‌‘माहेरवाशीण‌’ प्रभा

25 Mar 2026 13:00:06

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, उद्यमशीलतेचा नवा अध्याय रचणाऱ्या प्रभा शिर्के यांची ही प्रेरणादायी जीवनकहाणी...

कन्या सासुऱ्यासि जाये|
मागें परतोनी पाहे ॥1॥
तैसें जालें माझ्या जीवा|
केव्हां भेटसी केशवा ॥ध्रु.॥


तुकोबांच्या या ओळी वाचताना, त्यांनी मुलीचे सासरी जाणे हे जे रूपक वापरले आहे, ते वाचून थक्क व्हायला होतं. प्रत्येक मुलीच्या भावविश्वात माहेराला विशेष स्थान. माहेर म्हणजे केवळ कुटुंब नाही, तर एक आधारवड. बदलापूरसारख्या ठिकाणी ‌‘माहेरवाशीण‌’ या आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून महिलांसाठी, हक्काचा असा आधारवड ठरलेली व्यक्ती म्हणजे प्रभा शिर्के!

प्रभा शिर्के यांचं बालपण हलाखीत गेलं. त्यांचे वडील रेल्वेमध्ये कामाला होते. पाच बहिणी, एक भाऊ असा प्रपंच सांभाळण्यासाठी प्रभा यांना अत्यंत कमी वयात स्वतःच्या पायावर उभं राहावं लागलं. पहाटे उठून दुधाची लाईन टाकण्याचं काम त्या करू लागल्या. वयाच्या दहाव्या वर्षापासून सुरू झालेला संघर्ष पुढे त्यांच्या जीवनाचं संचित बनला. पुढे प्रकाश शिर्के यांच्यासोबत त्या विवाहबद्ध झाल्या. लग्नानंतरचा काही काळ सुखाने संसार सुरू होता. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. प्रकाश शिर्के यांना हृदयविकाराचा झटका आला. या काळातच प्रभाजींनी गर्भामध्ये असलेलं आपलं बाळदेखील गमावलं. आरोग्याच्या कारणास्तव त्यांच्या पतीची नोकरी थांबली. अशा काळात प्रभाजींनी घरोघरी जाऊन जेवण बनविण्याचं काम हाती घेतलं. याच काळात त्यांच्या पतीला अर्धांगवायूचा झटका आला. सातत्याने उपचारांसाठी त्यांच्या सोबत राहण्याची गरज होती. त्यामुळे एकप्रकारे मुलुंडमध्येच त्या काहीशा बंदिस्त झाल्या. मात्र, या संघर्षाच्या काळातसुद्धा त्यांनी हार मानली नाही.

काही काळानंतर त्या ‌‘तळवलकर जिम‌’मध्येसुद्धा काम करू लागल्या. व्यायामाचं प्रशिक्षण आत्मसात केलं. डब्यांचं कामसुद्धा सुरू होतंच; पण मनात कुठेतरी नवीन काही तरी करण्याची ऊमसुद्धा होती. अशातच त्यांनी स्वतःचं जिम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे आई-वडील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कधी ओळखीच्या, तर कधी अनोळखी स्त्रिया त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. यातूनच महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं मुलुंडमधील पहिलं असं ‌‘सोहम फिटनेस सेंटर‌’ सुरू झालं. टप्प्याटप्प्याने त्यांचं स्वतःचं घर झालं. मात्र, पतीचं आजारपण आणि इतर गोष्टींमुळे जीवनातला संघर्ष सुरूच होता.

अशातच महिलांसाठी म्हणून काहीतरी करावं, हा विचार त्यांच्या मनामध्ये घोळत होता. कालांतराने काही काळासाठी त्या निवासासाठी बदलापूरला गेल्या. बदलापूर ते मुलुंड अशी पुन्हा एकदा वारी सुरू झाली. बदलापूरमध्ये जमीन विकत घेण्यासाठीसुद्धा त्यांच्या पाठीशी त्यांच्या मैत्रिणी, महिला उभ्या राहिल्या. प्रपंच सांभाळताना दिवसेंदिवस त्या पुढे जात होत्या आणि अशातच उगवला दि. 26 जुलै 2005चा दिवस. त्या दिवशीच्या अतिवृष्टीने कष्टाने उभा केलेला त्यांचा संसार क्षणार्धात चिखलात वाहून गेला. जवळपास आठवड्याभरानंतर त्यांनी आपला संसार पुन्हा एकदा मांडायला सुरुवात केली. चिखल-गाळ काढत असताना, मातीत रुतून बसलेली चांदीची श्रीकृष्णाची मूत मात्र त्यांना तशीच सापडली. त्यांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली. जिमचं भाडं परवडेनासं झालं, म्हणून एका टप्प्यावर त्यांना आपली जिम बंद करावी लागली. अशातच, दि. 6 एप्रिल 2011 रोजी त्यांच्या पतीची प्राणज्योत मालवली. आजारपणाशी केलेल्या दीर्घ संंघर्षानंतर ते अनंतात विलीन झाले. आता आपल्यासाठी या जगात काही उरलंच नाही, हा विचार त्यांच्या मनाला शिवून गेला आणि त्यांनी आत्महत्या करायचा निर्णय घेतला. ठाणे रेल्वे स्थानकावर असताना त्यांनी स्वतःला ट्रेनसमोर झोकून दिलं. मात्र, तितक्यात एका माणसाने त्यांचे प्राण वाचवले. जवळपास 15 ते 20 दिवस त्या दवाखान्यात होत्या. याच काळात त्यांना लक्षात आलं की, आपल्या हातून अजून काम व्हायचं बाकी आहे आणि याच प्रेरणेतून जन्म झाला ‌‘माहेरवाशीण‌’ या संकल्पनेचा. बदलापूर येथे अडीच गुंठ्याच्या जागेत त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली.

महिलांना माहेरपणाची ऊब देण्यासाठी ‌‘माहेरवाशीण‌’ या विशेष ‌‘होम-स्टे‌’ची निर्मिती करण्यात आली. 2021 साली वर्षाच्या सुरुवातीला या ‌‘होम-स्टे‌’ने बुकिंगचा उच्चांक गाठला. नंतरच्या काळात इथे येणाऱ्या महिलांची संख्या जी दिवसेंदिवस वाढली, ती आज उत्तरोत्तर वाढतच आहे. केळवण, वाढदिवस, इथपासून ते लग्नापर्यंत या वास्तूने अनेक गोष्टी पाहिल्या. त्यांच्या या प्रवासात स्मिता लोंढे, अलकाताई देशपांडे, भुमा अय्यर, चित्रा गायकवाड अशा अनेक महिलांनी मदत केली. ज्या प्रभाताईंना आपल्या जीवनामध्ये संघर्षामुळे माहेरपण अनुभवता आले नाही, आज त्यांनी हजारो मुलींसाठी ‌‘माहेरवाशिणी‌’ची भूमिका स्वीकारली. त्यांच्या भविष्यातील उज्ज्वल वाटचालीसाठी दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’च्या शुभेच्छा!

9967826983

Powered By Sangraha 9.0