फिनलंडने सलग नवव्या वर्षी जगातील सर्वांत आनंदी देश म्हणून आपले स्थान कायम ठेवले. त्याचबरोबर आईसलॅण्ड, डेन्मार्क, स्वीडन आणि नॉर्वे यांसारखे युरोपातील नॉर्डिक देशही पहिल्या दहामध्ये कायम आहेत. या देशांमध्ये आर्थिक स्थैर्य, समान उत्पन्न वितरण, मजबूत सामाजिक सुरक्षा व्यवस्था आणि उच्च आयुर्मान यामुळे नागरिकांचे जीवनमान उंचावल्याचे अहवाल सांगतो. मात्र, या ‘जागतिक आनंद अहवाला’त भारताचे स्थान पाकिस्तानपेक्षाही खाली असल्याचे दिसताच, या संपूर्ण मूल्यांकन प्रक्रियेविषयी शंकेची पाल चुकचुकल्याशिवाय राहत नाही.
यंदा भारत या यादीत 118व्या क्रमांकावर असून, पाकिस्तान 109व्या स्थानावर आहे. ही तुलना अनेक स्तरांवर विचार करायला भाग पाडते. आर्थिक संकट, अन्नटंचाई, दहशतवाद, राजकीय अस्थिरता आणि सततचे सीमावाद अशा गंभीर समस्यांनी ग्रासलेल्या पाकिस्तानला भारतापेक्षा अधिक ‘आनंदी’ कसे मानले जाऊ शकते, हा मूलभूत प्रश्न उपस्थित होतो. पाकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षांत हिंसाचार, दहशतवादी हल्ले, माजी पंतप्रधानांचा कारावास आणि अर्थव्यवस्थेची ढासळलेली स्थिती हे वास्तव आहे. त्याउलट, भारत सामाजिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्याही अधिक स्थिर लोकशाही म्हणून ओळखला जातो. आरोग्यसेवा, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि जीवनमान या बाबतीतही भारत तुलनेने अधिक प्रगत आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला अधिक आनंदी ठरवणे अनेकांना विसंगत आणि अवास्तव वाटते.
यामुळेच या अहवालाच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण होतो. हा प्रश्न केवळ सामान्य नागरिकांपुरता मर्यादित नाही, तर तज्ज्ञ आणि विलेषकही याबाबत प्रश्न उपस्थित करीत आहेत. ही समस्या केवळ या एका अहवालापुरती मर्यादित नाही. यापूवही अनेक आंतरराष्ट्रीय निर्देशांकामध्ये भारताबाबत पूर्वग्रह असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अहवालासाठी सुमारे 140 देशांतील एक लाख लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या गेल्या. प्रत्येक देशात सरासरी फक्त एक हजार लोकांना त्यांच्या जीवनाचे शून्य ते दहा असे मूल्यांकन करण्यास सांगितले जाते.
भारतासारख्या 140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशासाठी हा नमुना अत्यंत मर्यादित असल्याची टीका होते. काही हजार लोकांच्या मतांवर संपूर्ण देशाचा ‘आनंद’ मोजणे कितपत योग्य, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. अहवालात आनंद मोजण्यासाठी सहा प्रमुख घटकांचा विचार केला जातो-सामाजिक आधार, प्रतिव्यक्ती ‘जीडीपी’, आरोग्यदायी आयुष्य, वैयक्तिक स्वातंत्र्य, उदारता आणि भ्रष्टाचाराचा अभाव. या निकषांवर भारत अनेक बाबतीत पाकिस्तानपेक्षा पुढे असल्याचे विविध अहवाल सूचित करतात. भारत आज जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे, तर पाकिस्तान अनेक दशकांपासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि इतर देशांच्या आर्थिक मदतीवर अवलंबून आहे. याचबरोबर, काही अभ्यासांमध्ये समाजमाध्यमांच्या अतिवापराचा तरुणांच्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणामही अधोरेखित करण्यात आला आहे. 47 देशांतील विद्यार्थ्यांवर केलेल्या एका अभ्यासानुसार, दररोज सात तासांपेक्षा जास्त समाजमाध्यमे वापरणाऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य कमी असल्याचे आढळले. यावरून आनंद हा केवळ आर्थिक किंवा राजकीय घटकांवर अवलंबून नसून सामाजिक आणि वैयक्तिक सवयींवरही आधारित असल्याचे स्पष्ट होते.
एकंदरीत, ‘जागतिक आनंद अहवाला’सारख्या निर्देशांकांकडे अंतिम सत्य म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. ते काही प्रमाणात दिशा देतात. मात्र, त्यांची पद्धत, नमुना आणि विलेषण यावर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. विशेषतः भारतासारख्या मोठ्या, विविधतेने नटलेल्या देशाचे वास्तव काही मर्यादित प्रतिसादांवर आधारित मोजणे कठीण आहे. म्हणूनच, अशा अहवालांचे मूल्यांकन करताना चिकित्सक दृष्टिकोन आवश्यक आहे. केवळ क्रमवारी पाहून निष्कर्ष काढण्याऐवजी त्यामागील पद्धती, संदर्भ आणि मर्यादा समजून घेणे अधिक महत्त्वाचे!