मुंबई : (Dhurandhar 2) ‘धुरंधर: द रिव्हेंज’ सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घालत असून, या चित्रपटाच्या यशाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. यातच दिग्दर्शक आदित्य धर यांची प्रशंसा 'थलायवा' म्हणून ओळखले जाणारे सुपरस्टार रजनीकांत यांनी केली आहे.
रजनीकांत यांनी रणवीर सिंग आणि दिग्दर्शक आदित्य धर यांना टॅग करत खास पोस्ट शेअर केली. यात त्यांनी असे लिहिले आहे की, “काय चित्रपट आहे… धुरंधर २!” तसेच त्यांनी दिग्दर्शक आदित्य धर यांना “बॉक्स ऑफिसचा बाप” असे संबोधत त्यांचं विशेष कौतुक केलं. यासोबतच त्यांनी रणवीर सिंग आणि संपूर्ण कलाकार व तांत्रिक टीमचं अभिनंदन करत त्यांच्या मेहनतीचं कौतुक केलं. रजनीकांत पुढे असेही म्हणाले की, “हा असा चित्रपट आहे, जो प्रत्येक भारतीयाने आवर्जून पाहावा.”
यावर दिग्दर्शक आदित्य धर यांनी आपली भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते असे म्हणाले की, सर, मनोरंजन म्हणून आम्ही तुम्हांलाच बघत आलो आाहे. अनेक दशकांपासून तुम्ही आम्हाला शिट्टी वाजवायला, हसायला, रडायला लावत आहात आणि आजही त्याच दिमाखात आणि हे सहजतेने पार पाडत आहात, ही निव्वळ जादूच आहे. आदित्य धर पुढे असेही म्हणाले की, त्यामुळे तुम्ही ‘धुरंधर २’ ला ‘अवश्य पाहा’ असं म्हणणं, हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा ‘सुपरस्टार’ क्षण आहे.ज्या व्यक्तीने आम्हा सर्वांना मोठी स्वप्नं पाहायला शिकवलं, त्यांच्याकडून मिळालेला हा एक आशीर्वादच वाटतो आहे असे म्हणत त्यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे.
दरम्यान धुरंधर २ ने तब्बल ४ दिवसांतच बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. या चित्रपटाने ४ दिवसांतच जगभरात तब्बल ₹751.97 कोटींची कमाई करुन नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. धुरंधरने अनेक चित्रपटांना मागे टाकत ही अव्वल कमाई केली आहे.