राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - एक वैचारिक मंथन

22 Mar 2026 15:26:51

‌‘भारतीय विचार साधना, पुणे‌’ प्रकाशित, तसेच दिलीप क्षीरसागर, अरूण करमरकर आणि दिलीप करंबेळकर लिखित ‌‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ‌’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल, शनिवार, दि. 21 मार्च रोजी सायंकाळी पुणे येथे संपन्न झाला. त्यानिमित्ताने रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी लिहिलेली पुस्तकाची प्रस्तावना देत आहोत.

सन 1925 मध्ये सुरू झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाली आणि एका समूहाने घेतलेले राष्ट्रसेवेचे व्रत आजतागायत हजारो शाखांच्या माध्यमातून संपूर्ण देशभर कार्यरत झाले. या 100 वर्षांच्या वाटचालीचे सिंहावलोकन केले, तर लक्षात येते की, आपला मूळ उद्देश कायम ठेवून संघटनेचा व्यापक विस्तार करताना ‌‘स्वयंसेवकभाव‌’ जोपासत, या कार्याचा विस्तार झाला आहे. आपण जेव्हा या विस्तारित कार्याचा अनुभव घेतो आणि जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये झालेले योगदान पाहतो; तेव्हा यामागे अशी कोणती कारणे आहेत, ज्यामुळे लोकजीवनातले हे कार्य आपल्या ध्येयापासून कधीही फारकत न घेता निरंतर मार्गक्रमण करत राहिले, असा प्रश्न मनात उभा राहतो. नेमके याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी पुस्तकाच्या तिन्ही लेखकांनी उत्तम विचार येथे मांडले आहेत. या वैचारिक मंथनातून आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे काय, हे समजून घेण्याची संधी मिळालेली आहे. त्यामुळे हे पुस्तक उपयोगी ठरणार आहे.

या पुस्तकामध्ये ‌‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ‌’ या तीनही शब्दांची योग्य व्याख्या करण्याचा प्रयत्न दिसून येतो. खरेतर ‌‘राष्ट्रीय‌’ ही एक भावना आहे, चरित्र आहे. आपल्या समाजात अनेक समूह आहेत, त्या प्रत्येक समूहांची एक ओळख असते. हे समूह आपल्या कुटुंबाशी जोडलेले असतात, आपापल्या गावाशी जोडलेले असतात. समाजात आज जी जातिव्यवस्था आहे, त्याच्याशी जोडलेले असतात. एखाद्या भाषेशी, प्रदेशाशी जोडलेले असतात. या सगळ्या अस्मिता, परिचय यांना जोपासणारी जी व्यापक भावना आहे; ज्याला ‌‘अखिल भारतीय दृष्टिकोन‌’ म्हणता येईल, अशी सगळ्यांना सामावून घेणारी जी उदात्त भावना आहे, तीच ‌‘राष्ट्रीय भावना‌’ आहे.

या राष्ट्रीय भावनेतून आपण राष्ट्रीय एकात्मता आणि संकल्पना समजून घेऊ शकतो. राष्ट्रीयत्वाची भावना म्हणजेच एकत्वाची भावना आहे. ‌‘आपण सगळे एक आहोत, आपण सगळे एकमेकांचे बांधव आहोत,‌’ ही ती भावना आहे. हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून बघितले; तर लक्षात येईल की, आपण वेगवेगळे नाही; तर एकमेकांशी जोडलेले आहोत, हे चिरंतन सत्य आहे.

‌‘हिंदुत्व‌’ म्हणजे काय? हिंदुत्व म्हणजे एकत्व आहे, सर्वांमध्ये एक समान तत्त्वाची धारा वाहते आहे. एका समान धाग्याने आपण जोडले गेलेलो आहोत, ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी हिंदुत्वाची समज आहे. या समजाच्या आधारावरच आपली राष्ट्रीयता घडली आहे. ही बांधिलकी लक्षात घेऊन आपला व्यवहार असला पाहिजे. सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची आपली मानसिकता असली पाहिजे. हा राष्ट्रीय दृष्टिकोन आहे आणि या आधारावरच आपली संस्कृती विकसित झाली आहे.

एकत्वाच्या आधारावर आपली जीवनदृष्टी तयार झाली, त्याप्रमाणे आपला व्यवहार होऊ लागला. त्यावर आधारित परंपरा तयार झाल्या, जीवनपद्धती बनली; ज्याला आपण ‌‘हिंदू संस्कृती‌’ म्हणतो. या हिंदू संस्कृतीचे जिथे पालन केले जाते, हजारो वर्षांची साधना करून या एकत्वाच्या भावनेने आणि संस्कृतीच्या आधारावर जिथे जोपासना केली जाते, ते जे राष्ट्र आहे, तो जो देश आहे, त्याचे नाव ‌‘हिंदुराष्ट्र‌’ आहे.

अशी भावना, ज्यात भेदाभेदाला स्थान नाही, असे राष्ट्र म्हणजे ‌‘हिंदुराष्ट्र‌’, जे सगळ्यांकरिता बनले आहे. सगळ्यांना सामावून घेऊन, सगळ्यांच्या कल्याणाची चिंता करत आहे, ते म्हणजे ‌‘हिंदुराष्ट्र‌’ आहे. जिथे आपण तत्त्वाने एक आहोत, इतिहासाने एक आहोत, वर्तमानात एक आहोत आणि जिथे भविष्यात एक असणार आहोत, ते आपले ‌‘राष्ट्र‌’ आहे. ‌‘हिंदुराष्ट्र‌’ ही अशा प्रकारच्या राष्ट्राची कल्पना आहे. ही राष्ट्रीय भावना वृद्धिंगत करत, त्याच्या आधारावर राष्ट्रउभारणी करायची आहे, अशा भावनेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बनला आहे.

या विचारांत केवळ व्यक्तिगत चारित्र्य उत्तम असून चालणार नाही. वैयक्तिक सद्गुण असतील, तरी ते पुरणार नाहीत; तर त्या सद्गुणांची दृष्टी व्यापक असली पाहिजे, संपूर्ण समाजाकरिता उपयोगी पडली पाहिजे. त्यामुळे राष्ट्रातील सर्वांची सुख-
दुःखे एक होतात. मित्र-शत्रू एक होतात आणि समर्पणाची भावना प्रबळ होते, स्वाभिमानाचे विषय एक होतात.

आपल्या राष्ट्राची सामूहिकतेची हजारो वर्षांची साधना प्रत्येक पिढीने केलेली आहे. त्यादृष्टीने ‌‘सं गच्छध्वम्‌‍‌’ (सर्वांना एकत्र चालायचे आहे.) ही दृष्टी ठेवून पुढील साधना करायची आहे. त्या साधनेलाच ‌‘राष्ट्रीय‌’ संबोधले आहे. त्याअर्थाने, ‌‘राष्ट्रीय‌’ शब्दाचा विचार करणे आवश्यक आहे.

स्वयंसेवक हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा घटक आहे आणि राष्ट्रीय भावनेने चालणाऱ्या या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा घटक होण्याकरिता स्वतःहून जी सिद्धता करायला हवी, त्यासाठी स्वयंसेवक सातत्याने प्रयत्न करत राहतो आणि आपण एक चांगली व्यक्ती व्हावे, एक चांगला सामाजिक कार्यकर्ता व्हावे, या अर्थाने तो सतत प्रयत्न करतो. त्याची तत्पर होण्याची जी साधना आहे, ती शाखेच्या माध्यमातून अविरत सुरू असते. ही एकप्रकारे सद्गुणांची साधना आहे. व्यक्तिगत सद्गुणांबरोबर सामाजिक सद्गुण म्हणजे सामूहिक काम करणे, सर्वांना एकत्र घेऊन काम करणे आणि यातून संघभावना विकसित व्हावी म्हणून तो सतत प्रयत्न करतो, स्वतःमध्ये बदल करतो, स्वतःच्या अंगी अनुशासन बाणवतो, स्वतःच्या मनाला, शरीराला एक शिस्त लावतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इतर लोक काय विचार करतात याचा विचार न करता, स्वतःची जबाबदारी समजून ते काम योग्य आणि चांगल्याप्रकारे वेळात वेळ काढून, त्या कामाला प्राथमिकता देऊन करायचे आहे, अशा भावनेने जो स्वतः त्या कामाकडे बघतो आणि स्वतःला तयार करतो, असा तो ‌‘स्वयंसेवक‌’ असतो. अशा स्वयंसेवकांची एक मालिकाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये तयार झालेली आहे. यासाठी जो प्रयत्न केला जातो, तो संघामध्ये पहिल्या दिवसापासून सुरू आहे. शाखेची सुरुवात झाल्यावर तिथे होणाऱ्या कार्यक्रमांचे अवलोकन केले, तर स्वयंसेवक घडवणे यादृष्टीने सर्व कार्यक्रमांची आखणी केलेली असते. खेळ, संस्कारप्रधान कार्यक्रम अशाच पद्धतीने तयार करण्यात आलेले असतात; त्याचबरोबर राष्ट्राचा परिचय करून देण्यासाठी योग्य असे कार्यक्रम तयार केलेले असतात. संघभावनेच्या वाढीसाठी सामूहिक कार्यक्रमांच्या रचना असतात. हे सर्व कार्यक्रम राबवताना शाखेची वेळ पाळणे, शिस्त पाळणे, शिक्षकांची आज्ञा पाळणे या गोष्टीदेखील अंतर्भूत असतात, ज्यातून एका उत्तम व्यक्तीची घडण होऊन तो स्वयंसेवक भावनेने काम करू लागतो.

याशिवाय, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर संघटनांमध्ये सार्वजनिक, राजनैतिक उद्देशांवर भर असतो, त्याकरिता घोषणापत्रे तयार केली जातात. परंतु, संघामध्ये मात्र व्यक्तिनिर्माणावर भर असतो. त्यामुळे जो कार्यकर्ता आहे, त्याच्याकडे कार्यपूतसाठी त्याची ध्येयनिष्ठा असते, ते ध्येय गाठण्यासाठी अजेय शक्ती असते, त्याचबरोबर त्याच्याकडे सात्त्विक-सत्शील चारित्र्य असते, ध्येयानुरूप संकल्प असतो आणि त्याने वीरव्रत धारण केलेले असते. ज्याप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, ‌‘बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे‌’ त्याप्रमाणे हे व्रत स्वयंसेवकाने समजून-उमजून धारण केलेले असते. अशा स्वयंसेवकाची ज्ञानसाधनादेखील मोठी असते. अशा सद्गुणांनी युक्त आपण व्हावे, यासाठी सतत प्रयास करणारा, स्वयंसंकल्पित जो व्यक्ती आहे, तो म्हणजे ‌‘स्वयंसेवक‌’. या सर्व गोष्टींना संघामध्ये अतिशय महत्त्व आहे. ही गुणवाहकता एका काळापुरती मर्यादित नाही, तर एका चांगल्या आणि उन्नत स्वयंसेवकनिर्माणासाठी हे व्रत आजीवन स्वीकारले जाते आणि याच भावनेने स्वयंसेवक दैनंदिन शाखेत जातो. या सर्वांमुळे त्याच्यामध्ये संघभावना विकसित होते.

संघ म्हणजे ‌‘सतत चालणारा संघ.‌’ स्वाथ भावनेने मनुष्य अधिक काळ एकत्र राहू शकत नाही; परंतु आपल्या व्यक्तिगत इच्छा बाजूला ठेवून आपल्या शुद्ध चारित्र्याने, भावनांवर नियंत्रण ठेवून, दुसऱ्याकरिता त्यागाची आणि समर्पणाची भावना ठेवून, आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवून जे एकत्र येतात, त्यांची संघभावना जागृत झालेली असते; ज्यातून संघ बनतो. या सर्वांमधून सामूहिक कामे होतात, नेतृत्वावरील विश्वास वाढतो आणि ते काम करण्याची दिशा मिळते. कामाला गती प्राप्त होते. यातून कामाला महत्त्व दिले जाते आणि कोणत्याही पदाचा विचार न करता, खुल्या चर्चेतून ते काम योग्य रीतीने पूर्ण होते. एखादी गोष्ट ठरली की, प्रमुख असो अथवा सामान्य स्वयंसेवक; प्रत्येकजण आज्ञापालन करतो. लोकतांत्रिक स्वरूप आणि आज्ञापालन या दोन्ही गोष्टी संघामध्ये सामावलेल्या असतात.

संघभावनेतून एक शक्ती विकसित होते आणि या भावनेचा सदुपयोगदेखील होतो. सामूहिक सदिच्छेपोटी संघाचा जन्म झाला आहे. यामध्ये सर्वांसाठी उद्देश, सकारात्मक भावना महत्त्वाची असते. या भावनेच्या मुळाशी ‌‘लोककल्याण‌’ असते. ‌‘राष्ट्राचे परमवैभव‌’ हा संकल्प असतो. या आधारावर ज्याचे चरित्र हे राष्ट्रीय असेल आणि भावना स्वयंसेवकाची असेल, अशी व्यक्तिनिर्माणाची प्रारंभी कल्पना केली गेली आणि या 100 वर्षांमध्ये त्याचे स्वरूप अधिकाधिक विकसित व्हावे, यासाठी प्रयत्न होऊ लागले.

आज 100 वर्षांनंतरसुद्धा हीच संकल्पना आहे. जे मूर्त स्वरूप आहे, ते अत्यंत प्रेरक आहे, प्रासंगिक आहे आणि त्याची आजही तेवढीच आवश्यकता आहे. ही एक पद्धती आहे, ज्यानुसार राष्ट्रउभारणीकरिता संघासारखी जी व्यवस्था निर्माण होते, ती राष्ट्रसमर्पित असते आणि ती व्यवस्था राष्ट्रउभारणीसाठी योगदान देऊ शकते. प्रस्तुत पुस्तकाच्या तिन्ही लेखकांनी प्रश्नांची उकल करून उदाहरणासहित सादर करण्याचा प्रयत्न केला आहे, तो समर्पक आहे आणि याचा सर्वच वाचकांना उपयोग होईल, असा माझा विश्वास आहे.

पुस्तकाविषयी...
पुस्तकाचे नाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
लेखक : दिलीप क्षीरसागर,
अरुण करमरकर, दिलीप करंबेळकर
प्रकाशक : भारतीय विचार
साधना, पुणे
पृष्ठसंख्या : 128
मूल्य : 130 रुपये
पुस्तकासाठी संपर्क : 9359527245

- सुनील आंबेकर
(लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख आहेत.)


Powered By Sangraha 9.0