संभलमधील जामा मशिदीच्या सजावटीसाठी प्रशासनाचा स्पष्ट नकार!

20 Mar 2026 17:27:31
Sambhal Jama Masjid
 
मुंबई : (Sambhal Jama Masjid) ईदच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील संभल येथे असलेल्या जामा मशिदीच्या सजावटीची परवानगी इंतजामिया समितीने मागितली होती. मात्र जिल्हा प्रशासन आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांनी मशिदीची रंगरंगोटी व सजावट करण्यास स्पष्ट नकार दिल्याचे निदर्शनास आलेय. सुरक्षा कारणांचा हवाला देत ही मागणी फेटाळण्यात आली आहे. या निर्णयानंतर स्थानिक प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे.
 
मशिदीचे अध्यक्ष जफर अली यांनी प्रशासनाच्या या कठोर भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, गेल्या वर्षी एएसआयची परवानगी घेऊन मशिदीवर रंगीत लाईट्स लावण्यात आल्या होत्या तसेच रंगरंगोटीही करण्यात आली होती; मात्र यंदा अचानक बंदी घालण्यात आली आहे. समितीने प्रशासनाला निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली असली तरी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, कोणत्याही प्रकारची नवी हालचाल किंवा काम करण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही.
 
प्रशासनाच्या मते, मशिदीशी संबंधित संवेदनशीलता लक्षात घेता कोणतीही अतिरिक्त सजावट किंवा काम केल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शांतता राखण्यासाठी खबरदारी म्हणून ही बंदी घालण्यात आलीय. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या परिस्थितीत कोणताही बदल किंवा हालचाल वातावरण तणावपूर्ण करू शकते, त्यामुळे हा निर्णय आवश्यक होता.
 
हेही वाचा : Iran-Israel War : आखात पेटलं! इराणचा जगातील सर्वात मोठ्या 'एलएनजी' प्रकल्पावर हल्ला
 
रमजानच्या अखेरच्या जुम्यासाठी ड्रोनद्वारे नजर
 
शुक्रवार, दि. २० मार्च रोजी रमजानच्या अखेरच्या जुम्याच्या नमाजाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण संभल परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. दुपारी १:४० वाजता होणाऱ्या नमाजासाठी मशिदीजवळ मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शांतता राखण्यासाठी प्रशासन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असून संपूर्ण परिसरावर ड्रोन कॅमेरे आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रत्येक ठिकाणी पोलिसांची कडक नजर आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0