जनजातींच्या बळजबरी धर्मांतरणाला आळा घालणारा धर्मस्वातंत्र्य कायदा

22 Mar 2026 14:51:18

फसवणूक, बळजबरी, आमिष दाखवून झालेल्या धर्मांतरणाला समाजातील गरीब, वंचित तसेच जनजाती समाज प्रामुख्याने बळी पडलेला दिसतो. परंतु, ‌‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, 2026‌’ विधिमंडळात मंजूर झाल्याने विधेयकाचे लवकरच रुपांतर कायद्यात होईल व अशा धर्मांतरणाला आळा बसेल. त्यानिमित्ताने जनजाती समाजातील धर्मांतरणाचा गंभीर प्रश्न आणि या कायद्याच्या जनजागृतीची गरज अधोरेखित करणारा हा लेख...

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, 2026‌’ लवकरात लवकर लागू होईल, त्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारचे हार्दिक अभिनंदन! ओडिशा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, तामिळनाडू आणि आता महाराष्ट्र सरकार या अधिनियमात सहभागी होत आहे, त्याबद्दल आनंदच आहे. कारण, सामान्य जनतेची अनेक वर्षांची मागणी यानिमित्ताने पूर्ण होत आहे. या अधिनियमाचा धाक हा ज्या दिवसापासून लागू होईल, तो सुदिनच. कारण, आतापर्यंत झालेल्या अवैध धर्मांतराच्या बाबतीमध्ये कदाचित फरक पडणार नाही; परंतु यापुढे किमान असंविधानिक धर्मांतर कायद्याच्या आणि शिक्षेच्या कक्षेत आलेले आहे, हे महत्त्वाचे आहे.

कोणत्याही सरकारी विधेयकाचे अथवा अधिनियमाचे विलेषण करायचे झाले, तर एकतर कायदेशीरदृष्ट्या करावे लागते. कारण, त्याच्यामध्ये म्हटलेल्या गोष्टी, निश्चित केलेल्या अथवा व्याख्या केलेल्या बाबी लोकांसमोर जशाच्या तशा आणणे थोडे अवघड असते. परंतु, मूळ गाभा सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने त्याची व्याख्या करणे फार महत्त्वाचे असते. कारण, कोणताही कायदा अथवा अधिनियम हे सर्वसामान्यांच्या भल्यासाठी व संरक्षणासाठीच अस्तित्वात आलेले असतात.

कोणताही कायदा किंवा अधिनियम करताना व्यापक स्तरावर चर्चा केली जाते. ‌‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, 2026‌’ हा या सर्व प्रक्रियेच्या माध्यमातूनच तयार झालेला आहे, त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करताना सूचना करावीशी वाटते की, हा कायदा अधिकाधिक आणि जिथे आजही षड्यंत्राच्या माध्यमातून जबरदस्तीने, आमिष दाखवून, सामूहिक पद्धतीने धर्मांतरण केले जाते, त्याठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवण्याची एक प्रभावी प्रचार यंत्रणा उभी केली पाहिजे. हा कायदा निर्माण होण्यासाठी ज्या सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतलेला आहे, त्यांनाही विश्वासात घेऊन यात सहभागी करून घेतले पाहिजे, तर सर्वसामान्यांना समजेल, विशेष करून जनजाती क्षेत्रासाठी या कायद्याने होणारे फायदे हे आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊ.

दक्षिण आफ्रिकेचे नेते जोमो केन्याटा यांनी धर्मांतरणासंदर्भातील एका परिषदेमध्ये आपले मत मांडताना म्हटले होते की, “जेव्हा ख्रिश्चन मिशनरी आफ्रिकेमध्ये आले, तेव्हा त्यांच्याकडे ‌‘बायबल‌’ होते आणि आमच्याकडे जमीन! त्यांनी आम्हाला डोळे बंद करून प्रार्थना करायला सांगितली. जेव्हा आम्ही डोळे उघडले, तेव्हा आमच्या हातामध्ये ‌‘बायबल‌’ आणि आमची जमीन त्यांच्याकडे होती.” असे हे एका व्यक्तीपासून सुरू होणारे धर्मांतरण प्रथमतः त्या परिवाराचे, नंतर त्या समाजाचे आणि पर्यायाने देशाचे पण धर्मांतरण करते. स्वामी विवेकानंदांनी हे आवर्जून सांगितलेले होते की, एक व्यक्ती जेव्हा हिंदू सनातन धर्म सोडून जातो; तर तो केवळ एका संख्येने कमी होतो असे नाही, तर तो देशाच्या शत्रूमध्ये अथवा देशद्रोहींमध्ये त्याची वाढ करीत असतो.

जेव्हा हिंदू धर्माला कंटाळून पूजनीय बाबासाहेब आंबेडकर हे अन्य धर्म, उपासना पद्धती तपासत होते, तेव्हा महाराष्ट्राचे संत गाडगे महाराज यांनी त्यांना आवर्जून एकच सांगितले की, “ख्रिश्चन अथवा मुसलमान होऊ नका.” याचा अर्थ, धर्मांतराच्या बाबतीमध्ये आमच्या सर्व संतांनी, महनीय व्यक्तींनी वेळोवेळी प्रमुखांना आणि लोकांना सावध केलेले आहे आणि त्याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आता ‌‘भारतरत्न‌’ बाबासाहेबांच्या संविधानाने जी काही रूपरेखा धर्मांतराच्या बाबतीमध्ये स्पष्ट केलेली आहे, त्याचा अर्थ अथवा अनुच्छेद-कलमे आहेत, त्याच आधाराने महाराष्ट्रामध्ये हा कायदा अमलात आणला गेलेला आहे.

2011च्या जनगणनेमध्ये खरेतर धर्मांतराचे वास्तविक भयानक स्वरूप आपल्याला पाहायला मिळाले. अनेक जिल्ह्यांत पहिल्यांदा ‌‘ओआरपी‌’ म्हणजे ‌‘अदर रिलीजन परस्युएशन‌’ अशा पद्धतीने नोंद केली गेली, नंतर अशी मोठी संख्या ही ख्रिश्चन अथवा मुसलमान धर्मात धर्मांतरित करून अनेक जिल्हेच्या जिल्हे हे हिंदुत्वाची नाळ तोडून त्याची ‌‘डेमोग्राफी‌’ आणि त्याचे अस्तित्व बदलण्यात आले आणि याच आधाराने देशाची अंतर्गत सुरक्षा, देशाच्या सीमा असुरक्षित करण्यात आल्या. राज्ये असुरक्षित करण्यात आली आणि एका अर्थाने भारतीय लोकशाही अधू करण्याचा प्रयत्न झाला.

महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने या कायद्याची व्याख्या केलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने आठ गोष्टी या विचारात घेतलेल्या आहेत - 1) आमिष 2) जबरदस्ती 3) फसवणूक 4) बळजबरी 5) दिशाभूल 6) धमकी 7) गैरवाजवी प्रभाव 8) अथवा कोणत्याही लबाडीचा मार्ग.

वरील आठ गोष्टींचा विचार करता, प्रामुख्याने धर्मांतराचे क्षेत्र हे आदिवासीबहुल क्षेत्र अथवा तथाकथित दलित समाज व त्यासंबंधीतील वस्ती हे पाहायला मिळते.

विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे, जगाच्या नकाशावर वसाहतवादासाठी म्हणून बाहेर पडलेल्या इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांनी जवळजवळ सर्व ठिकाणी तेथील स्थानिक लोकांना एकतर मारून टाकले अथवा त्यांचे धर्मांतर करून ख्रिश्चन देश निर्माण केले अथवा मुसलमानांचा इतिहास बघता त्यांनी तलवारीच्या जोरावर आणि जोरजबरदस्तीने पुरुषांचा नरसंहार करून तेथील महिलांना आपल्या जनानखान्यात बंदिस्त करून जगावर इस्लामचा झेंडा रोवण्याचा प्रयत्न केला.

परंतु, भारतामध्ये साधारणतः 11व्या शतकापासून ते 1947 पर्यंत जी काही आक्रमणे झाली, त्यात सनातनी अस्मिता व अस्तित्व मिटवण्यासाठी मूर्तिभंजनाच्या बरोबरीने अघोरी अन्याय-अत्याचार करत, महिलांना बाटवून धर्मांतरित करण्याचे लाखो प्रयत्न झाले. परंतु, ‌‘कुछ तो खास बात हैं इस मिट्टी में की, इतने होने के बाद भी हस्ती हमारी मिठी नही.‌’ त्यामुळे जे क्रूर आक्रांतांच्या काळात किंवा संपूर्णपणे इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या काळात पण संपूर्ण धर्मांतरण होऊ शकले नाही, ते प्रमाण स्वातंत्र्यानंतर मात्र भारतामध्ये अधिक प्रमाणात झालेले आपल्याला पाहायला मिळते. त्यातही मुस्लीम धर्मांतराला प्रत्यक्षपणे विरोध झाला; परंतु ख्रिश्चन धर्मांतराला विरोध झालेला दिसत नाही. कारण, त्यांचे धर्मांतरांचे छुपे प्रयत्न हे मायाजाल, मायावी रूप समजायलाच लोकांना 70 वर्षे जावी लागली.

इंग्रजांनी एकूण चार आमच्या साहाय्याने भारत काबीज केला. त्यातील चौथी आम म्हणजे ‌‘चर्चप्रणीत मिशनरी‌’ होते. यांच्यामार्फत पहिल्यांदा सेवेच्या नावाखाली सुरू केलेल्या रुग्णालये व शाळा यांतून धर्मपरिवर्तन करायला सुरुवात केली. भगवान बिरसा मुंडा यांनाही इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी संपूर्ण परिवाराचे प्रथम धर्मांतरण केले गेले. बिरसा मुंडा यांचे नाव त्या काळात ‌‘डेविड‌’ असे झाले होते. त्या काळापासूनच विशेष करून इंग्रजांच्या राजवटीला जो आपल्या तीरकमान, भाला आणि गनिमी काव्याच्या शस्त्राने लढत राहिला, ज्यांना इंग्रज शेवटपर्यंत गुलाम करू शकले नाहीत, अशा जनजाती समाजामध्ये नंतर-नंतर त्यांनी सेवेच्या माध्यमातून प्रवेश केला आणि शिक्षणाच्या बरोबरीने आरोग्याची मंत्रित सेवा उपलब्ध करून देताना धर्मांतर करून आणले.

या धर्मांतराचे परिणाम इतके पाहायला मिळाले की, जो व्यक्ती धर्मांतरित होतो; तो आपली नाती, आपले संस्कार, आपली परंपरा सर्व विसरून जातो. दोन वर्षांपूव ‌‘धर्मांतराचे जनजाती समाजावर होणारे परिणाम‌’ यानिमित्ताने एक व्यापक सर्वेक्षण करताना महाराष्ट्राच्या पालघर, डहाणू, धुळे जिल्ह्यांमध्ये जी परिस्थिती समोर आली, धर्मांतरित झालेल्या परिजनांनी आपल्या ज्या कथा-कहाण्या सांगितल्या, त्या खरोखरच अत्यंत वेदनादायक होत्या.

धर्मांतरण म्हणजेच राष्ट्रांतरण. धर्मांतरण म्हणजेच तुमच्या संस्कृती, परंपरेच्या विरोधात जाऊन आपली मानसिकता उभी करणे! याचे उदाहरण म्हणून एका व्यक्तीने सांगितले की, “माझी बहीण ख्रिश्चन झाली आणि जेव्हा ती रक्षाबंधनाला आली नाही म्हणून मग मी गेलो, त्यावेळेला तिने सांगितले की, “मी आता धर्मांतरित झालेली आहे. माझा हिंदू धर्माशी संबंध नाही. तुला भाऊ मानत नाही आणि त्यामुळे तुला मी राखी बांधणार नाही.” किमान या धर्मांतरामुळे यापुढे तरी कोणत्याही भावाची अशा पद्धतीने आपल्या बहिणीकडून रक्षाबंधन साजरे होणार नाही, असे आपण समजू.

दुसरी गोष्ट म्हणजे, धर्मांतरित झालेल्या लोकांना ज्या पद्धतीने शिक्षण-सुविधा दिल्या जातात, त्यामुळे वर्तमान अनेक प्रवेश परीक्षेमध्ये हे धर्मांतरित झालेले किंवा दुहेरी लाभ घेणारे लोक मोठ्या प्रमाण्ाात पात्र होऊन उच्चशिक्षण घेतात आणि जेव्हा नोकरी लागण्याची वेळ येते, तेव्हा पुन्हा जनजाती समाजाचे प्रमाणपत्र घेऊन राजरोसपणे नोकरीला लागतात आणि मग पुन्हा एकदा ‌‘मजहबी‌’ नियमांचे पालन करतात. याचा अर्थ, नोकरीसाठी जनजातीचे प्रमाणपत्र; परंतु आयुष्य ज्ञापन करण्यासाठी , आराम, अन्य सुविधांसाठी धर्मांतरित होण्याचे प्रमाणपत्र वापरले जाते.

खरेतर धर्मांतरित झालेल्या व्यक्तीला स्वतःहून दंडाधिकाऱ्याच्या समोर कायदेशीर पद्धतीने लिहून द्यावे लागते की, ‌‘मी आजपासून माझी मूळ परंपरा त्यागून धर्मांतरित होत आहे‌’; परंतु असे प्रसंग फार कमी आहेत. केवळ चर्चमध्ये नाव नोंदविणाऱ्या लोकांना ‌‘क्रिप्टो ख्रिश्चन‌’ म्हटले जाते.

विद्याथ परिषदेचे मुंबईमध्ये काम करताना आमच्या सोबत काम करणारी एक ख्रिश्चन भगिनी, एकूण धर्मांतर कसे होते, हे पाहण्यासाठी म्हणून आम्ही एका ठिकाणी गेलो होतो आणि तिथे तो धर्मांतरित झालेला ‌‘पास्टर‌’ होता. त्यांनी आम्हाला अर्थात, माझ्यासोबत असलेल्या ख्रिश्चन मुलीला भगवान येशूने काय-काय सांगितलेले आहे, तुम्ही ख्रिस्ती धर्मामध्ये आल्यानंतर काय-काय तुम्हाला फायदे होऊ शकतात, मला काय-काय फायदे मिळतात, असे सर्व स्पष्टपणे सांगितले होते. तसेच अनेक ठिकाणी जे कुष्ठरोगी-महारोगी राहतात, त्यांच्या मुलांना समाजामध्ये स्थान नसते. अशा अनेक मुलांना घेऊन चर्चच्या मोठ्या शाळेमध्ये शिकवले जाते आणि तिथून त्यांना ‌‘पास्टर‌’ बनवून धर्मपरिवर्तन करायला पाठविले जाते.

संविधानानुसार आपल्या धर्माचा प्रचार करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. धर्मपरिवर्तनाचाही अधिकार प्रत्येकाला आहे. परंतु, भारताने याबाबतीमध्ये जी उज्ज्वल परंपरा निर्माण केलेली आहे, त्याचे पालन झाले पाहिजे. जेव्हा स्वामी विवेकानंदांना भेटायला एक व्यक्ती आली आणि त्यांच्या विचाराने प्रभावित होऊन त्यांनी सांगितले की, “मला हिंदू धर्मामध्ये येऊन मोक्षप्राप्ती करायची आहे.” त्यावर स्वामी विवेकानंदांनी त्यांना हे स्पष्ट केले की, “तुम्ही भगवान येशूचे चिंतन करा. तुमच्या धर्माचे, नियमांचे पालन करा. तुम्हाला मोक्ष नक्की मिळेल.”

एका बाजूला भारतीय उदात्त परंपरा की, तुम्ही तुमच्या धर्माचे पालन नक्की करा. तुम्हाला मोक्ष मिळेल; तर दुसऱ्या बाजूला ऐनकेन प्रकाराने आपल्या धर्माची, धर्मांतरित लोकांची संख्या वाढवत या देशाच्या मतदारयादीमध्ये, या देशाच्या एकूणच संरक्षणाला, या देशाच्या सार्वभौमत्वाला व संविधानाला ठेच पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते महाराष्ट्रामध्ये साधारणतः जनजाती क्षेत्रामध्ये आपण वर्षानुवर्षे पाहिलेले आहे. या कायद्याने त्याला आळा बसेल, अशी आपण अपेक्षा करूया.

दुसऱ्या बाजूने मुसलमानांचे जे आक्रमण आहे, ते वेगळ्या पद्धतीचे आहे. अनेक जनजाती-समाजामध्ये ‌‘कुमारीमाता‌’ हा तसा गंभीरपणे घेतला जाणारा विषय नाही. त्यामुळे अनेक मुस्लीम ठेकेदार अशा मुलींना फसवून त्या मुलींना गर्भधारणा व मुले व्हायला भाग पाडतात आणि नंतर घरजावई होऊन त्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीतून त्या घराची आणि पर्यायाने वस्ती व गावाची सत्ता उपभोगतात. यांसारख्या अनेक गोष्टींचा प्रामुख्याने विचार करून महाराष्ट्र सरकारने जो अधिनियम निर्माण केलेला आहे, त्यामध्ये सर्व बाबींचा स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे, हेही अभिनंदनीय आहे.

वरील आठ मार्गाने जो कोणी धर्मांतरित करण्याचा प्रयत्न करेल किंवा त्याला मदत करेल, त्याला भारतीय न्याय संहिता व अन्य कायद्याच्या दृष्टीने आता कठोर शिक्षा होणार आहे.

अनेक वर्षे धर्मांतराच्या विरोधामध्ये विविध संघटनांनी आवाज उठवलेला आहे. त्यांच्या प्रयत्नांना जे यश प्राप्त झालेले आहे, ते हा ‌‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, 2026‌’कायदा अधिक लोकांपर्यंत पोहोचवून सक्षमपणे राबवला जावा, हीच आमची अपेक्षा.

- शरद चव्हाण
(लेखक वनवासी क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते आहेत.)



Powered By Sangraha 9.0