आखाती युद्धाच्या आंतरराष्ट्रीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर इंधनबचत ही केवळ घरगुती नव्हे, तर प्रत्येक भारतीय नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्यदेखील आहे. स्वयंपाकघरातील या साध्या; पण शिस्तबद्ध सवयी अवलंबल्यास ‘एलपीजी’ सिलिंडर पूवपेक्षा अनेक दिवस जास्त टिकू शकतो आणि महिन्याचा खर्चही लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. यासंबंधी मार्गदर्शन करणारा लेख...
भारतात इंधन आणि ‘एलपीजी’ पुरवठा सुरक्षित; अफवांवर विश्वास ठेवू नका!
सध्याच्या जागतिक भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात इंधनटंचाई निर्माण होईल, अशी भीती नागरिकांमध्ये पसरली आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीप सिंग पुरी यांनी देशाला आश्वस्त केले आहे की, भारताकडे पुरेसा साठा असून, पुरवठा साखळी पूर्णपणे सुरक्षित आहे.
‘एलपीजी’ बुकिंगमध्ये वाढ; पण साठा पुरेसा
युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या घबराटीमुळे ‘एलपीजी’ बुकिंगमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली. युद्धापूव दररोज सरासरी 55.7 लाख सिलिंडर बुक होत होते, तो आकडा आता 75.7 लाखांवर पोहोचला आहे. दररोज सुमारे 20 लाख सिलिंडरची ही वाढ ‘पॅनिक बुकिंग’मुळे झाली आहे.
सत्यपरिस्थिती : देशातील 25 हजार वितरकांकडे पुरेसा साठा आहे.
पुरवठा साखळी : जरी होर्मुझच्या सामुद्रधुनीचा जलमार्ग विस्कळीत झाला असला, तरी भारताने अमेरिका, कॅनडा आणि रशियासारख्या देशांकडून आयात वाढवून पर्यायी मार्ग शोधले आहेत.
उत्पादन : गेल्या पाच दिवसांत ‘एलपीजी’ उत्पादनात 28 टक्के वाढ करण्यात आली आहे.
‘पीएनजी’, ‘सीएनजी’ आणि पेट्रोल-डिझेल पुरवठा स्थिर
घरगुती पुरवठा : दि. 9 मार्च 2026च्या आदेशानुसार, घरगुती ‘पीएनजी’ आणि वाहनांसाठीचा ‘सीएनजी’ पुरवठा कोणत्याही कपातीशिवाय सुरू राहील.
पेट्रोल-डिझेल : भारताची तेलशुद्धीकरण (रिफायनरी) क्षमता 258 दशलक्ष मेट्रिक टन असून, सर्व रिफायनरीज 100 टक्के क्षमतेने काम करत आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलची कोणतीही कमतरता नाही.
कोळसा पुरवठा : औद्योगिक ग्राहकांसाठी ‘कोल इंडिया’ला अतिरिक्त कोळसा
उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अफवा पसरवणाऱ्यांना कडक इशारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की, काही लोक राजकीय स्वार्थासाठी किंवा नफेखोरीसाठी ‘एलपीजी’बाबत भीती पसरवत आहेत. अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल. 2014 मध्ये देशात 14 कोटी गॅस कनेक्शन होते, आज ती संख्या 33 कोटींच्या पार गेली आहे, त्यामुळे पायाभूत सुविधा भक्कम आहेत.
गॅस सिलिंडर बुक होत नाही?
वापरा ‘या’ चार सोप्या पद्धती
‘गॅस बुकिंग’ची विंडो 21 दिवसांवरून 25 दिवस केल्यामुळे आणि फोन लाईन्स व्यस्त असल्यामुळे अडचणी येत असल्यास खालील पर्यायांचा वापर करा :
महत्त्वाचे आवाहन
विनाकारण सिलिंडर साठवून ठेवू नका.
शहरी भागात 25 दिवस आणि ग्रामीण भागात 45 दिवसांच्या अंतरानेच बुकिंग स्वीकारले जाईल.
समाजमाध्यमांवरील अपुऱ्या माहितीवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत सरकारी निवेदनांवर लक्ष द्या.
गॅस लवकर संपतो? स्वयंपाकघरातील सवयी बदला; सिलिंडर जास्त दिवस टिकवा भारतातील काही शहरांत ‘एलपीजी’चा तुटवडा जाणवतो, त्यामुळे घरगुती पातळीवर गॅस बचत करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.घरगुती स्वयंपाक, गिझर, सतत उकळणारे पाणी इ. कारणांनी सिलिंडर लवकर संपतो; पण योग्य सवयींमुळे तो महिने टिकवता येऊ शकतो.
गॅस लवकर संपण्याची प्रमुख कारणे
भांड्यावर झाकण न ठेवता स्वयंपाक करणे, त्यामुळे उष्णता बाहेर जाऊन वेळ आणि गॅस दोन्ही जास्त लागतात.
चुकीचा बर्नर वापरणे- लहान भांडे मोठ्या बर्नरवर किंवा मोठे भांडे फार छोट्या बर्नरवर ठेवणे.
न भिजवलेले कडधान्य, चणे, राजमा थेट गॅसवर शिजवणे- वेळ आणि गॅस दोन्ही दुपटीने वाढतात.
घाणेरडे, अडथळे असलेले बर्नर- ज्वाळा तिरक्या होतात, उष्णता वाया जाते, गॅस अनुत्पादक जळतो.
सर्व साहित्य तयार होण्याआधीच गॅस सुरू करणे- भाज्या चिरताना, मसाले गोळा करताना गॅस विनाकारण चालू राहतो.
नेहमी प्रखर आचेवर स्वयंपाक- अन्न जळण्याचा धोका वाढतो, गॅसचा वापरही अपेक्षेपेक्षा जास्त होतो.
गॅसबचतीसाठी उपयोगी सवयी - स्वयंपाकपूर्व तयारी
सर्व साहित्य आधी तयार करा- चिरणे, धुणे, मसाले मोजणे पूर्ण झाल्यावरच गॅस पेटवा.
कडधान्य, चणे, राजमा, तांदूळ काही तास किंवा रात्रभर भिजत ठेवा. त्यामुळे ते लवकर शिजतात आणि गॅसची बचत होते.
स्वयंपाक करताना...
शक्य तिथे प्रेशर कुकरचा वापर करा; डाळ, चणे, राजमा, भात, काही भाज्या कुकरमध्ये कमी वेळात शिजतात.
भांड्यावर नेहमी झाकण ठेवा; उष्णता आत राहते, अन्न लवकर शिजते आणि सिलिंडर जास्त दिवस टिकतो.
अन्न उकळी आल्यावर आच मध्यम किंवा मंद करा; मध्यम आचेवर अन्न चांगले व समान शिजते आणि गॅसही कमी खर्च होतो.
भांड्याच्या आकाराला साजेसा बर्नर वापरा; योग्य बर्नर निवडल्यास उष्णतेचा अपव्यय टाळता येतो.
स्वच्छता आणि देखभाल
गॅसचे बर्नर, ज्वाळा येणारी छिद्रे नियमित साफ करा; त्यामुळे निळसर समसमान ज्वाळा मिळते आणि गॅस कमी खर्च होतो.
गॅस स्टोव्हभोवती तेलकट थर, अन्नकण राहू देऊ नका; स्वच्छ पृष्ठभागावर उष्णता अधिक कार्यक्षमतेने वापरली जाते.
छोट्या सवयी - मोठा फायदा
पाणी, दूध, चहा उकळताना आवश्यक तेवढेच पाणी वापरा; जास्त पाणी उकळण्यासाठी अतिरिक्त गॅस लागतो.
शक्य असेल तिथे एकाच वेळी जास्त प्रमाणात स्वयंपाक करा (बॅच कुकिंग); वारंवार गॅस पेटवण्याचा वेळ वाचतो.
‘एलपीजी’सोबत सौर-कुकर, इंडक्शन प्लेट, थर्मास फ्लास्क वापरल्यास रोजचा गॅस वापर कमी होतो.
संकटकाळातील संयम, सहकार्य आणि राष्ट्रीय कर्तव्य
प्रत्येक संकट हे केवळ आव्हान नसते, तर ते समाजाला आरसा दाखवणारे एक निमित्त असते. संकटाच्या काळात आपण कसे वागतो, यावरच त्या परिस्थितीची दाहकता किती असेल, हे ठरत असते.
स्वार्थ की परमार्थ?
दुर्दैवाने, जेव्हा समाजावर एखादे सावट येते, तेव्हा काही घटक कृत्रिम टंचाई निर्माण करून स्वतःचा फायदा शोधू लागतात. मागणी वाढली की, साठेबाजी करणे आणि पुरवठा कमी असल्याचा आभास निर्माण करून सामान्यांची लूट करणे, हा माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार आहे. पण, याला आपणही कुठेतरी खतपाणी घालत नाही ना? हे तपासण्याची आज गरज आहे.
भय आणि जबाबदारी
टंचाईची नुसती बातमी पसरली की, ‘उद्या काय होईल?’ या अनामिक भीतीने आपण गरजेपेक्षा जास्त सिलिंडर साठवू लागतो. आपल्या या एका कृतीमुळे खरोखर गरज असलेल्या एखाद्या कुटुंबाची चूल विझू शकते, याचा विचार आपण करायला हवा. जेव्हा आपण केवळ स्वतःचा विचार करतो, तेव्हा पुरेसा पुरवठा असूनही बाजारात टंचाईचे चित्र निर्माण होते. अशा वेळी चढ्या-दराने वस्तू विकणाऱ्यांना खंबीरपणे नकार देणे, हे एका जागरूक नागरिकाचे कर्तव्य आहे. इंटरनेट आणि समाजमाध्यमांच्या युगात अफवांचा वणवा वेगाने पेटतो. पण, अशा वेळी वाऱ्यासारख्या पसरणाऱ्या बातम्यांवर विश्वास न ठेवता संयम राखणे, हीच आपल्या संस्कारांची खरी कसोटी असते. आपण केवळ ग्राहक नाही, तर या देशाचे जबाबदार आधारस्तंभ आहोत. संकटाच्या काळात एकमेकांचा हात धरणे आणि सामाजिक उत्तरदायित्व जपून प्रामाणिकपणे वागणे, यातच देशाचे हित सामावलेले आहे.जर प्रत्येक भारतीयाने इंधन बचतीचा आणि संयमाचा मंत्र जपला, तर कोणतीही टंचाई आपले मनोबल खच्ची करू शकणार नाही. चला तर मग, अफवांना थारा न देता, साठेबाजीला नकार देऊन आणि जबाबदार नागरिक म्हणून या इंधन बचतीच्या लढाईत सामील होऊया. आपल्या सामूहिक प्रयत्नांतूनच देश या संकटावर नक्कीच मात करेल!