मुंबई (विशेष प्रतिनिधी) - भाईंदरमधील मानवी वस्तीमधून पकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या नागला नियतक्षेत्रात रेडिओ काॅलर लावून सोडलेल्या बिबट्याची शिकार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे (bhayandar leopard). या बिबट्याचे शव हे २ फेब्रुवारी रोजी मृतावस्थेत मिळाले होते (bhayandar leopard). शवाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या वनकर्मचाऱ्यांना त्याठिकाणी थांबलेले पाच इसम पळून जाताना दिसले (bhayandar leopard). महत्त्वाचे म्हणजे या इसमांनी त्याठिकाणी टाकलेल्या बॅगमध्ये चाकू आढळले असून बिबट्याच्या मानेवर देखील धारधार शस्त्राने वार केल्याची जखम आहे. (bhayandar leopard)
१९ डिसेंबर, २०२५ रोजी भाईंदर येथील मानवी वस्तीमधून एक निमवयस्क नर बिबट्याचा बचाव करण्यात आला होता. त्यानंतर त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठविण्यात आले होते. वनमंत्री गणेश नाईक यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने या बिबट्याला रेडिओ काॅलर लावून २५ डिसेंबर रोजी नागला नियतक्षेत्रातील जंगलात सोडले. या बिबट्याने जंगलातील गुंफा असलेल्या प्रदेशाचा ताबा घेऊन तिथे अधिवास करण्यास सुरुवात केली. मात्र, २ फेब्रुवारी रोजी या बिबट्याच्या गळ्यातील रेडिओ काॅलरने मोर्टालिटी संकेत दिला. प्राण्याची शारिरीक हालचाल न झाल्यास रेडिओ काॅलरकडून मोर्टालिटी संकेत पाठवला जातो. या संकेत प्राप्त झाल्यावर राष्ट्रीय उद्यानाच्या उत्तर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 'डब्लूसीएस-आय'च्या संशोधकांसोबत घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांना बिबट्या मृत असल्याचे दिसले.
ज्यावेळी कर्मचारी संशोधकांसोबत घटनास्थळी पोहोचले, तेव्हा बिबट्याच्या शवाशेजारी पाच इसम बसले होते. कर्मचाऱ्यांना पाहिल्याबरोबर हे इसम पळून गेले. मात्र, या धावपळीत ते घटनास्थळी बॅग विसरुन गेले. बॅगेच्या तपासणीअंती त्यामध्ये धारदार शस्त्र आढळली. शिवाय बिबट्याच्या गळ्यावर देखील धारदार शस्त्राचे वार आढळले. शवविच्छेदनाअंती बिबट्याचा मृत्यू हा जखम आणि रक्तस्त्रावामुळे झाल्याचे आढळले. त्यामुळे या बिबट्याला त्या इसमांनी शिकारीच्या अनुषंगाने ठार केले ? की मृत पावलेल्या बिबट्याची अवयव काढण्यासाठी ते त्याठिकाणी आले होते, याचा तपास राष्ट्रीय उद्यानाचा उत्तर विभाग करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या इसमांना शोधण्यासाठी घटनास्थळी कार्यान्वित असणाऱ्या फोनचे सीडीआर काढण्याचे काम सुरू असून पोलिसांना देखील त्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, घटनास्थळी नेटवर्कची समस्या असल्याने सीडीआर काढणे मुश्किलीचे होत आहे.