मुंबई : (BDD Chawl) गुढी पाडवा…नवचैतन्याचा, नव्या सुरुवातीचा आणि आशेचा सण. यंदाचा गुढी पाडवा मात्र नायगावच्या बीडीडी चाळवासीयांसाठी खऱ्या अर्थाने आयुष्य बदलून टाकणारा ठरला. वर्षानुवर्षे 180 स्क्वेअर फूटच्या छोट्या घरात, मर्यादित सुविधांमध्ये आयुष्य घालवलेल्या या कुटुंबांनी आज आधुनिक टॉवरमधील नव्या घरात गुढी उभारून नव्या आयुष्याची सुरुवात केली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते चाव्यांचे वितरण झाल्यानंतर, अनेक कुटुंबांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्या चाव्या फक्त घराच्या नव्हत्या तर स्वप्नपूर्तीच्या, संघर्षाच्या आणि नव्या आशेची दार उघडणाऱ्या होत्या.
यापैकीच एक नायगाव पोलीस वसाहतीत राहणाऱ्या मनीषा डंबाळे ताईंसारख्या अनेक महिलांसाठी हा क्षण खास होता. 1990 साली लग्न होऊन मुंबईत आलेल्या मनीषा ताईंनी पाण्यासाठी रांगा, सामायिक शौचालय, आणि एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारी माणसे असे चाळीतले आयुष्य जवळून अनुभवले. आज मोठ्या घरात गेल्यांनतर तो संघर्ष आणि त्या आठवणी सांगताना मनीषाताईंच्या डोळ्यांत पाणी तरळते तर नव्या घरात उभारलेली गुढी त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची झळाळी आणते.
“बीडीडी चाळ आमची माऊली होती. तिच्याच आशीर्वादाने आज छोट्या घरातून मोठ्या घरात आलो. या चाळीने आम्हाला जगायला शिकवलं,” असे त्या भावुक होऊन सांगतात. मनीषाताईंचे पती जयवंत डंबाळे यांनी मुंबईकरांच्या सेवेत पोलीस खात्यात तब्बल ३६ वर्ष सेवा दिलेले अधिकारी आहेत. यांच्यासाठी तर हा क्षण अभिमानाचा आहे. “चाळीत घर लहान होतं, पण माणसांची मनं मोठी होती. आज टॉवरमध्ये आलो, पण त्या आठवणी कधी विसरता येणार नाहीत,” असे ते सांगतात. त्यांच्या मते, हे घर म्हणजे त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टाचे फळ आहे.
हेही वाचा : बाबासाहेबांच्या स्वप्नातील समता समरसतेच्या मार्गाने शक्य; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बीडीडी चाळवासीयांसाठी स्वप्नवत घरे
नव्या टू बीएचके घरात आता प्रशस्त हॉल, स्वतंत्र किचन, दोन बेडरूम्स, अटॅच बाथरूम, 24 तास पाणी आणि पार्किंगसारख्या सुविधा आहेत. खिडकीतून दिसणारा मोकळा नजारा आणि सुरक्षित वातावरण हे सगळे या बीडीडी चाळवासीयांसाठी स्वप्नवत आहे.
आनंदासोबतच एक भावनिक आवाहन
विशेष म्हणजे, दादरसारख्या मध्यवर्ती भागात फक्त १५ लाखांत ५०० स्क्वेअर फूटचे घर मिळणे हे आजच्या रिअल इस्टेट बाजारात जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे अनेक सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबांसाठी हा प्रकल्प ‘सोन्याहून पिवळा’ ठरतोय. त्यामुळेच या आनंदासोबतच एक भावनिक आवाहनही समोर येतं की हे “घर विकू नका, पुढच्या पिढीसाठी जपा.” मुंबईतून मराठी माणूस हळूहळू बाहेर पडत असताना, ही घरे टिकवणे म्हणजे आपल्या मुळांशी जोडून राहणे, असे रहिवाशांचे मत आहे.
सामान्य माणसाच्या जिद्दीचे जिवंत उदाहरण
चाळीतल्या आठवणी, एकत्र साजरे केलेले सण, गच्चीवर झोपलेले दिवस हे सगळं आता इतिहास जमा होईल, पण त्या आठवणींची उब कायम राहील. गुढी पाडव्याच्या या मंगल दिवशी, बीडीडी चाळवासीयांनी केवळ नव्या घरात प्रवेश केला नाही तर त्यांनी नव्या आयुष्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले आहे. संघर्षातून उभे राहिलेले हे यश, मुंबईच्या बदलत्या चेहऱ्याचे आणि सामान्य माणसाच्या जिद्दीचे जिवंत उदाहरण ठरत आहे.