काळरात्रीच्या रंगछटा...

21 Mar 2026 13:16:35
Canvas
 
नेणिवेच्या पातळीवर अंधार, काळरात्र या गोष्टींशी काळा रंग जोडला गेला आहे. मूर्त स्वरूपात आपल्याला हा काळा रंग दिसतोसुद्धा. मात्र, ज्या प्रकारे प्रत्येक कापडाचा स्वतःचा असा एक वेगळा पोत असतो, त्याचप्रकारे एकेका रंगाच्या असंख्य वेगवेगळ्या छटासुद्धा असतात. एक सक्षम चित्रकार अशाच प्रकारे विविध रंगछटा उलगडून चित्रनिर्मितीचा कलाविष्कार सादर करतो. एका चित्राच्या भावविश्वात हजारो गोष्टी गुंफण्याचे दैवी कसबच चित्रकाराकडे असते. चित्रांमधल्या गोष्टींचं असंच सुंदर विणकाम साकारलं आहे, चित्रकार ललित पाटील यांनी. मुंबईच्या जहांगीर कलादालन येथे ‘लेअर्स ऑफ द नाईट’ या त्यांच्या एकल चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १७ मार्च ते २३ मार्च या कालावधीमध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ७ या कालावधीत हे प्रदर्शन प्रेक्षकांना अनुभवता येईल. या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर काळरात्रीच्या विविध रूपांचा आस्वाद घेणारा लेख...

उषःकाल होता होता काळरात्र झाली,
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली! - सुरेश भट
 
आखाती देशांमधील युद्धामुळे संपूर्ण जगावरच सध्या दहशतीचं काळं सावट व्यापलेलं. युद्धाची ही काळरात्र कधी संपणार, याचं ठोस उत्तर अजून तरी कुणाकडेच नाही. युद्धाचे ‘काळे ढग‘ दाटून येतात, म्हणजे नक्की काय होतं? तर एका अनामिक संघर्षाची चाहूल लागते आणि हिंसाचार, भीती, वैरभावनेच्या नकारात्मकतेने वातावरण कलूषित होते. काळरात्र म्हटलं की, सबंध अवकाश आपल्या अस्तित्वावार घाला घालण्यासाठी चाल करून येतेय की काय, अशीच एखादवेळेस भीती वाटते. मात्र, कधीकधी हीच काळरात्र जीवनाचं एक वेगळं रूप घेऊन आपल्या समोर येते. त्यावेळी तिथे भीती नसते, कुतूहल असतं. काळरात्रीचं असंच वैभव आपल्या कुंचल्यातून साकारण्याचं काम केलं आहे, चित्रकार ललित पाटील यांनी. त्यांच्या चित्रांमध्ये अवतरलेली रात्र दुःख, दैन्य अशा भावनांना बाजूला सारून ‘रात्र’ या संकल्पनेचं पूर्णपणे नवं चित्र आपल्यासमोर उभं करते.
 
ललित पाटील यांच्या चित्रांना निरखून पाहिल्यास असे लक्षात येईल की, त्यांच्या चित्रांमधून प्रतित होणारी अमूर्त शैली यावर प्रभाववादाचा (impressionism) ठसा उमटला आहे. अशा रचनेतील चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे, या शैलीमध्ये प्रकाशाचे बदलणारे स्तर आणि स्वरूप यांची अचूक मांडणी आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर, यातला महत्त्वाचा भाग म्हणजे प्रवाहाचे चित्रण. निसर्ग हा प्रवाही असतो. ज्यावेळी कोर्‍या कागदावर आपण हा निसर्ग उतरवतो, त्यावेळी तो एका चौकटीमध्ये बंदिस्त होतो. मात्र, अशातसुद्धा त्या निसर्गाचे जीवंतपण दर्शवण्यासाठी प्रवाह हा घटक आवश्यक ठरतो. उजेडाच्या पार्श्वभूमीवर हे दाखवणे एक वेळ सोपे असू शकते; मात्र रात्रीच्या उजेडात हे घटक चित्रांमधून मांडणे आव्हानात्मक असू शकते, जे काम ललित पाटील यांच्या चित्रांमध्ये मात्र अगदी सहजरित्या साकारले आहे.
 
त्यांच्या एका चित्रामध्ये झाडांच्या काळ्या गडद फांद्यांचा वापर करून एक प्रकारची खोली (Depth) निर्माण करण्यात आली आहे. या फांद्यांच्या पाठीमागे जे रंगांचे जग दिसते, ते एखाद्या शहराचे रात्रीचे दृश्य असावे, असा भास होतो. खिडक्यांतून डोकावणारा पिवळसर प्रकाश आणि रात्रीची निळाई यांचा यात खेळ दिसतो. या चित्रांमध्ये जो काळा रंग आपल्याला दिसतो, त्याच्या भोवताली निळा, जांभळा, पिवळा आणि सोनेरी रंगांच्या छटा पसरलेल्या आहेत. रंगांच्या विविध छटांवर चित्रकाराने जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळे, अपेक्षित तो परिणाम साधला गेला आहे. ‘शहर’ हा विषय या चित्रप्रदर्शनाच्या केंद्रस्थानी. या शहरांच्या रात्रीची विविध रंगी नक्षी आपण बघितली, तर आपल्याला असे दिसून येईल की, कॅनव्हासवर चक्क मुंबईनगरीच अवतरली आहे. विक्रोळी पार्क साईड, असल्फा येथील काही भागांच्या टेकड्यांवरून मुंबई शहराकडे एक नजर फिरवत आपल्या कुंचल्यातून चित्रकाराने ही अनुभूती लोकांपर्यंत पोहोचवली आहे. निरखून पाहणार्‍या मुंबई शहराच्या असंख्य वेगवेगळ्या छटा दिसून येतील. हे शहर सकाळी जसं असतं, त्याच्या पूर्ण विपरीत इथला रात्रीचा पसरा असतो. हेच वेगळेपण या चित्रांमध्ये आपल्याला बघायला मिळतं.
 
एका चित्रात एकाशेजारी एक अशी चिकटलेली घरं लक्ष वेधतात. मुंबई हे शहर स्वातंत्र्योत्तर काळात वेगवेगळ्या मार्गांनी नव्याने वसत गेलं. चाळसंस्कृती, झोपडपट्टी, यातून या शहराचा स्वतःचा असा एक वेगळा आकार निर्माण झाला. हा आकार कवेत घेत असताना, चित्रामध्ये आपल्याला जिना सापडतो.
 
जिना असावा अरुंद थोडा
चढण असावी अंमळ अवघड
कळूनही न च जिथे कळावी
अंधारातील अधीर धडधड
 
वसंत बापटांच्या या ओळींमध्ये असलेला जिना खरोखर आपल्या शहरात असतो, याची प्रचिती मग चित्रातून समोर येते. शहरांचे असलेलं एक विस्कळीत रूप सातत्याने या चित्रांच्या माध्यमातून आपल्या समोर येत असतं; कारण या चित्रांमधून चित्रकाराला माणसांचंंच जगणं दाखवायचं आहे. रंगांच्या बहुस्तरीय रचनात्मक खेळातून ही रात्र उलगडत राहते. या रात्रीतील शहर आपल्याला जोखता येतं. एका सम्यक् अंतरावरून आपल्याला या शहराची रचना लक्षात येते. हे शहर रात्रीसुद्धा जिवंत असतं, टवटवीत असतं.
 
या चित्रांच्या पलीकडे माणसांचं अस्तित्व दर्शवणारी काही चित्रंसुद्धा या प्रदर्शनात आहेत. अमूर्त शैलीतील ही चित्रं म्हणजे माणसाचं एक वेगळंच जगणं आपल्यासमोर मांडतात. यातील एका चित्रामध्ये मानवी आकृत्यांचा एक समूह दिसतोय; पण कोणाचेही चेहरे स्पष्ट नाहीत. हे ‘face-less’ चेहरे आधुनिक समाजाचे वास्तव दर्शवतात. चित्रकाराने यात अत्यंत बारकाव्याने रंगरेषांचा वापर केला आहे. चित्रात वापरलेला मातीचा रंग, शाश्वत सत्याचा विचार आपल्यासमोर मांडत आहे. एका बाजूला शहरांचे अस्तित्व आपल्यासमोर मांडताना, रात्रीच्या जगाचं वेगळेपण कॅनव्हासवर उमटले आहे; तर दुसर्‍या बाजूला माणसाच्या अस्तित्वावर भाष्य करणारी अनोखी अमूर्त चित्रंदेखील साकारण्यात आली आहेत. अनुभूतीच्या पातळीवर या प्रयोगाचा आस्वाद नक्कीच घेतला गेला पाहिजे.
 
 
Powered By Sangraha 9.0