पंचकर्मासोबतच आयुर्वेदात असंख्य औषधी गुणधर्मांनी युक्त वनस्पती-द्रव्ये सांगितली आहेत, ज्याला ‘वर्ण्य’ व ‘केश्य द्रव्य’ असे म्हटले जाते, जी त्वचेचे सौंदर्य आणि आरोग्य मिळविण्यासाठी व त्वचेची काळजी घेण्यासाठी उपयुक्त आहेत. या द्रव्यांचा उपयोग आपण अंतर्गत, तसेच बाह्य प्रयोगासाठी करू शकतो. ही द्रव्ये त्यांच्या औषधी गुणधर्मामुळे अंतर्गत काढा, वटी या स्वरूपात, तर लेप, क्रीम या बाह्य स्वरूपात उपयोगात येते. त्याविषयी आजच्या भागात जाणून घेऊया...
वर्ण्य द्रव्य
हळदी (हळद) : रंग उजळवण्यासाठी आणि त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी ओळखली जाते.
कडुनिंब : मुरुमांवर उपचार करण्यासाठी आणि त्याच्या बॅटेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्मांमुळे त्वचा शुद्ध करण्यासाठी वापरले जाते.
कोरफड (कुमारी) : त्वचेला मॉइश्चरायझिंग, हायड्रेटिंग आणि थंड करण्यासाठी उत्कृष्ट.
आवळा (भारतीय गुसबेरी) : ‘क’ जीवनसत्त्वाने समृद्ध, ते रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते आणि नैसर्गिक चमक देते.
चंदन : थंड करण्यासाठी, गुळगुळीत करण्यासाठी आणि त्वचेचा रंग सुधारण्यासाठी वापरले जाते.
त्रिफळा : त्वचेचे विषारीपणा आणि शुद्धीकरणासाठी, पोट साफ (बद्धकोष्ठता) करण्यास उपयोगी होतो.
गुलाब : त्वचेला टोनिंग आणि ताजेतवाने करण्यासाठी पॅकमध्ये वापरले जाते. थंडावा देते.
बदाम : बदाम तेल किंवा बदामाचा फेसपॅक लावल्याने चेहरा नैसर्गिकरित्या चमकदार बनतो. बदामाच्या वापराने त्वचेवरील डाग आणि हायपरपिग्मेंटेशन (Melasam) कमी होण्यास मदत होते.
डाग, मुखदुषिका (Acne), वांग, डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी व चेहरा चमकदार करण्यासाठी वापरले जाणारे पारंपरिक पेस्ट, ज्यामध्ये बहुदा जंगली हळद, बेसन, दूध, चंदन, मंजिष्ट, लोधरा, गुलाब यांसारख्या औषधी विशेष उपयोगात येतात.
चेहर्याच्या सौंदर्यासाठी जशी वर्ण्य द्रव्ये उपयोगी आहेत, तशीच केसांच्या योग्य मजबुती व वाढीसाठी, केस काळेभोर ठेवण्यासाठी खालील केश्य द्रव्ये मदत करतात. सूर्यफुलाच्या बिया, आवळा, भृंगराज, रिठा, अश्वगंधा, यष्टिमधु, तीळ ही द्रव्ये त्यांच्या केश्य गुणधर्मांमुळे कशी फायदेशीर आहेत, ते पाहूया.
सूर्यफुलाच्या बिया (Sunflower Seeds) : ‘अ’ जीवनसत्त्व, झिंक आणि बायोटिनचा उत्तम स्रोत असल्याने केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. त्या केसांची गळती कमी करण्यास, कोंडा दूर करण्यास, केस अकाली पांढरे होण्यापासून रोखण्यास आणि केसांना पोषण देऊन मजबुती वाढवण्यास मदत करतात.
भृंगराज : केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी आणि अकाली पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी ओळखले जाते.
आवळा : केसांची मुळे मजबूत करते आणि चमक सुधारते.
यष्टिमधु : यष्टिमधु टाळूतील रक्तपुरवठा सुधारते, ज्यामुळे केस गळणे थांबते. टाळूची जळजळ शांत करते, कोरडेपणा कमी करते आणि कोंडा दूर करते. फ्लेव्होनॉइड्स आणि फायटोस्ट्रोजेन्समुळे केसांची मुळे मजबूत होतात. हे नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते, ज्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात.
रिठा : टाळूवरील घाण, जास्त तेल आणि कोंडा काढून टाकते, ज्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात. केसांच्या मुळांना पोषण देते, केस गळणे कमी करते आणि केसांची वाढ वाढवते. ‘अॅण्टीप्रोटोझोअल’ गुणधर्मांमुळे ते डोक्यातील ऊवा मारण्यास मदत करू शकते.
अश्वगंधा : ताण कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते.
तीळ किंवा तिळाचे तेल केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. हे तेल टाळूला पोषण देऊन केसगळती कमी करते, कोंडा दूर करते, केसांना नैसर्गिक काळा रंग देते आणि नवीन केस वाढण्यास मदत करते. यात व्हिटॅमिन ‘ई’ आणि अॅण्टीऑसिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे केस मजबूत आणि चमकदार बनवण्यास उपयुक्त असते.
हे सर्व वर्ण्य व केश्य औषधी द्रव्ये रासायनिक सौंदर्य उत्पादनांना एक उत्तम पर्याय/ उपाय आहे, ज्यांना आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात आपलेसे करायचे आहे. यामुळे रासायनिक सौंदर्य उत्पादनांमुळे होणार्या दुष्परिणामांना आपल्याला रोखता येऊ शकते. आता वसंत ऋतू सुरू झाला आहे (मार्च-एप्रिल) वसंतोत्सवानंतर वातावरणात सूर्यप्रकाश वाढल्याने हिवाळ्यात साचलेला कफ दोष बाहेर पडतो. त्यामुळे या काळात सर्दी, अॅलर्जी, खोकला आणि त्वचारोग वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात संतुलित आहार, योग्य प्रमाणात पाणी पिणे, व्यायाम करणे व पुरेशी झोप घेणे अत्यंत गरजेचे आहे. उन्हाळ्यात काळजी घेण्याकरिता काही उपाय, ज्यांमुळे उन्हाळ्यात सौंदर्य आणि आरोग्य टिकवणे सोपे होईल-
१. संतुलित आहार
ताज्या भाज्या, हंगामी फळे, हिरव्या पालेभाज्या, प्रथिनयुक्त आहार आणि अॅण्टीऑसिडंटयुक्त पदार्थांचा समावेश करावा. आहारामुळे त्वचा आतून पोषित होते आणि नैसर्गिक तजेला प्राप्त होतो.
२. पुरेसे पाणी
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे, ही सामान्य बाब आहे. त्वचेचा ओलावा टिकवण्यासाठी दररोज किमान आठ-दहा ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. फ्रिजचे थंड पाणी, फ्रुटज्यूस, थंड ताक घेऊ नये. त्याऐवजी मठातील पाणे प्यावे, फ्रेश फ्रुटज्यूस घ्यावा. ताक, नारळ पाणी, टरबूज, काकडी आणि लिंबूपाणी यांचा आहारात समावेश केल्यास शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. पाणी हेच सर्वांत स्वस्त आणि प्रभावी सौंदर्यप्रसाधन आहे.
३. नियमित व्यायाम
मोबाईल आणि लॅपटॉपसमोर तासन्तास बसून काम करण्याची सवय वाढली आहे. परिणामी, ताणतणाव, लठ्ठपणा आणि जीवनशैलीजन्य विकारांमध्ये वाढ होताना दिसते. उन्हाळ्यात दररोज सकाळी किमान ३०-४५ मिनिटे चालावे. योग, प्राणायाम किंवा हलका व्यायाम केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेला नैसर्गिक तेज प्राप्त होते.
४. पुरेशी झोप
रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणे किंवा काम करणे, ही आधुनिक जीवनशैलीची सवय झाली आहे. मात्र, दररोज सात ते आठ तासांची झोप शरीर आणि मनाच्या पुनरुज्जीवनासाठी अत्यावश्यक आहे. योग्य झोपेमुळे ताण कमी होतो. मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि त्वचा ताजी-तवानी राहते. ‘ब्युटी स्लीप’ ही केवळ म्हण नसून वैज्ञानिक सत्य आहे.
५. स्वच्छता आणि संरक्षण
उन्हाळ्यात दैनिक स्वच्छता राखल्यास त्वचारोग आणि संसर्ग टाळता येतात. उन्हाळ्यात दिवसातून दोनवेळा स्नान केल्यास घामामुळे होणारे बुरशीजन्य संसर्ग कमी होतात. सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण करणेदेखील अत्यंत आवश्यक आहे. दुपारच्या तीव्र उन्हात बाहेर जाणे टाळावे. छत्री, टोपी किंवा पूर्ण बाह्यांचे कपडे वापरावेत.
या प्रकारे आपण आपल्या जीवनात आयुर्वेदात सांगितलेल्या नियमाप्रमाणे जीवन जगायला सुरुवात केली, तर सौंदर्य बिघडणार नाही. कारण, आयुर्वेदाचे प्रयोजन हे ‘स्वस्थस्य स्वास्थ्यं रक्षणम्| आतुरस्य विकार प्रशमनम्|’ म्हणजेच निरोगी व्यक्तीच्या आरोग्याचे रक्षण करणे आणि आजारी व्यक्तीच्या विकारांचे (रोगांचे) निवारण करणे, हे आहे. यावरून तर एक सिद्ध होते की खरे सौंदर्य हे महागड्या उपचारांमध्ये किंवा झटपट परिणाम देणार्या उत्पादनांमध्ये नाही; ते संतुलित जीवनशैलीत आहे. शरीर, मन आणि आहार यांचा समतोल साधला, तर त्वचा आणि केस आपोआप निरोगी राहतात.
एक डॉक्टर म्हणून माझा स्पष्ट संदेश आहे की, रासायनिक उत्पादनांवर अवलंबून राहण्याऐवजी नैसर्गिक उपाय, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप म्हणजेच आयुर्वेदाला अंगीकारणे आहे. सौंदर्य हे बाह्य अलंकार नसून, अंतर्गत आरोग्याचे प्रतिबिंब आहे. आतून निरोगी राहा; बाहेरून सुंदर दिसालच!
- डॉ. स्नेहा बोरुटकर-वांढरे
(लेखिका बीएएमएस, एमडी
(Ayurvedic Cosmetlology Trichology) असून त्यांचे स्नेह स्पर्श स्किन अॅण्ड हेअर लिनिक ब्रह्मांड,
ठाणे (पश्चिम) येथे आहे.)