US-Israel-Iran War :"अशा निराधार धमक्यांचा...", डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा मोठा इशारा!

23 Mar 2026 12:27:55

 US-Israel-Iran War

मुंबई : (US-Israel-Iran War) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या ४८ तासांच्या अल्टिमेटमला इराणने जशास तसे उत्तर दिले आहे. इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला झाल्यास जागतिक व्यापाराची जीवनवाहिनी असलेली होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे रोखून धरण्याची धमकी इराणने दिली आहे. 'आम्ही अशा निराधार धमक्यांचा रणांगणावर सामना करतो', असे इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत ट्रम्प यांच्या धमकीला प्रत्युत्तर देताना म्हटले आहे. एवढंच नाही तर अमेरिकेने इराणच्या सर्वात मोठ्या वीज प्रकल्पांवर हल्ला केला तर होर्मुझची सामुद्रधुनी इराण पूर्णपणे बंद करू, असाही इशारा आता इराणने दिला आहे. (US-Israel-Iran War)

इराणच्या अध्यक्षांनी काय म्हटलं?

अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर बोलताना आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या धमकीला प्रत्युत्तर देताना इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी म्हटलं की, "इराणला नकाशावरून पुसून टाकण्याचा भ्रम हा इतिहास घडवलेल्या राष्ट्राच्या विरुद्ध एका राष्ट्राची हताशा दर्शवते. अशा धमक्या आमची एकता अधिक दृढ करतात. होर्मुझची सामुद्रधुनी आमच्या भूभागाचं उल्लंघन करणाऱ्यांना वगळून सर्वांसाठी खुली आहे. आम्ही रणांगणावर या निराधार धमक्यांना खंबीरपणे तोंड देतो", अशा शब्दांत इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला प्रत्युत्तर दिले. (US-Israel-Iran War)
 
होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्याचा इराणचा इशारा

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट इशारा देत ४८ तासांत होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची धमकी दिली होती. पण या धमकीमुळे इराणने संताप व्यक्त केला आणि त्यानंतर इराणने ही सामुद्रधुनी अमेरिका आणि इस्रायल वगळता बाकी सगळ्यांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय घेतल्यानंतर काही तासांतच पुन्हा होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्याचा इशारा दिला. "जर इराणचे वीज प्रकल्प उद्धवस्त करण्याच्या अमेरिकेने दिलेल्या धमक्यांची अंमलबजावणी झाली तर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केली जाईल आणि जोपर्यंत आमचे नष्ट झालेले वीज प्रकल्प पुन्हा बांधले जात नाहीत तोपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी सुरू केली जाणार नाही", असा इशारा इराणच्या खतम अल-अंबिया या लष्करी कमांड युनिटने सरकारी टीव्हीवर प्रसारित केलेल्या एका निवेदनातून दिला आहे. (US-Israel-Iran War)
 
 
 
 
 


 
Powered By Sangraha 9.0