जखमेवर मीठ...

23 Mar 2026 12:04:58

एकवेळ पापी माणसाला क्षमा केली जाऊ शकते. मात्र, पापाला नाही असा बोध काही धार्मिक व्यक्तींनी केला आहे. या वचनामुळे व्यक्तीची मूल्ये तथा व्यक्ती तिच्या दुष्कृत्यांपासून वेगळे करता येते आणि दोषारोपांऐवजी सुधारणेवर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते. जगाच्या इतिहासामध्ये वारंवार असे प्रसंग आलेले आहेत, जिथे दोन समुदाय एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. अखेर काळाच्या एका टप्प्यावर तडजोडींच्या माध्यमातून का होईना; परंतु सलोखा प्रस्थापित करण्यासाठी लोकांनी शांततेचाच अवलंब केला. मानवजातीचा इतिहास हा अशाच काही घटनांचा आणि घटितांचा इतिहास आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक समाजघटक आपल्या समाजाचे आकलन करीत असतो. प्रत्येक समाजाची स्वतःची अशी वेगळी ओळख तयार होते आणि ती जपण्याचा प्रयत्न अगदी प्राणपणाने होतो.

जगभरातील कृष्णवणय समुदायाचा इतिहास हा संघर्षाचा आणि मानवमुक्तीसाठी झगडणाऱ्या लोकांचा इतिहास आहे. वसाहतवाद प्रस्थापित होण्यापूवपासूनच, गुलामगिरीचे साखळदंड या समुदायाच्या पायात अडकवले गेले. अनेक पाश्चिमात्य राष्ट्रे जी आज संपन्नतेचा टेंभा मिरवत आहेत, त्यांच्या खजिन्यातील संपत्ती ही अशा श्रमिकांच्या रक्तामासातूनच तयार झालीक्, हे वास्तव वेगळे सांगावयास नको. 21व्या शतकामध्ये वसाहतमुक्तीच्या विचारातून जेव्हा समाजाकडे बघितले जाते, त्यावेळेस इतिहासाकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवाच दृष्टिकोन तयार होतो. मात्र, अशातच, जर सत्ताकेंद्राचे लाभाथ आणि पीडित घटक आमने-सामने आले, तर एका प्रतिमेवरून काय गहजब होऊ शकतो, याची प्रचिती काही दिवसांपूवच आली.

दि. 10 मार्च 2026 रोजी लंडनमधील ‌‘सेंट जेम्स पॅलेस‌’ येथे, ‌‘कॉमनवेल्थ डे‌’निमित्त एका स्वागतसमारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स तिसरे यांनी, कॅरेबियन देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची आणि इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, एक ग्रुप फोटो काढण्यात आला, ज्यामुळे वादाची ठिणगी पडली. हा फोटो ज्याठिकाणी काढला गेला, त्यामागे भिंतीवर ‌‘किंग जॉर्ज चौथे‌’ यांचे एक भव्य तैलचित्र होते. या चौथ्या किंग जॉर्जने त्याकाळातच सत्तापद मिळवले, ज्याकाळात गुलामगिरीची प्रथा अस्तित्वात होती. इतकेच नव्हे, तर इतिहास अभ्यासकांच्या मते, राजा जॉर्ज याने ग्रेनाडामधील दोन सरकारी मळ्यांमधून आर्थिक नफा मिळवला होता, जिथे शेकडो कृष्णवणय गुलाम राबत होते.

गुलामगिरीचे समर्थन करत श्रीमंत झालेल्या राजाच्या चित्राखाली उभे राहून, कॅरेबियन देशांच्या प्रतिनिधींसोबत फोटे काढणे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखेच आहे, असे मत ‌‘ग्रेनाडा नॅशनल रिपॅरेशन कमिटी‌’चे अध्यक्ष आर्ले गिल यांनी व्यक्त केले. काहींच्या मते, ब्रिटिश राजघराणे आजही किती संवेदनाशून्य आहे, याचीच यातून प्रचिती येते. या कृत्यासाठी राजघराण्याने माफी मागावी, अशी मागणीसुद्धा काहींनी केली. वसाहतवादामुळे ज्या राष्ट्रांचे अध:पतन झाले, अशा राष्ट्रांमधील लोकांनी वेळोवेळी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. यावेळीसुद्धा अशीच मागणी करण्यात आली. या वादावर अर्थातच, राजघराण्याकडून कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही.

आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन देशांमध्ये ज्यावेळी कुठल्याही प्रकारचा संवाद घडतो, त्यावेळी काही शिष्टाचार, नियम ठरवून दोन्ही देशांमध्ये संवाद प्रस्थापित होत असतो. मात्र, अशातसुद्धा असे काही संकेत नजरेस येतात, ज्यातून पुन्हा एकदा वर्तमानाचे आकलन नव्याने होते. आपल्या इतिहासाची कुठली प्रतीके आपण जपून ठेवतो आणि कुठली रद्दबातल करतो, यालासुद्धा आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये महत्त्व आहे, हेच या घटनेतून दिसून आले आहे. वसाहतवादाच्या पाऊलखुणा आजही जगावर उमटल्या आहेत. 21व्या शतकामध्ये प्रवेश करताना अनेक छोटे-छोटे देश, त्यातील समुदाय आपल्या अस्सलपणाच्या खुणा शोधत आहेत. वसाहतवादामुळे एका बाजूला सामाजिक आणि आर्थिक नुकसान तर झालेच मात्र, त्याचबरोबर सांस्कृतिक पटलावर निर्माण झालेल्या पोकळीमुळे, अनेक पिढ्यांचेही मोठेच नुकसान झाले. आता पुन्हा एकदा नवीन पिढी आपल्या अस्तित्वाचा नव्याने शोध घेत आहे. त्यामुळे या पिढीला सामोरे जाणे वसाहतवादी सत्ताधीशांच्या लाभाथना सहजसोपे नसेल, हेच या प्रकरणातून दिसून आले आहे.

Powered By Sangraha 9.0