महाराष्ट्राला हादरवणाऱ्या भोंदूबाबा प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. नाशिकमधील कथित ज्योतिषाचार्य अशोक खरात याच्याविरोधातील आरोप अधिक गंभीर होत चालले आहेत. त्यातच न्यायालयाने त्याला आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मंगळवार, २४ मार्च रोजी नाशिक पोलिसांनी खरातला न्यायालयात हजर केले असता, सरकारी वकिलांनी जोरदार युक्तीवाद करत तपासासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे सांगितले. अनेक पीडित महिला पुढे येत असल्यामुळे तपासाचा विस्तार वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले. न्यायालयाने ही बाजू ग्राह्य धरत कोठडी वाढवण्याचा निर्णय दिला. मात्र त्यासोबतच या प्रकरणात आणखी काही धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. खरातने पाच जणांचा नरबळी घेतला असल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. कोर्टाच्या या सुनावणीत नेमकं काय घडल? सरकारी वकिलांनी काय युक्तीवाद केला? आणि आरोपीच्या वकिलांच काय म्हणणं होत सविस्तर जाणून घेऊयात...
भोंदूबाबा कॅप्तन अशोक खरात या प्रकरणात उघड होत असलेल्या माहितीने संपूर्ण राज्य हादरले आहे. महिलांवरील लैंगिक अत्याचार, ब्लॅकमेलिंग, अघोरी विधी आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक अशे अनेक गंभीर आरोप खरातवर करण्यात आले आहेत. पोलिस तपासादरम्यान त्याच्याकडून तब्बल ५८ अश्लील व्हिडिओस असलेले पेनड्राईव्ह जप्त करण्यात आले आहे. मात्र, हा आकडा १०० च्याही पुढे जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या व्हिडिओंच्या आधारे अनेक महिलांना ब्लॅकमेल केलं जात होत.
अशोक खरात ‘चमत्कारी उपाय’ आणि ‘दैवी शक्ती’च्या नावाखाली लोकांची फसवणूक करत होता. ‘तुक्रीच्या समुद्रातून मिळालेलं खास मध’ असल्याचा दावा करत एक किलो मध तब्बल ९ लाख रुपयांना विकला जात होता. लैंगिक समस्या दूर करण्यासाठी हे मध उपयुक्त असल्याचे सांगून तो लोकांची दिशाभूल करायचा. याशिवाय नकली रबराचा नाग, वाघाचं कातडं आणि अघोरी विधींच्या नावाखाली महिलांचे शोषण करायचा. नाशिकमधील ईशानेश्वर मंदिर परिसरात महिलांना नेऊन ‘पूजा विधी’च्या नावाखाली गैरप्रकार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. साध्या चिंचोक्यांना ‘रत्न’ असल्याचे भासवून लाखो रुपयांत विक्री केल्याचाही प्रकार समोर आला आहे.
तपासादरम्यान एका गर्भवती महिलेचे ‘पूजा विधी’च्या नावाखाली लैंगिक शोषण करण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. तक्रार दिल्यास कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही पीडितेकडून सांगण्यात आले. मात्र या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे ‘नरबळी’चा संशय. पोलिसांनी खरातकडून जप्त केलेल्या पिस्तुलातील ५ गोळ्या फायर झालेल्या आढळल्याने ५ जणांचा नरबळी दिल्याची शक्यता न्यायालयात मांडण्यात आली. तसेच आरोपीकडून हरणाची कस्तुरी, वाघाचे कातडे, साप, शिंगे यांसारख्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. ‘सिद्ध दोष पूजा’सारख्या अघोरी विधींमध्ये या वस्तूंचा वापर होत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याशिवाय त्याच्याकडून २१ जिवंत काडतुसे आणि ५ वापरलेली काडतुसेही सापडली आहेत.
दरम्यान, नाशिकच्या मिरगाव परिसरात आरोपीचे फार्महाऊस असल्याचे समोर येताच पोलिसांनी त्या ठिकाणची तपासणी सुरू केली, तेथे बेकायदेशीर शस्त्र बाळगून दहशत निर्माण केली जात असल्याचे उघड झाले असून, फार्महाऊसमधील संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे. सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, घरझडतीदरम्यान राजमुद्रा, मालमत्तेची कागदपत्रे आणि इतर संशयास्पद साहित्य सापडले आहे. आरोपीने अनेकांची फसवणूक केल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. ६७ वर्षीय आरोपीचा महिलांवरील अत्याचाराचा व्हिडिओ पुरावा असल्याचाही दावा सरकारी वकिलांकडून करण्यात आला. दुसरीकडे, आरोपीच्या वकिलांनी या सर्व आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत “७ दिवसांच्या तपासात अनेक बाबी स्पष्ट झाल्या आहेत. पिस्तुलाला परवाना होता. सर्व तपास पूर्ण झाल्यावर आणखी कोठडी का हवी?” असा सवाल त्यांनी न्यायालयात उपस्थित केला.
सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथक (SIT) करत आहे. एका पीडित महिलेच्या तक्रारीनंतर हा प्रकार समोर आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ५ कोटींच्या खंडणीचा धक्कादायक प्रकारही उघड झाला. आरोपीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याकडून सीसीटीव्ही फुटेज चोरून ५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. त्यानंतर पीडित महिलांना धमक्या देण्यात आल्या आणि अखेर पोलिसांत तक्रार दाखल झाली. मात्र आता या प्रकरणातील वाढत्या गंभीर आरोपांमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष तपासाकडे लागले असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठे आणि धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.