नाशिक : (Ashok Kharat) भोंदू अशोक खरात याच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ‘श्री शिवनिका संस्थान’च्या उत्पन्नात मागील काही वर्षांमध्ये तब्बल ७४ पटींनी वाढ झाल्याची बाब समोर आली. धर्मादाय आयुक्तालयाकडे सादर केलेल्या लेखापरीक्षणातून ही माहिती उघड झाली.
अनेक महिलांवर केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे अशोक खरात चांगलाच अडचणीत सापडला असून आतापर्यंत सहा पीडित महिलांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पुढील काही दिवसांत ही तक्रारींची संख्या अजून वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थानने धर्मादाय आयुक्तालयाला सादर केलेल्या लेखापरीक्षणानुसार, गेल्या सात ते आठ वर्षांपूर्वी संस्थानची आर्थिक स्थिती तुटीची होती. संस्थानचे २०१८-१९ पर्यंत खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी आर्थिक स्थिती होती. मात्र त्यानंतर त्याचे उत्पन्न खूप झपाट्याने वाढल्याचे दिसून येत आहे.
असा वाढत गेली खरातची माया
२०१८-१९ मध्ये एक लाख ६० हजार ते एक लाख ६५ हजारांची तूट होती. मात्र २०१९-२० मध्ये संस्थानच्या मालमत्तेमध्ये भरमसाट वाढ झाली. सात लाखांवरून थेट एक कोटी ४१ लाखांवर उत्पन्न पोहोचले. २०१४ मध्ये तब्बल ७६ लाख ९१ हजार ४१६ रुपयांच्या देणग्या मिळाल्या. त्यामुळे अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या या उत्पन्नाचा शोध पोलीस घेतला जात आहे.
असा घातला भक्तांना गंडा
बाजारात १०० रुपये किलोने मिळणारे खडे, चिंचोके मंतरलेले असल्याचे भासवून तो लाखो रुपयांना विकायचा. एक चिंचोका किंवा खड्याची किंमत एक लाख रुपये होती. तसेच एल्विश हनी नावाने तो मधाची विक्री करायचा. हे मध तुर्कीतील समुद्राच्या खोल गुहांमधून आणल्याची बतावणी करुन एक किलोसाठी नऊ लाख रुपये घ्यायचा. मिरगावातील श्री ईशान्येश्वर मंदिरात पूजाविधी करण्यासाठी तो लाखो रुपये उकळत होता. हेच पैसे तो संस्थानच्या बँक खात्यावर घेत असल्याचेही समोर येत आहे.
वर्षनिहाय खरातचे आर्थिक उत्पन्न
२०१७-१८ चार लाख ६७ हजार ६०१ रुपये
२०१८-१९ सात लाख २७ हजार ८२३ रुपये
२०१९-२० सात कोटी ४१ लाख ७९ हजार ९२८ रुपये
२०२०-२१ एक कोटी ५५ लाख ५० हजार ९६२ रुपये
२०२१-२२ १ कोटी ४१ लाख चार हजार ४७ रुपये
२०२२-२३ १ कोटी ४० लाख ९५ हजार ७२३ रुपये
२०२३-२४ दोन कोटी १० लाख ५७ हजार ४१ रुपये
२०२४-२५ दोन कोटी १५ लाख ११ हजार १६९ रुपये