गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत विक्रमांची मालिका रचली होती. पहिल्या भागाच्या घवघवीत यशानंतर प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न होता, ‘आता पुढे काय?’ आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून ‘धुरंधर : द रिव्हेंज’ची घोषणा पहिल्या भागावेळीच करण्यात आली. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर, दि. १९ मार्चला हा बहुप्रतीक्षित सिक्वेल आता चित्रपटगृहात दाखल झाला आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांनी उभं केलेलं गुप्तहेरांचं थरारक विश्व अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झालं होतं. त्यामुळे या दुसर्या भागाकडून अपेक्षा अधिकच वाढल्या होत्या. रणवीर सिंग, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर माधवन आणि राकेश बेदी अशी दमदार स्टारकास्ट, भव्य मांडणी या सगळ्यांच्या संगमातून तयार झालेला हा चित्रपट नेमका कसा आहे, ते जाणून घेऊया...
चित्रपटाची सुरुवात जसकिरत सिंग रंगीच्या भूतकाळाने होते. या भागात हमजा अली मझारी (रणवीर सिंग) असे पाकिस्तानमध्ये हेरगिरीसाठी नाव धारण केलेल्या जसकिरत सिंग रंगी याच्या भूतकाळावर प्रकाश टाकण्यात आला आहे. वैयक्तिक दुःखाची भळभळती जखम कायम ठेवून तो भारतासाठी गुप्तहेर म्हणून काम करू लागतो. यानंतर कथा वर्तमानात प्रवेश करते, जिथे पहिल्या भागाच्या शेवटी कराचीच्या लियारी भागातील गँगस्टर रहमान डकैतचा (अक्षय खन्ना) मृत्यू होतो. रहमान डकैतच्या मृत्यूनंतर लियारीत सत्तासंघर्ष उफाळून येतो. याच गोंधळात हमजाचा ‘किंग ऑफ लियारी’ म्हणून उदय होतो. हमजाचा प्रवास हा देशासाठी काम करणार्या गुप्तहेरापासून वैयक्तिक सूडाच्या दिशेने वळतो. या प्रवासात तो पाकिस्तानातील दहशतवादी जाळे उद्ध्वस्त करताना स्वतःच्या मानसिक संघर्षालाही सामोरा जातो.
भारत-पाकिस्तान वैर, अंडरवर्ल्ड गँगवॉर, राजकीय डावपेच, हेरगिरी आणि वैयक्तिक सूड असे अनेक पदर या चित्रपटातील कथेला आहेत. विशेष म्हणजे, यावेळी फक्त पाकिस्तानातील टोळीयुद्ध नाही, तर भारतातीलसुद्धा काही बाबींवर दिग्दर्शक आदित्य धरने अगदी झगझगीत प्रकाश टाकला आहे. त्यामुळे चित्रपटात बरीच धक्कादायक, अनपेक्षित वळणे पाहायला मिळतात. पहिल्या भागात उल्लेख असलेला ‘बडे साहब’ अर्थातच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचीही एन्ट्री या कथेत होते. त्यामुळे पुढे नेमकं काय घडतं, हे सगळं तुम्हाला चित्रपटातच पाहावं लागेल.
चित्रपटाचा पूर्वार्ध वेगवान असला, तरी ‘धुरंधर’च्या पहिल्या भागातील कथानकाच्या बारकाव्यांच्या तुलनेत, यंदाच्या चित्रपटात कथानक काही ठिकाणी सोयीस्कर वळणं घेताना दिसते, ज्यांमुळे प्रेक्षकांची लय कुठेतरी तुटते. मात्र, मध्यांतरानंतर चित्रपट जोर पकडतो. दिग्दर्शक आदित्य धर यांनी कथेला पुढे नेण्यावर भर दिला आहे. विशेष म्हणजे, अक्षय खन्नाच्या अनुपस्थितीची उणीव संपूर्ण चित्रपटात जाणवते. पहिल्या भागात थोडा मर्यादित वाटलेला रणवीर या भागात पूर्ण ताकदीने झळकतो. भावनिक, थंड डोक्याचा आणि तितकाच क्रूर अशा मानवी स्वभावाच्या विविध छटा त्याने प्रभावीपणे साकारल्या आहेत. अर्जुन रामपालची भूमिका प्रभावी असून, संजय दत्त आपला ठरलेला अंदाज कायम ठेवतात, जो पहिल्या भागाप्रमाणे या भागातही तितकासा कथानकाला समर्पक वाटत नाही. मुन्नाभाईचीच छटा कुठे तरी संजय दत्तच्या अभिनयांत नैसर्गिकपणे उमटलेली दिसते. त्यामुळे कथानक कराचीतले आहे की कानपूरचे, असे काही क्षणांसाठी प्रेक्षकांना वाटूही शकते, तर राकेश बेदी काही हलकेफुलके क्षण निर्माण करतात. सारा अर्जुनची भूमिका मर्यादित असली, तरी प्रभावी आहे. चित्रपटाचा एकंदरीतच ‘क्लायमॅस’ प्रभावी ठरतो आणि प्रेक्षकांना समाधान देतो.
‘धुरंधर’ची ओळख असलेल्या ‘अॅक्शन सीन्स’ची या भागातही तितकीच चलती. रक्तपात, हिंसा आणि ‘रॉ-अॅक्शन’ यांचा काहीसा अतिरेक जाणवतो. काही दृश्ये प्रभावी असली, तरी त्यातील काही दृश्ये कथेशी जोडलेली वाटत नाहीत आणि फक्त भरणा म्हणून वापरलेले वाटतात. अॅक्शनचा हेतू स्पष्ट नसल्याचे काही ठिकाणी जाणवते. त्यामुळे या सर्व घटकांची मांडणी काहीशी विस्कळीत वाटते आणि कथानकाला आवश्यक ती खोली मिळत नाही. पहिल्या भागाच्या तुलनेत दुसर्या भागातील ‘धुरंधर’ची कथा कमकुवत भासते. अनेक व्यक्तिरेखा अपूर्ण राहिल्यासारख्या वाटतात, काही पात्र अचानक कथानकातून गायब होतात, तर काहींचा वापर फक्त कथानक पुढे नेण्यासाठी केलेला दिसतो. तसेच, राजकीय संदर्भ, उत्तेजक संवादामुळे अनेक ठिकाणी वास्तव आणि कल्पना यातील सीमारेषा धूसर होतात. दृश्य मांडणी भव्य असली, तरी पहिल्या भागात टिपलेले बारकावे आणि वास्तवतेची उणीव जाणवते.
तरीही ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाचा सर्वांत मोठा प्लस पॉईंट म्हणजे रणवीर सिंगचा दमदार अभिनय. रणवीर सिंग हा चित्रपट पूर्णपणे आपल्या खांद्यावर एकट्याने पेलतो. जसकिरत आणि हमजा या दोन व्यक्तिरेखांमधील त्याच्या देहबोलीतील, स्वाभावातील बदल याची मांडणी अत्यंत प्रभावी आहे. अर्जुन रामपाल (‘आयएसआय’चा मेजर इबाल) यांची भूमिका ठीकठाक असली, तरी पहिल्या भागाइतकी प्रभावी वाटत नाही. संजय दत्त, आर. माधवन आणि राकेश बेदी यांनी आपापल्या भूमिकांमध्ये छाप पाडली आहे. शाश्वत सचदेव यांचं संगीत पहिल्या भागांतच अधिक दमदार होतं. मात्र, पार्श्वसंगीत, विशेषतः क्लायमॅसमध्ये, चित्रपटाला उंची देतं. खरं तर डिसेंबरपासूनच ‘धुरंधर-२’ची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. ‘धुरंधर’च्या पहिल्या भागाने जे भव्य, कथानकातील, भूमिकांमधील सूक्ष्मता टिपत उभं केलेलं विश्व तयार होतं, त्याला तोडीस तोड हा सिक्वेल ठरेल, अशी अपेक्षा होती. मात्र, हा चित्रपट आशयापेक्षा भव्यता, अॅक्शनलाच अधिक प्राधान्य देणारा वाटू शकतो. त्यामुळे कथानकाची पकड काही ठिकाणी सैल पडते.
एकंदरीतच, ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा दोन वेगळ्या भागांचा अनुभव देणारा चित्रपट आहे. पहिल्या भागातील बारकावे आणि वास्तवतेची उंची गाठण्यात तो कमी पडतो; पण तरीही दमदार मांडणी, प्रभावी क्लायमॅस आणि रणवीर सिंगचा अभिनय चित्रपटाला जिंकवतो. पहिल्या भागाइतका संस्मरणीय नसला, तरी ही कथा दोन भागांत मांडण्याचा दिग्दर्शकाचा निर्णय योग्य वाटतो आणि चित्रपट मनोरंजन नक्कीच करतो. ‘धुरंधर’चा पहिला भाग तुमच्या विशेष पसंतीस पडला असेल, तर साहजिकच दुसरा भाग बघितल्याशिवाय ताणून धरलेली उत्कंठा शमणार नाही. त्यामुळे जवळपास चार तासांचा ‘स्क्रिनटाईम’ असलेला हा चित्रपट कधीही प्रत्यक्ष चर्चेत नसलेल्या भारतीय गुप्तचर यंत्रणांविषयीचा आदर, राष्ट्रभक्तीची भावना द्विगुणित करणारा ठरेल, यात शंका नाही.
दिग्दर्शक : आदित्य धर
निर्मिती : जिओ स्टुडिओज, बी६२ स्टुडीओज
कलाकार : रणवीर सिंग, अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन, सारा अर्जुन, राकेश बेदी, दानिश पांडोर, गौरव गेरा, मानव गोहिल, राज जुत्शी
रेटिंग: ३.५ स्टार
- अपर्णा कड