादाते नसतील, तर ते या प्रणालीचे भागीदारही असतील.

या उपक्रमाला भारतातील प्रमुख सहकारी संस्थांनी समर्थन दर्शविले, ज्यात ‌‘अमुल‌’, ‌‘इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स को-ऑपरेटिव्ह लिमिटेड‌’ (आयएफएफसीओ - इफ्को), ‌‘नॅशनल बँक फॉर ॲग्रीकल्चर ॲण्ड रूरल डेव्हलपमेंट‌’ (एनएबीएआरडी - नाबार्ड), ‌‘नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया‌’ (एनएएफईडी- नाफेड) आणि ‌‘कृषक भारती को-ऑपरेटिव्ह लिमिटेड‌’ (केआरआयबीएचसीओ - क्रिभको) यांसारख्या संस्थांचा समावेश आहे. या संस्थांचा सहभाग या योजनेला एक अत्यंत मजबूत सहकारी आधार प्रदान करतो आणि या देशाच्या सहकाराच्या परंपरेशीही जोडतो.

चालक होणार ‌‘सारथी‌’

‌‘भारत टॅक्सी‌’शी जोडलेल्या चालकांना ‌‘सारथी‌’ म्हटले जाईल. या नावाच्या मागे हा विचार आहे की, चालक केवळ वाहन चालवणारा व्यक्ती नसून, प्रवाशांना सुरक्षित आणि विश्वसनीय प्रवास करून देणारा मार्गदर्शकही आहे.

सारथींना अनेक प्रकारचे लाभ दिले जातील, जसे की- सहकारातील सदस्यत्वाच्या माध्यमातून मालकीचा अधिकार, कमिशनमुक्त मिळकतीचे मॉडेल, सहकारी कर्ज आणि विमा योजना, कौशल्य विकास आणि डिजिटल प्रशिक्षण, वार्षिक लाभांशातील भागीदारी. या व्यवस्थेमुळे चालकांच्या मिळकतीत स्थिरता प्राप्त होईल आणि त्यांचे त्यांच्या कामावर अधिक नियंत्रणही राहील.

प्रवाशांना होणारे फायदे

प्रवाशांना सुरक्षित, परवडण्याजोगी आणि विश्वासार्ह परिवहनसेवा पुरवणे, हे ‌‘भारत टॅक्सी‌’चे प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच या टॅक्सी सेवेच्या माध्यमातून प्रवाशांना प्रशिक्षित आणि विश्वासार्ह चालकांसोबत प्रवास करण्याची संधी मिळेल.

दिल्लीत या सेवेच्या प्रायोगिक तत्वावरील टप्प्यात विमानतळ, बस स्थानके आणि रेल्वे स्थानके अशा प्रमुख ठिकाणी ‌‘प्रीपेड राईड बुकिंग बूथ‌’ स्थापन करण्यात आले आहेत. या बूथवर प्रवाशांना तत्काळ बुकिंग आणि अन्य मदत उपलब्ध होईल. याशिवाय, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी निगराणी यंत्रणा आणि आपत्कालीन साहाय्यक व्यवस्थादेखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

महिला सुरक्षा आणि सशक्तीकरण

महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ‌‘भारत टॅक्सी‌’ने विशेष पुढाकार घेतला आहे, ज्यामध्ये महिलांना महिला चालक निवडण्याचा पर्याय उपलब्ध असेल. या योजनेअंतर्गत महिलांना प्रशिक्षण, आर्थिक साहाय्य, इलेक्ट्रिक वाहन अशा सुविधा दिल्या जातील. प्राथमिक टप्प्यात दिल्ली आणि अन्य काही राज्यांत महिला चालकांना इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. भविष्यात या योजनेचा अधिक विस्तार करून मोठ्या प्रमाणात महिला चालकांना या सेवेशी जोडून घेण्याची योजना आहे.

सर्वसमावेशक परिवहन व्यवस्था

केवळ व्यावसायिक सेवा प्रदान करणे, हे ‌‘भारत टॅक्सी‌’चे उद्दिष्ट नसून, समाजातील सर्व वर्गांना सुलभ परिवहन उपलब्ध करून देणे हे या सेवेचे उद्दिष्ट आहे. याच उद्दिष्टाने अनेक योजनांचा आरंभ केला गेला आहे. दिव्यांगांसाठी विशेष वाहने उपलब्ध करून दिली जातील, ज्यात रॅम्प आणि अन्य सुविधा असतील. विद्याथ व गरीब प्रवाशांसाठी सवलतीच्या दरांचीदेखील व्यवस्था केली जाईल. त्याशिवाय, रुग्णालयाच्या चालकांना फायदा प्राप्त करून घेण्यासाठी निर्धारित केलेल्या अटींची पूर्तता करावी लागेल.

लाखो प्रवाशांसह वृद्धिंगत होणारे ‘भारत टॅक्सी‌’ नेटवर्क

आजघडीला ‌‘भारत टॅक्सी‌’मध्ये जवळपास चार लाख चालकांनी (सारथी) प्रवेश केला आहे, जे देशात विविध ठिकाणी सेवा प्रदान करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. ही आकडेवारी चालकांचा सहकारी प्रारूपावरील वाढता विश्वास दर्शविणारीच म्हणावी लागेल. दुसरीकडे 23.06 लाखांपेक्षा अधिक प्रवासी या प्लॅटफॉर्मशी जोडले गेले आहेत, जे या टॅक्सीसेवेच्या वाढत्या लोकप्रियतेचे निदर्शक ठरले आहे. ‌‘भारत टॅक्सी‌’ हळूहळू परिवहन क्षेत्रातील एक विश्वसनीय पर्याय म्हणून पुढे येत असल्याचे स्पष्ट आहे.

भविष्यातील शक्यता

‌‘भारत टॅक्सी‌’चा प्रारंभ दिल्लीत प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे. आगामी काळात देशातील अन्य महानगरांत या टॅक्सीसेवेच्या विस्ताराची योजना आहे. लाखो चालकांना सहकार तत्त्वाशी जोडून शहरी परिवहन व्यवस्था अधिक पारदर्शक, न्याय्य व शाश्वत बनवण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे.

निष्कर्ष

‌‘भारत टॅक्सी‌’ भारताच्या शहरी परिवहन क्षेत्रातील एका नव्या दिशेचे प्रतिनिधित्व करत आहे. सहकारी मूल्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून चालक, प्रवासी आणि समाज अशा तिघांचाही लाभ करून देणारे प्रारूप ‌‘भारत टॅक्सी‌’च्या माध्यमातून प्रस्तुत केले गेले आहे. जर हा उपक्रम संपूर्ण देशात लागू झाला, तर केवळ टॅक्सी उद्योगाचीच रचना बदलेल असे नाही; तर सहकारावर आधारित आर्थिक प्रारूपांनादेखील बळकटी मिळेल. अशाप्रकारे ‌‘भारत टॅक्सी‌’ भविष्यात भारतातील परिवहन अधिक समावेशक, पारदर्शक आणि टिकाऊ बनवण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून सिद्ध होऊ शकते.
- डॉ. आशिष कुमार भूटानी
(लेखक केंद्रीय सहकार मंत्रालयाचे सचिव आहेत.)

Powered By Sangraha 9.0