Ram Mandir: राममंदिर परिसरातल्या मंदिरांवरील ध्वजारोहणाचा मुहुर्त ठरला!

23 Mar 2026 17:41:38
 
 Ram Mandir
 
मुंबई : (Ram Mandir) श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने इतर मंदिरांवरील ध्वजारोहणाच्या तारखाही निश्चित केल्या आहेत. श्रीराम नवमीपूर्वी आणि त्यानंतर उर्वरित मंदिरांमध्ये ध्वजारोहण पूर्ण करण्यात येणार आहे. २ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण होणार आहे. इतर मंदिरांमध्ये हे कार्य टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाईल. याशिवाय चार मुख्य प्रवेशद्वारांपैकी तीनचे बांधकाम पूर्ण झाले असून चौथ्या प्रवेशद्वाराचे काम सुरू आहे. या द्वारांच्या लोकार्पणासह सर्व पंचायतन मंदिरांमध्ये दर्शन सुरू करण्याची योजना आखली जात आहे. (Ram Mandir)
 
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या बैठकीनंतर महासचिव चंपत राय आणि इतर न्यासीयांनी संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती दिली. श्रीराम नवमीपूर्वी आणि त्यानंतर उर्वरित सहा मंदिरांपैकी सूर्यदेव, माता भगवती, शिवजी, गणपती आणि शेषावतार मंदिरांवर ध्वजारोहण पूर्ण केले जाईल. २ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान मंदिरावर ध्वजारोहण होईल. मंदिर आंदोलन घराघरात पोहोचवणाऱ्या वरिष्ठ कार्यकर्त्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्याचा विचार आहे. यामध्ये विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, जयभान पवैया, सुरेंद्र जैन, कानपूरचे प्रकाश शर्मा आणि प्रयागचे केशव मौर्य यांचा समावेश असू शकतो. प्रत्येक ध्वजारोहण कार्यक्रमासाठी स्थानिक संत आणि गृहस्थ अशा सुमारे शंभर जणांना निमंत्रित करण्याची योजना आहे. (Ram Mandir)
 
जगद्गुरु रामानंदाचार्य, आदि शंकराचार्य आणि रामानुजाचार्य या नावांची द्वारे पूर्ण झाली आहेत, तर जगद्गुरु मध्वाचार्य द्वाराचे बांधकाम सुरू आहे. सर्व प्रवेशद्वारांचे सामूहिक ऑनलाइन लोकार्पण करण्यात येणार आहे. सर्व मंदिरांसह संपूर्ण परिसर भाविकांसाठी कधी खुला करायचा, याबाबत त्यांनी सांगितले की, सध्या अयोध्या देशातील अत्यंत संवेदनशील ठिकाण आहे. संपूर्ण परिसर पाहण्यासाठी चार तासांहून अधिक वेळ लागू शकतो आणि इतक्या मोठ्या परिसरातून लोकांना बाहेर काढणे हे श्रमसाध्य आहे. या विषयावर सतत चर्चा सुरू असून लवकरच निर्णय घेतला जाईल. मंदिर बांधकामासंदर्भात पुस्तिका आणि नोंदी तयार केल्या जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. (Ram Mandir)
 
 
Powered By Sangraha 9.0