कोणत्याही कार्यक्रमाच्या यशामध्ये सूत्रसंचालकाची भूमिका महत्त्वाची. सूत्रसंचालन, निवेदन आणि मुलाखत या क्षेत्रांमध्ये आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या सुकन्या सुजित जोशी यांच्याविषयी...
सुकन्या यांनी वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केली व त्यानंतर मुंबई विद्यापीठातून ‘एमकॉम’ हे पदव्युत्तर शिक्षण घेतले. काहीकाळ त्यांनी नोकरी केली; पण या प्रांतात त्यांचे मन रमले नाही. त्यांचे कलासक्त मन त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यामुळे त्यांनी आकाशवाणीचा ’वाणी’ कोर्स विशेष प्रावीण्याने पूर्ण केला. नंतरच करिअरची नवी दिशा मिळाली.
अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर त्यांनी निवेदन, सूत्रसंचालन, मुलाखत या क्षेत्रांमध्ये स्वतःला झोकून दिले. नाशिक आकाशवाणीवर त्यांनी काहीकाळ ‘उद्घोषिका’ म्हणूनही काम केले. त्यानंतर त्यांनी वैयक्तिकरीत्या विविध कार्यक्रम आणि उपक्रमातून निवेदन, सूत्रसंचालन, मुलाखतकार, व्याख्याती, लेखिका म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. केवळ देशातच नव्हे, तर विदेशातसुद्धा त्यांनी दोन हजारहून अधिक कार्यक्रमांत सूत्रसंचालनाच्या माध्यमातून आपली छाप पाडली आहे. गेल्या 12 वर्षांपासून ज्येष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके यांच्याबरोबर, ‘गीतरामायण’, बाबूजींची गाणी, ‘ऋतू हिरवा’ अशा 400च्या वर कार्यक्रमात निवेदिका म्हणून काम केले आहे. त्याचप्रमाणे सलील कुलकण, रवींद्र साठे, नंदेश उमप, राहुल देशपांडे, महेश काळे, आरती अंकलीकर अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर अशा अनेक मान्यवरांबरोबरदेखील त्यांना काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
त्यांनी ‘सुस्वर क्रिएशन्स’ या संस्थेची स्थापना केली असून, त्या माध्यमातून संगीत क्षेत्रात विविध संकल्पना त्या राबवत असतात. ज्येष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके यांच्या सांगीतिक कारकिदला 50 वर्षे पूर्ण झाली आणि त्यांच्या वयाची 75 वर्षे पूर्ण झाली, यानिमित्ताने त्यांचा ‘सुवर्ण महोत्सवी’ प्रवास उलगडून दाखविणारा ‘येथोनी आनंदू रे’ या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन त्यांनी ‘अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान’ आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने केले. त्यांचे स्वतःचे युट्यूब चॅनेल असून, त्या माध्यमातून अनेक मान्यवर दिग्गजांचा प्रवास त्यांनी उलगडला आहे. त्यांनी ‘येथोनी आनंदू रे’ या उपक्रमात आतापर्यंत ‘पद्मश्री’ पद्मजा फेणाणी, भारतीय दूतावास डॉ. आसावरी बापट, निसर्गकन्या डॉ. अमिता कुलकण अशा अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या आहेत. रेडिओवर ‘कथा गीतरामायणाची’ आणि ‘आज काय विशेष?’ हे कार्यक्रमदेखील सादर केले. यापैकी ‘कथा गीतरामायणाची’ या कार्यक्रमाला ‘मोस्ट पॉप्युलर शो’ म्हणून गौरविण्यात आले. हा कार्यक्रम एकूण 12 देशांत चार लाखांहून श्रोत्यांनी ऐकला.
‘पोलीसलाईन’ आणि ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटांच्या मुहूर्ताच्या सूत्रसंचालनाची धुराही त्यांनी अतिशय यशस्वीपणे पार पाडली. ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’च्या महिला साहित्य संमेलनाचे सूत्रसंचालन, तसेच अनेक सांगीतिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शासकीय कार्यक्रांचेही सूत्रसंचालन त्यांनी केले आहे. त्या उत्तम लेखिका असून, आतापर्यंत ‘हॅशटॅग’, ‘बालजल्लोष’, ‘स्त्री विशेषांक’, ‘मागे वळून पाहताना’ असे लेखविविध अंकात लिहिले आहेत. ‘स्वरस्वामिनी आशा भोसले’ या पुस्तकात ‘सुधीर फडके आणि श्रीधर फडके या पितापुत्रांची आशाबाईंबरोबरची सांगीतिक कारकीर्द’ या प्रदीर्घ लेखाचे शब्दांकनही त्यांनी केले. ‘पद्मश्री’ पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांच्यावर ‘स्वरचंद्रिका’ या पुस्तकात पद्मजाताईंवरदेखील त्यांनी लेख लिहिला आहे. ‘पद्मश्री’ सुरेश वाडकर यांच्या कारकिदवर आधारित लेखही प्रसिद्ध झाला आहे.
यंदा प्रसिद्ध संगीतकार-गायक श्रीधर फडके यांच्या 50 वर्षांच्या सांगीतिक कारकिदचा आढावा घेणाऱ्या ‘अमृताच्या जणू ओंजळी’ या पुस्तकाचे शब्दांकनही केले आहे. या पुस्तकाला ‘पुस्तकरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘गमक सूत्रसंचालनाचे’ या सूत्रसंचालनावरील मार्गदर्शक पुस्तकाचे लेखनही त्यांनी डॉ. योगेश जोशी यांच्या सोबत केले आहे. या पुस्तकाला ‘साहित्यसंपदे’चा ‘उत्कृष्ट संकीर्ण संग्रह’ हा पुरस्कार प्राप्त झाला. गोव्यात ‘श्रावणधारा’ साहित्य संमेलनात, यंदा 13व्या संमेलनाध्यक्ष म्हणून पद त्यांनी भूषवले आहे. ‘बृहन्महाराष्ट्र मंडळा’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी साहित्य संमेलनात, काव्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मानही त्यांना मिळाला. काहीतरी वेगळे करावे, या भूमिकेतून त्यांनी ‘डिप्लोमा इन चाईल्ड सायकोलॉजी’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्या पालक व पाल्य समस्या-निर्मूलनासाठी विनामूल्य ‘फोनिक काऊन्सिलिंग करतात .सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक आदिवासी पाड्यांवर जाऊन, त्यांच्यासाठी आवश्यक ती मदत, तसेच त्यांच्या जीवनावर ‘डॉक्युमेंटरी’ करण्याचे काम सुरू आहे. अंध आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यातील सकारात्मकता टिकून राहण्यासाठी, त्या लहान व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे समुपदेशन करीत असतात.
डॉ. योगेश जोशी यांच्या संकल्पनेतून आयोजित केल्या जाणाऱ्या ‘अक्षरमंच प्रतिष्ठान’च्या ‘अखंड वाचन यज्ञ’ व इतर अनेक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. सध्या ‘कथा गीतरामायणाची’ आणि ‘गदिमा - शब्दशिल्पी’ या दोन व्याख्यानांचे वैयक्तिक सादरीकरण त्या करीत आहेत. त्यांच्या विविधांगी कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.