लघुग्रहांच्या धोक्यांपासून पृथ्वीचे संरक्षण

22 Mar 2026 15:33:28
DART Mission
 
अंतराळातील लघुग्रह हे कायमच मानवजातीसाठी कुतूहलाबरोबरच चिंतेचाही विषय ठरले आहेत. कारण, या ग्रहांच्या नावात जरी ‘लघु’ असले तरी त्यांची विद्ध्वंसक क्षमता ही प्रचंड असते, हे डायनासोर युगाच्या अंताने सिद्ध केले. त्यामुळे लघुग्रहांपासून पृथ्वीच्या आणि पर्यायाने मानवजातीच्या संरक्षणाच्या दृष्टीने वर्षानुवर्षे अंतराळसंशोधनात लक्षणीय प्रगती नोंदवली गेली. ‘नासा’ची ‘डार्ट’ मोहीम ही त्याच संशोधनप्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा. तेव्हा, लघुग्रहांची रचना, पृथ्वीचे संरक्षण आणि आव्हाने यांचा घेतलेला हा ‘अनंतवेध.’
 
१९९८ साली आलेले ‘आर्मागेडन’ आणि ‘डीप इम्पॅट’ या दोन्ही चित्रपटांमध्ये लघुग्रहाचा आणि एका मोठ्या धूमकेतूचा पृथ्वीला असलेला धोका थांबवण्यासाठी जागतिक प्रयत्न दाखवले आहेत. त्या चित्रपटांमधील विज्ञानाची व्याख्या काल्पनिक असली, तरी ब्रह्मांडाची समज विस्तारल्याने मानवतेला त्या धोक्यांची जाणीव होऊ लागली होती. काही लघुग्रह किंवा अन्य अंतराळ वस्तू पृथ्वीच्या जवळ आल्यावर ती आपल्याला धडकू शकते. पृथ्वीला मोठा धक्का पोहोचवू शकणार्‍या लघुग्रहांच्या प्रतिकारासाठी सर्वांत महत्त्वाची मोहीम म्हणजे ‘नासा’ची ‘डबल अस्टेरॉईड रिडायरेशन टेस्ट’ म्हणजे ‘डार्ट मोहीम.’ या मोहिमेने एका लघुग्रहाच्या कक्षेत बदल केला. पण, पृथ्वीला संरक्षण देण्यासाठी हे पुरेसे आहे का? पुढील धोके कमी करण्यासाठी काय करता येईल?
 
लघुग्रह धडकेच्या धोक्याबद्दल वाढती जागरूकता
 
लघुग्रह म्हणजे अंतराळातील खडक. हे प्रारंभिक सौरमालेतील अवशेष आहेत. ते मुख्यतः खडक आणि धातूचे बनलेले असतात. त्यापैकी बहुतेक लघुग्रह मंगळ आणि गुरूच्या दरम्यान असलेल्या लघुग्रहपट्ट्यामध्ये असतात. परंतु, काही ‘निअर-अर्थ ऑब्जेट्स’ पृथ्वीच्या कक्षेच्या आसपास फिरतात. या वस्तूंचे वर्गीकरण त्यांचा आकार आणि पृथ्वीपासूनच्या अंतरानुसार केले जाते. बहुतेक लघुग्रहांचा कोणताही धोका नसतो. पण, काही लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेजवळ येतात आणि त्यांचा धोका वाढतो. एखाद्या लहान लघुग्रहाचा धक्कासुद्धा प्रचंड विध्वंस करू शकतो. अशा अनेक घटना पूर्वी घडून गेल्या आहेत. सर्वात प्रसिद्ध घटना म्हणजे, सहा करोड वर्षांपूर्वी चिसलब येथील डायनासोर युगाचा अंत करणार्‍या लघुग्रहाचे पृथ्वीवर येऊन आदळणे. अशाप्रकारचा एक मोठा धक्का अत्यंत दुर्मीळ असला, तरीही लहान लघुग्रह पृथ्वीवर कोणत्याही घनदाट लोकवस्ती असलेल्या क्षेत्रात किंवा महासागरात पडला, तर तो मोठी हानी करू शकतो.
 
डार्ट मोहीम : ग्रह-संरक्षणातील एक मोठे पाऊल
 
सप्टेंबर २०२२ मध्ये ‘नासा’ने पहिल्यांदाच एका लघुग्रहाच्या कक्षेचा मार्ग बदलण्याची मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. ‘डबल अस्टेरॉईड रिडायरेशन टेस्ट (डार्ट)’ने ‘डिडिमोस’ या बायनरी अस्टेरॉईड प्रणालीवर लक्ष केंद्रित केले. प्रमुख लघुग्रह ‘डिडिमोस’ हा ७८० मीटर व्यासाचा आहे आणि त्याचा छोटा उपग्रह ‘डिमॉर्फोस’ १६० मीटर व्यासाचा आहे. ‘डार्ट’ अंतराळयान डिमॉर्फोसवर सुमारे ६.६ किमी प्रतिसेकंद वेगाने धडकले आणि या छोट्या उपग्रहाच्या कक्षेत ३२ मिनिटांचा बदल केला. ११ तास आणि ५५ मिनिटांची डिमॉर्फोसची कक्षा ११ तास आणि २३ मिनिटांपर्यंत कमी केली. या छोट्या बदलाने दाखवले की, लघुग्रहाचा मार्ग बदलण्यासाठी आपल्याकडे अचूकता आणि कौशल्य असू शकते. ‘डार्ट’ मोहिमेच्या यशामुळे भविष्यात धोकादायक लघुग्रहांना पृथ्वीपासून दूर ढकलण्याचे तंत्रज्ञान आपल्याकडे असू शकेल, अशी आशा निर्माण झाली आहे.
 
‘निअर-अर्थ ऑब्जेट्स’द्वारे निर्माण होणारे धोके
 
आजपर्यंत २६ हजारांहून अधिक ‘निअर-अर्थ ऑब्जेट्स’ नोंदवले गेले आहेत. परंतु, बर्‍याच लहान वस्तू अजूनही शोधायच्या आहेत. जितके मोठे लघुग्रह तितका त्याचा प्रभाव जास्त असतो. एक किलोमीटरपेक्षा मोठ्या वस्तू जरी दुर्मीळ असल्या, तरी त्या पृथ्वीचा मोठ्या प्रमाणात विध्वंस करू शकतात. २५ मीटरपेक्षा लहान असलेल्यांचा तत्काळ धोका कमी आहे. परंतु, तरीही स्थानिक किंवा प्रादेशिक स्तरावर नुकसान होऊ शकते.
 
‘नासा’च्या ‘निअर-अर्थ ऑब्जेट्स’ शोधण्याच्या आणि त्यांच्या धोक्यांबद्दल विश्लेषण करण्याच्या प्रयत्नांची गती वाढली आहे. विविध देशांतील आणि अंतराळ संस्थांद्वारे ‘निअर-अर्थ ऑब्जेट्स’चे शोध घेतले जातात. यामुळे वैज्ञानिकांना संभाव्य धोके ओळखण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी आवश्यक वेळ मिळतो.
 
पृथ्वी-संरक्षण ही आता जागतिक प्राथमिकता झाली आहे. लघुग्रह धडकेचा धोका एका देशापुरता नाही, तर तो जागतिक मुद्दा आहे. पृथ्वीला या संभाव्य धोयापासून वाचवण्यासाठी जागतिक सहकार्य आणि सहयोग अत्यंत आवश्यक आहे. अनेक देश आणि अंतराळ संस्था आता असे धोके कमी करण्यासाठी उपाययोजना आणि तंत्रज्ञान तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत.
२०१६ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी अंतराळ कार्यालय, ‘युनोसा’ स्थापन केले. या कार्यालयाने जागतिक दृष्टिकोनातून लघुग्रहांचे धोके ओळखण्यासाठी आणि त्यांचा सामना करण्यासाठी अनेक देशांना एकत्र आणले आहे.
 
‘डार्ट’ मोहिमेच्या व्यतिरिक्त लघुग्रह धडकेचे प्रतिकार करण्यासाठी आणखी काही अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. यामध्ये ‘कायनेटिक इम्पॅटर’, ‘ग्रॅव्हिटी ट्रॅटर’ आणि ‘न्यूलियर डिव्हाईसेस’ यांचा समावेश आहे. ‘डार्ट’ मोहिमेने ‘कायनेटिक इम्पॅटर’च्या प्रभावाचा वापर करून लघुग्रहाच्या कक्षेला बदलले होते.
 
ग्रह-संरक्षणातील आव्हाने
 
ग्रह-संरक्षणाच्या प्रगतीत काही मोठी आव्हाने आहेत. एक मोठे आव्हान म्हणजे आपल्याला अनेक ‘निअर-अर्थ ऑब्जेट्स’चा शोध अजून घ्यायचा आहे. काही लघुग्रह सच्छिद्र असतात. त्यामुळे त्यांची दिशा किंवा कक्षा बदलणे कठीण असते, तर काही इतक्या जास्त वेगाने फिरत असतात की, त्यांचा मार्ग बदलणे जवळजवळ अशक्य होते. शिवाय, आपल्याकडे सध्या मोठ्या लघुग्रहांचे प्रक्षेपण अचूकतेने बदलण्याची क्षमता नाही.
 
पृथ्वीला भीषण लघुग्रहाच्या धडकेतून वाचवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज आपल्याकडे प्रभावी संरक्षण यंत्रणा असल्या, तरी याचे यश आपल्या जागरूकतेवर आणि सहकार्यावर अवलंबून आहे. भविष्यातील प्रत्येक आव्हानांसाठी, पृथ्वीच्या संरक्षणासाठी एकजूट आणि प्रयत्न महत्त्वाचे आहेत. केवळ एकच चूक आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करू शकते!
 
- सुजाता बाबर
Powered By Sangraha 9.0