जागतिक चिमणी दिवसानिम्मित शालेय विद्यार्थांसाठी चिमण्यांची कृत्रिम घरटी रंगविण्याचा उपक्रम धारावीत संपन्न!

21 Mar 2026 15:53:57
World Sparrow Day
 
मुंबई : (World Sparrow Day) जागतिक चिमणी दिवस दि. २० मार्च रोजी जगभर साजरा केला जातो. चिमण्यांचे पर्यावरणातील कमी झालेले प्रमाण पाहता, त्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावे, त्यांची संख्या वाढावी ज्यामुळे चिमण्यांचे अन्न साखळीतील तसेच पर्यावरणातील महत्व अबाधित राहील यासाठीच गेली २७ वर्षे “ स्पॅरोज शेल्टर" देशभर व राज्यभर काम करत असून आतापर्यंत विविध उपक्रम राबवून समाजात चिमण्यांविषयी जनजागृती करत आहे.
 
जागतिक चिमणी दिवसानिमित्त शालेय विध्यार्थ्यांसाठी चिमण्यांची कृत्रिम घरटी रंगविण्याच्या उपक्रमाचे मनोहर जोशी महाविद्यालय, धारावी येथे दि. २० मार्च रोजी, सकाळी ११ वाजता आयोजन केले होते. या उपक्रमात अनेक शालेय विद्यार्थी आणि नागरिक सामील झाले होते. त्यांच्या कल्पकतेने त्यांनी कृत्रिम घरटी सुंदर पद्धतीने रंगविली, ज्यामुळे या कार्यक्रमाला एक विशेष रंगत आली. चिमण्यांची कृत्रिम घरटी शाळा परिसरात असलेल्या विविध झाडांवर सुरक्षितपणे लावून त्यात येणाऱ्या चिमण्यांच्या दाणा पाण्याचीही सोयही त्यापुढे विद्यार्थीच पाहतील असे पुढील नियोजन यावेळी संस्थेतर्फे करण्यात आले आहे. एक घरटे - एक विद्यार्थी या प्रमाणे संस्थेने नियोजन केले असून तेच या कृत्रिम घरट्याची सर्व काळजी घेतील असे संस्थेने ठरविले आहे. या प्रसंगी माजी आमदार बाबुराव माने, Sparrow's Shelter चे प्रमोद माने, सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे, कला शिक्षक विशाल जाधव या प्रसंगी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते.
  
"समाजातील सर्वांनी चिमण्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकून या मोहिमेत सामील व्हावे . आता उन्हाळा सुरू झाला असून आपापल्या घराच्या खिडकीत किंवा अंगणात चिमण्यांना दाणा, पाणी ठेवावे तसेच चिमणी कशी वाचेल यासाठी सर्वांनी जागरूक राहावे", असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रमोद माने यांनी नागरिकांना केली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0