PM Modi Lok Sabha speech : जागतिक तणावात भारत कसा टिकणार? ऊर्जा संकटावर मात करण्यासाठी भारताची रणनीती काय? पंतप्रधान मोदींनी सांगितला मास्टरप्लॅन

23 Mar 2026 20:05:25

PM Modi Lok Sabha speech
 
मुंबई : (PM Modi Lok Sabha speech) पश्चिम आशियातील सुरु असलेल्या संघर्षाचा फटका जगभरातील सर्वच क्षेत्रांना बसत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतात निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाची झळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सरकारने यावर अधिकृत भूमिका जाहीर करावी, अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात होती. अखेर सोमवारी २३ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पार्श्वभूमीवर सरकारने आखलेल्या धोरणाची माहिती देण्याकरता लोकसभेत भाषण केले. यावेळी विविध मुद्द्यांबाबत माहिती दिली. (PM Modi Lok Sabha speech)

होर्मुझ सामुद्रधुनीवरील बंदी अस्वीकार्य

"पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षावर आधीच भारताने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. पश्चिम आशियातील सर्व देशातील संबंधित नेत्यांशी मी चर्चा केली आहे. मी स्वतः हा तणाव कमी करून थांबवण्याचा आग्रह केला आहे. भारताने भारतीय नागरीक, ऊर्जा आणि वाहतुकीशी संबंधित हल्ल्यांचा विरोध केला आहे. व्यावसायिक जहाजांवरील हल्ला आणि होर्मुझ सामुद्रधुनीसारख्या आंतरराष्ट्रीय जलमार्गावरील बंदी अस्वीकार्य आहे. भारत डिप्लोमसीप्रमाणे युद्धाच्या परिस्थितीतही जहाजांच्या हालचालींकरता निरंतर प्रयत्न करत आहे. भारत प्रत्येकवेळी मानवतेच्या हिताकरता आणि शांतीच्या बाजूने आवाज उठवत राहिला आहे. संवाद आणि कुटनीतीतच या समस्येचं समाधान आहे. आमचा प्रत्येक प्रयत्न तणाव कमी करून संघर्ष संपवण्यासाठी आहे", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत म्हणाले. (PM Modi Lok Sabha speech)

सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

मानवता आणि शांततेप्रती भारताची भूमिका स्पष्ट करताना पंतप्रधान मोदींनी संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच संघर्षाचा एकमेव मार्ग असल्याचे पुनरुच्चार केला. तणाव कमी करून शत्रुत्व थांबवणे, तसेच कोणत्याही जीविताला धोका निर्माण होऊ न देणे हेच भारताचे ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले. “सर्व पक्षांनी लवकरात लवकर शांततेचा मार्ग स्वीकारावा, यासाठी भारत सातत्याने प्रयत्नशील आहे,” असे ते म्हणाले. "अशा संकटकालीन परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न काही घटक करतात. त्यामुळे देशातील अंतर्गत सुरक्षा यंत्रणांना हायअलर्टवर ठेवण्यात आले आहे. सागरी सुरक्षा, सीमा सुरक्षा, सायबर सुरक्षा मजबूत केल्या जात आहेत", अशी माहिती मोदींनी सभागृहाला दिली. (PM Modi Lok Sabha speech)

कोरोनाप्रमाणे आताही एकजुटीने राहावं लागेल

समारोप करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे जगात निर्माण झालेली कठीण परिस्थिती दीर्घकाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला तयार राहावे लागेल आणि एकजुटीने राहावं लागेल. कोरोनाच्या काळात जशी एकजूट दाखवली, तशीच पुन्हा या कठीण काळात दाखवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आताही त्याचप्रमाणे तयार राहण्याची गरज आहे. संयम, धैर्य आणि शांत मनाने या परिस्थितीशी सामना करायचा आहे. सरकार आणि नागरिक एकत्र आले तर कोणतेही आव्हान अडथळा ठरत नाही; हीच आपली ओळख आणि खरी ताकद आहे", असेही आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. (PM Modi Lok Sabha speech)

ऊर्जा संकटावर मात करण्यासाठी भारताची रणनीती काय?

ऊर्जा सुरक्षेला घेऊन गेल्या दशकात राबवलेल्या विविध धोरणांचे महत्त्व आजच्या संकटकाळात स्पष्टपणे दिसून येत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. भारताने गेल्या ११ वर्षांत ऊर्जा आयातीची विभागणी केली आहे. पूर्वी कच्चे तेल, एलएनजी, एलपीजी यांसाठी भारत २७ देशांवर अवलंबून होता, तर आता ही संख्या ४२ झाली असून कोणत्याही एका प्रदेशावरचे अवलंबित्व कमी करण्यास याचा मोठा फायदा झाला आहे, असे त्यांनी नमूद केले. गेल्या दशकभरात भारताने संकटाच्या अशाच काळात कच्च्या तेलाच्या साठवणुकीला प्राधान्य दिले आहे. आज भारतात ५३ लाख मेट्रिक टन अधिक स्ट्रेटजिक पेट्रोलिअम राखीव आहे. तर, ६५ लाख मेट्रिक टन राखीव ठेवता येईल, याकरता देश काम करत आहे. आपल्या तेल कंपन्यांकडे जे राखीव असतं ते वेगळं आहे. तर, गेल्या ११ वर्षांत तेलशुद्धीकरण क्षमतेत मध्येही उल्लेखनीय वृद्धी झाली आहे. अनेक देशांशीही सरकार संपर्कात आहे. जिथून शक्य होईल, तिथून तेल आणि गॅसची आयात होत राहील", असं आश्वासनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. (PM Modi Lok Sabha speech)

जागतिक पुरवठादारांशी सरकारचा सक्रिय संवाद सुरू असून तेल, वायू, खते आणि इतर अत्यावश्यक वस्तू आणणाऱ्या जहाजांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी आखाती नौवहन मार्गांवर सतत लक्ष ठेवले जात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. सागरी मार्ग सुरक्षित राहावेत यासाठी आंतरराष्ट्रीय भागीदारांशी सातत्याने समन्वय साधला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. “या प्रयत्नांमुळेच होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेली काही भारतीय जहाजे अलीकडे सुरक्षितपणे देशात पोहोचली आहेत,” असेही मोदी म्हणाले. (PM Modi Lok Sabha speech)
 
इथेनॉलच्या उत्पादनाचा फायदा
 
गेल्या १०-१२ वर्षांत इथेनॉलच्या उत्पादनासाठी अभूतपूर्व काम झाले आहे. दहा वर्षांपूर्वी फक्त १ डेड पर्संट वेल्डिंग कॅपासिटी होती. आता २० डेड पर्संट वेल्डिंग इथेनॉल निर्मित होत आहे. त्यामुळे दरवर्षी सुमारे साडेचार कोटी बॅरल कच्च्या तेलाची आयात कमी झाली असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वेच्या विद्युतीकरणामुळे दरवर्षी सुमारे १८० कोटी लिटर डिझेलची बचत झाली आहे. २०१४ मध्ये मेट्रोचं जाळं २५० किमीपेक्षाही कमी होते. आता ११०० किमीपर्यंत विस्तारले असून राज्यांना दिलेल्या १५,००० इलेक्ट्रिक बसमुळे इंधन बचतीत आणखी भर पडली आहे. "आम्ही इलेक्ट्रिक मोबालिटीवर भर दिला आहे. आज ज्या प्रमाणात वैक‌ल्पिक इंधनावर काम होतंय, त्यामुळे भारताचे भविष्य अधिक सुरक्षित होईल", असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले.
Powered By Sangraha 9.0