धारावी कुंभारवाड्यातील महिलांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल; ३० महिलांनी घेतले इलेक्ट्रिक पॉटरी व्हीलचे प्रशिक्षण

22 Mar 2026 18:00:23
Dharavi
 
मुंबई : (Dharavi ) धारावीतील कुंभारवाडा परिसरातील ३० महिलांना मातीची भांडी बनविण्याच्या (पॉटरी) प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल धारावी सोशल मिशन (डीएसएम) यांच्या वतीने इलेक्ट्रिक पॉटरी व्हील (विद्युतचलित चाक) प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. कौशल्य विकासाला चालना देत महिलांसाठी शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
 
धारावी सोशल मिशनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून पारंपरिक कुंभार कामाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत उत्पन्नाच्या नव्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कुंभारवाडा हा पारंपरिक मातीच्या भांड्यांसाठी देशभर प्रसिद्ध असून अनेक पिढ्यांपासून येथील कुटुंबे या व्यवसायाशी निगडित आहेत. मात्र, या प्रक्रियेत महिलांचा सहभाग प्रामुख्याने सहाय्यक भूमिकांपुरताच मर्यादित राहिला होता. इलेक्ट्रिक पॉटरी व्हीलच्या माध्यमातून हा व्यवसाय अधिक सुलभ, कमी श्रमाचा आणि वेळ वाचविणारा ठरणार असून त्यामुळे महिलांचा सक्रिय सहभाग वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
 
कुंभारवाड्यातील रहिवासी जिग्निशा जेठवा (२१) हिने सांगितले की, “माझे वडील कुंभारकाम करतात; मात्र मला या कामाबद्दल फारशी माहिती नव्हती. या कार्यशाळेमुळे मातीला योग्य आकार कसा द्यायचा, बोटांचा वापर कसा करायचा आणि प्रत्येक टप्प्यावर किती दाब द्यायचा याचे प्रशिक्षण मिळाले. तसेच विविध प्रकारचे दिवे बनविण्याचेही कौशल्य आत्मसात करता आले".
 
हेही वाचा : रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा संपन्न
 
ही प्रशिक्षण कार्यशाळा कुंभारवाड्यातील अनुभवी कुंभार आणि प्रशिक्षक नरसी रामजी वाला (५५) यांनी घेतली. गेल्या १५ वर्षांपासून ते कुंभारकामाचे प्रशिक्षण देत आहेत. यांनी सांगितले की, “कुंभारकामासाठी संयम, सातत्यपूर्ण सराव आणि योग्य तंत्राची आवश्यकता असते. इलेक्ट्रिक चाकाच्या वापरामुळे कारागिरांना काम अधिक अचूकपणे करता येते आणि गुणवत्तेसोबतच सर्जनशीलतेवरही अधिक लक्ष केंद्रित करता येते.”
 
कार्यशाळेत सहभागी झालेल्या आणखी एक महिला लक्ष्मी योगेश सोळंकी (३७) यांनी भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “मातीची भांडी आणि भांडी बनविण्याचा व्यवसाय सध्या पुन्हा लोकप्रिय होत आहे. अनेकजण मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करणे आणि अन्न सेवन करणे पसंत करतात. त्यामुळे भविष्यात स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या प्रगती करण्याची माझी इच्छा आहे.”
 
अशा प्रकारच्या उपक्रमांद्वारे धारावी सोशल मिशन महिलांचे सशक्तीकरण, पारंपरिक कारागिरांना आधुनिक साधनसामग्रीची जोड आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
 
 
Powered By Sangraha 9.0