माझ्या बदनामीचा कट रचणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार : रुपाली चाकणकर

रुपाली चाकणकर यांचा सुषमा अंधारेंना इशारा

    20-Mar-2026   
Total Views |

Rupali Chakankar (2)
 
 
मुंबई : बदनामीचा कट रचणाऱ्यांवर कायदेशीर मार्गाने कारवाई करणार असल्याचा इशारा माजी राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिला. राजीनामा दिल्यानंतर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. “शिवलिका संस्थानच्या महादेव मंदिर ट्रस्टवर मी सुरुवातीपासून सदस्य होते. त्यानंतर मी महिला आयोगाची अध्यक्ष झाले. खरात कुटूंबियांना आमच्या कुटूंबाने गुरू मानले. गुरुपौर्णिमा कार्यक्रम आणि इतर धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही तिथे जात होतो. माध्यमांमध्ये दाखवले जात असलेले व्हिडिओ हे जूने व्हिडिओ आहेत. आज आपल्यासोबत वागणारे लोक पुढे जाऊन कसे आहेत, ते आपल्याला सांगता येत नाही. कॅप्टन अशोक खरात आणि त्याच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल जेव्हा मला कळले तेव्हा मी ट्विटही केले आहे. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कसा वागतो किंवा पुढील काही वर्षांनी कसा वागेल यावर आपले नियंत्रण नसते.”, असे त्या म्हणाल्या.
 
“अध्यात्मिक श्रद्धेच्या आणि वारकरी कुटूंब म्हणून आम्ही खरातच्या संपर्कात आलो. जे काही घडले ते अत्यंत चुकीचे आणि घाणेरडे कृत्य आहे. पोलीसांनी या प्रकणाचा सविस्तर तपास करावा, ही मागणी मी राज्याचे पोलीस महासंचालक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली होती. पारदर्शक तपास व्हावा, अशी मागणी मी यावेळी केली आहे. खरातच्या संदर्भात यापूर्वीच एक बातमी छापून आली होती. त्यानंतर समुपदेशकांनी माझ्या कार्यालयाद्वारे संबंधित पोलीस यंत्रणाना कार्यवाहीचे निर्देश दिले होते. मात्र, या तपासात पोलीसांना कुठलेही पुरावे आढळले नाहीत. किंवा पत्रकाराकडेही संदर्भात पुरावे आढळले नाहीत. त्याने मोघम स्वरुपात ही बातमी दिली होती. सध्या सुरू असलेल्या माध्यमांतील बातम्या चुकीच्या आहेत, त्याचा मी निषेध करते.”, असेही त्या म्हणाल्या.
 
“त्यानंतर आणखी एका महिलेची तक्रार आमच्याकडे आली. त्यात खरातचे कुठलेही नाव नव्हते. मात्र, यात खरातकडे काम करणाऱ्या व्यक्तींची नावे होते. त्यावरही आम्ही पोलीसांकडे कारवाई करण्याची मागणी केली होते. त्यानंतर कॅप्टन खरातचा संबंध आला हे कळल्यानंतर आम्ही ट्विट करुन या संदर्भातील भूमिका स्पष्ट केली. मात्र, ज्या प्रकारे माझे जूने फोटो दाखवून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. माझ्या अकाऊंटवर २ सप्टेंबरचे फोटो एडीट करुन अमवास्येच्या दिवशीचा फोटो असल्याचा दाखवला जात आहे. मी २ सप्टेंबर रोजी अजितदादांच्या दौऱ्यात होते. त्यावेळचे फोटो आजही माझ्या अकाऊंटवर आहे. मात्र, माझे फोटो चुकीच्यापद्धतीने एडीट करुन चालवले जात आहेत. खरात सोबत आणखी बऱ्याच नेत्यांचे फोटो आहेत. मात्र, महिला म्हणून मला ‘सॉफ्ट टार्गेट’ केले जात आहेत.”, असेही त्या म्हणाल्या.
  

“सामाजिक कार्यात आम्ही खरात सोबत होतो. मात्र, सहा वर्षांपूर्वीचे व्हिडिओ दाखवले जात आहे. पुढे जाऊन तो व्यक्ती काय करेल या संदर्भातील आपल्याला माहित नसते. खरातची दुसरी काळी बाजू आम्हाला माहिती नव्हती. या प्रकरणाला जोडून माझ्या बदनामीचा कट ज्यांनी रचला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशाराही चाकणकर यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. नाशिक येथे तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि कॅप्टन अशोक खरात याला महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यात अटक झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. यादरम्यान, रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातसोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यात अशोक खरातच्या डोक्यावर छत्री धरताना, त्याचे पाद्यपुजन करताना आणि ओवाळतानाचे काही फोटो आहेत. तसेच अशोक खरात याने स्थापन केलेल्या शिवनिका संस्थान ट्रस्ट या संस्थानवर रूपाली चाकणकर संचालक असल्याचेही समोर आले. यामुळे सातत्याने रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती.
 
पोलिस महासंचालकांची घेतली भेट

दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेत त्यांना राज्य महिला आयोगाच्या वतीने पत्र दिले. या पत्रात अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल आणि वस्तुनिष्ठ तपास व्हावा. तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत या प्रकरणातील सत्यता बाहेर यावी आणि आरोपीवर कारवाई व्हावी, यासाठी आपल्या स्तरावरून निर्देश देण्याबाबत सांगितले. त्यानंतर त्यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला.


तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.