मुंबई : (US-Israel-Iran War) मध्य पूर्वेत गेल्या २० दिवसांपासून सुरु असलेला संघर्ष आता आणखी चिघळला आहे. इराणविरोधात अमेरिका आणि इस्रायलने पुकारलेले युद्ध आता गंभीर वळणावर पोहोचले आहे. लष्करी तळांना लक्ष्य केल्यानंतर आता हे देश एकमेकांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करत आहेत. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जागतिक ऊर्जा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स आणि जपान हे सहा प्रमुख देश एकत्र आले आहेत. या देशांनी संयुक्त निवेदन जारी करून इराणला कडक इशारा दिला आहे.(US-Israel-Iran War)
या सहा देशांनी स्पष्ट केले आहे की, ऊर्जा पुरवठा साखळीतील हा अडथळा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी थेट धोका आहे. संयुक्त निवेदनात या देशांनी म्हटले आहे की, ते या महत्त्वाच्या समुद्री मार्गावरून जहाजांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी 'समन्वित प्रयत्न' करण्यास तयार आहेत. याचा अर्थ असा लावला जात आहे की, आता हे देश आपली युद्धनौका होर्मुझमध्ये इराणच्या विरोधात तैनात करू शकतात. "इराणच्या या कृत्याचा परिणाम जगाच्या प्रत्येक कोपऱ्यातील माणसावर, विशेषतः गरीब वर्गावर होईल," असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.(US-Israel-Iran War)
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी मानली जाणारी होर्मुझची सामुद्रधुनी सध्या ठप्प झाली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जगातील कच्च्या तेलाचा आणि एलपीजीचा मोठा पुरवठा होतो. इराणने व्यापारी जहाजांवर ड्रोन आणि स्फोटक बोटींनी हल्ले सुरू केल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. इराणच्या हल्ल्यांमुळे शेकडो जहाजे या मार्गाबाहेर अडकून पडली आहेत. याचा थेट परिणाम भारत, जपान आणि युरोपातील इंधन पुरवठ्यावर झाला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित जलवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी या देशांनी संयुक्त पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. इराणच्या कारवायांचा निषेध करत या देशांनी शांततेचे आवाहन केले आहे.
(US-Israel-Iran War)