ज्योतिर्मयी ठेवा - शंकराचार्य मंदिर

22 Mar 2026 15:30:24

श्रीनगरच्या नयनरम्य दरीवर एक निःशब्द; तरीही जागरूक दृष्टी ठेवून उभा असलेला गुपाद्री पर्वत आणि त्याच्या शिखरावर विराजमान असलेले शंकराचार्य मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर काश्मीरच्या दीर्घ आणि गुंतागुंतीच्या इतिहासाचे, त्याच्या सांस्कृतिक सातत्याचे आणि भौगोलिक महत्त्वाचे एक सजीव प्रतीक आहे. या उंचीवर उभे राहिल्यावर जाणवते की, आपण एका मंदिराकडे पाहत नाही; तर एका अखंड सभ्यतेच्या प्रवाहाचे दर्शन घेत आहोत. अत्यंत बिकट परिस्थिती असताना, सगळीकडे हाहाकार माजलेला असताना, धर्माशी निगडित सर्व चिन्हे नष्ट होत असताना सनातनचा भगवा त्या भागात फडकत ठेवला, तो या मंदिराने. त्याविषयी आजच्या लेखातून जाणून घेऊया...

काश्मीरची भूमी प्राचीन ग्रंथांमध्ये ‌‘कश्यप-मरु‌’ म्हणून ओळखली जाते. ‌‘नीलमतपुराण‌’ या स्थानिक पुराणग्रंथात या भूमीच्या उत्पत्तीची जी कथा सांगितली जाते, ती केवळ पौराणिक नाही; तर त्या प्रदेशाच्या सांस्कृतिक स्मृतीचादेखील एक भाग आहे. कश्यप ऋषींनी ‌‘सत्यसर‌’ नावाच्या प्राचीन सरोवराचे पाणी बाहेर काढून ही सुपीक भूमी निर्माण केली, ही कल्पना काश्मीरच्या भूगोलाला एक आध्यात्मिक आयाम देते. ‌‘महाभारत‌’ आणि कल्हणकृत ‌‘राजतरंगिणी‌’ या ग्रंथांमध्येही काश्मीरचा उल्लेख सातत्याने येतो. विशेषतः ‌‘राजतरंगिणी‌’ हा ग्रंथ काश्मीरच्या राजकीय, सामाजिक आणि धार्मिक इतिहासाचा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज ठरतो, जिथे मंदिरसंस्कृती आणि राजसत्ता यांचा परस्परसंबंध स्पष्टपणे दिसतो.

या दरीचे महत्त्व केवळ पौराणिक किंवा धार्मिक नव्हते; ते भौगोलिकदृष्ट्याही अत्यंत निर्णायक होते. मध्य आशिया, गांधार म्हणजे सध्याचा अफगाणिस्तान आणि भारतीय उपखंड यांना जोडणाऱ्या व्यापारमार्गांवर काश्मीर एक महत्त्वाचा दुवा होता. रेशीममार्गाच्या विविध शाखा या प्रदेशातून जात असल्याने येथे व्यापाऱ्यांची, प्रवाशांची आणि साधकांची सतत ये-जा होती. या मार्गांमधून केवळ वस्तूंचीच नव्हे, तर विचारांचीही देवाणघेवाण झाली. बौद्ध धर्माचा प्रसार, काश्मिरी ‌‘शैव‌’ तत्त्वज्ञानाची उन्नती आणि पुढे ‌‘सूफी‌’ परंपरेचे आगमन हे सर्व या सांस्कृतिक संवादाचेच परिणाम होते.

अशा या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीवर गुपाद्री पर्वतावरील शंकराचार्य मंदिर उभे आहे. स्थानिक भाषेत ‌‘तख्त-ए-सुलेमान‌’ या नावानेही ओळखले जाणारे हे स्थळ, विविध परंपरांच्या संगमाचे प्रतीक आहे. मंदिराच्या प्राचीनत्वाबाबत मतभेद असले, तरी त्याची मूळ रचना इ.स. सहाव्या-सातव्या शतकांपर्यंत मागे जाते, असे मानले जाते. काही परंपरांनुसार हे मंदिर गोपादित्य राजाच्या काळात उभारले गेले. पुढील काळात विविध सत्ताधाऱ्यांनी त्यात बदल आणि दुरुस्ती केली. जहांगिराने आपल्या ‌‘तुझुक-ए-जहांगिरी‌’मध्ये या टेकडीवरून दिसणाऱ्या दृश्याचे कौतुक केले आहे, हे या स्थळाच्या सातत्यपूर्ण आकर्षणाचेच द्योतक आहे.

मंदिराकडे नेणारी पायरी ही केवळ एक मार्ग नाही; ती एक अनुभव आहे. दोन्ही बाजूंनी उभारलेल्या भिंतींमधून वर चढत असताना, शहर हळूहळू मागे राहते आणि एक वेगळाच शांततेचा प्रदेश सुरू होतो. या चढाईत एकप्रकारची साधना आहे, जणू बाह्य जगातून अंतर्मनाच्या दिशेने जाण्याचा प्रवास...

मंदिराच्या स्थापत्यरचनेत एक विलक्षण साधेपणा आणि तितकीच गूढता दिसून येते. उंच अष्टकोनी अधिष्ठानावर उभारलेले हे देवालय बाहेरून चौकोनी भासते, तर त्याचे गर्भगृह आतून गोलाकार आहे. ही रचना भारतीय मंदिर स्थापत्यातील एक आगळी वैशिष्ट्यपूर्ण परंपरा दर्शवते. येथे विस्तीर्ण मंडप नाही, शिल्पांची गद नाही. उलट, संपूर्ण लक्ष केंद्रित होते ते त्या शांत, केंद्रित गर्भगृहावर, जिथे शिवलिंग प्रतिष्ठित आहे. काश्मीरमध्ये आढळणाऱ्या कंजूर दगडाचा वापर करून बांधलेल्या या रचनेत एकप्रकारची स्थिरता आणि कालातीतता जाणवते. तिथेच शेजारी शंकराचार्यांची तपश्चर्येची खोली आहे, त्या छोट्याश्या खोलीत गेल्यावर संपूर्ण ब्रह्मांडाची ऊर्जा आपल्याला अनुभवता येते, तिथे डोळे मिटून शांत बसल्यावर आपणही त्या ऊर्जेबरोबर जोडले जातो.

मंदिराच्या इतिहासात विविध कालखंडांचे स्तर दिसतात. ‌‘पर्शियन‌’ भाषेतील शिलालेख, मुघल काळातील दुरुस्ती आणि शाहजहानच्या काळातील उल्लेख हे सर्व या स्थळाच्या सातत्यपूर्ण महत्त्वाची साक्ष देतात.

या मंदिराचे सर्वात गूढ आणि महत्त्वाचे पैलू म्हणजे त्याचे तत्त्वज्ञानाशी असलेले नाते. आदिशंकराचार्यांनी येथे येऊन ध्यान केले, अशी परंपरा सांगते. ‌‘अद्वैत वेदांता‌’च्या त्या सूक्ष्म विचारांचा अनुभव घेण्यासाठी ही उंची कदाचित आवश्यक होती, जिथून जगाचे वैविध्य एकरूपतेत विलीन होताना दिसते. येथे उभे राहिल्यावर ‌‘अहं ब्रह्मास्मि‌’ ही संकल्पना केवळ तत्त्वज्ञान राहत नाही; ती एक अनुभूती बनते.

श्रीनगरच्या दरीकडे पाहताना, दल सरोवराचे शांत पाणी, त्याच्या काठावरील वस्ती आणि दूरवरच्या पर्वतरांगा हे सर्व मिळून एक व्यापक दृश्य तयार होते. हे दृश्य केवळ भौगोलिक नाही; ते एक सांस्कृतिक नकाशा आहे, ज्यात इतिहास, व्यापार, श्रद्धा आणि तत्त्वज्ञान यांचे धागे एकत्र गुंफलेले आहेत.

शंकराचार्य मंदिर हे त्या सर्व प्रवाहांचे एक शांत केंद्र आहे, जिथे इतिहास बोलत नाही; पण जाणवतो. जिथे स्थापत्य दिसते; पण त्यामागील विचार अधिक प्रभावी ठरतो आणि जिथे उंची ही केवळ भौतिक नसून, अंतर्मुखतेची बनते. अखेरीस गुपाद्रीच्या शिखरावर उभे राहून जेव्हा आपण खाली पसरणाऱ्या जगाकडे पाहतो, तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होते की, मंदिर हे केवळ देवतेचे निवासस्थान नसते, ते एक दृष्टिकोन असते आणि त्या दृष्टिकोनातून पाहिल्यावर संपूर्ण विश्व एकाच शांत, अद्वैत अनुभूतीत विलीन होत जाते.

- इंद्रनील बंकापुरे
7841934774



Powered By Sangraha 9.0