नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "मी ठराव पारित केला त्यानुसार, पुरुषांना महिलांच्या खेळांपासून दूर ठेवले जाईल. तसेच जगात फक्त दोनच लिंग आहेत - स्त्री आणि पुरुष.” ट्रम्प यांचे म्हणणे की, स्त्रियांसाठी असलेल्या स्पर्धेत पुरुषांना खेळू दिले जाणार नाही, हे काही अंशी योग्य आहे. मात्र, ‘जगात दोनच लिंग आहेत, ती म्हणजे स्त्री आणि पुरुष’ हे ट्रम्प यांचे म्हणणे म्हणजे सत्य आणि विज्ञान नाकारणारेच. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे सत्य नाकारणार्या गॅलिलिओला चर्चसंस्थेने नरकयातना दिल्या. १५व्या शतकातली तीच कठोर चर्चयंत्रणा आजही ट्रम्प यांच्या मुखातून तृतीयपंथीयांचे अस्तित्व नाकारताना दिसत आहे, हेच खरे.
याचदरम्यान, ‘ऑलिम्पिक’च्या संचालकांनी जाहीर केले आहे की, ‘ऑलिम्पिक’मध्ये सहभागी होणार्या प्रत्येक महिलेची लिंगचाचणी करून पुष्टी केली जाईल की, ती स्त्रीच आहे. यावर ‘ऑलिम्पिक’मध्ये सहभागी होणार्या स्त्रियांची लिंगचाचणी करू नये, अशा आशयाचे पत्र जगभरातील ८० मानवतावादी संघटनांनी ‘ऑलिम्पिक’ संचालन करणार्या समितीकडे दिले. या सगळ्यामुळे लिंगओळख, जैविक चाचणी, स्त्री, पुरुष आणि तृतीयपंथी या सगळ्यांबाबत जगभरात चर्चा सुरू आहे. या सगळ्या परिक्षेपात निरक्षिर विवेकबुद्धीने विचार केला तर जाणवते की, ट्रम्प यांनी केलेले विधान हे अंशतः योग्य आहे. ते म्हणाले की, "पुरुषांना महिलांच्या खेळापासून दूर ठेवले जाईल.” याचा अर्थ, महिलांसाठीच असलेल्या खेळ स्पर्धेमध्ये दुसर्या कोणत्याही मार्गाचा अवलंब करून पुरुष स्पर्धक हा महिला स्पर्धकाच्या विरोधात त्या खेळात स्पर्धक नसेल. थोडक्यात, स्त्रीविरोधात स्त्री खेळाडूच स्पर्धेत असेल. हे विधान योग्य वाटते. कारण, २०२४ साली फ्रान्स येथे आयोजित केलेल्या ‘ऑलिम्पिक’मध्ये विचार करण्यासारखी घटना घडली होती. स्त्रियांसाठी असलेल्या वेल्टरवेट (-६६ किग्रॅ) स्पर्धेत अल्जेरियाची इमाने खेलीफ हिला ‘सुवर्णपदक’ मिळाले. मात्र, स्पर्धेतील इतर महिला खेळांडूपेक्षा ती वेगळी होती.
ती स्पर्धेत स्त्री म्हणून सहभागी झाली. मात्र, जैविक रूपात तिच्यात पुरुषांची गुणसूत्र असल्याचे आरोप केले गेले. इमानेच्या लैंगिक ओळखीवर प्रश्न उपस्थित केले गेले, तर दुसरीकडे तैवानची लिन यू-टिंग या महिला स्पर्धकाबद्दलही हाच आरोप करण्यात आला. या दोघींनी त्यांच्या पासपोर्टवर स्वतःची ओळख ‘महिला’ अशी नमूद केली होती. शरीराची रचना महिलांसारखी व्हावी, यासाठी प्रयत्नही केले होते. कागदोपत्री त्या महिला होत्या; पण गुणसूत्रानुसार त्या महिला नाहीत. त्यामुळे महिलांच्या सोबत त्यांना स्पर्धक म्हणून उभे करणे हा इतर महिलांवर अन्याय आहे, असे त्यावेळी सगळ्यांचेच मत होते. ते योग्यही आहे. यावर पाश्चात्त्य अभ्यासकांचे म्हणणे आहे की, "एखाद्या व्यक्तीला वाटले म्हणून त्याने शारीरिक लिंगओळख बदलली. पण, शारीरिक लिंगओळख बदलून त्याने स्वतःचे समाधान केले. मात्र, जगाने केवळ त्याला वाटते म्हणून त्याला त्याच्या नव्या ओळखीनेच ओळखावे, अशी सक्ती का करावी? अर्थात, यावरही अनेक मतप्रवाह आहेतच.
या सगळ्या परिक्षेपात २०२८ साली अमेरिकेच्या लॉस एंजिल्स शहरात होणारे ग्रीष्मकालीन ‘ऑलिम्पिक हे वादविवादात रंगले आहे. स्पर्धक महिलांची लिंगचाचणी केली, तर त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर, ओळखीवर गदा येईल, असे काही मानवतावादी संघटनांनी म्हटले आहे, तर काही लोकांचे म्हणणे आहे की, व्यक्तीला स्त्री, पुरुष किंवा तृतीयपंथी आहोत, ही ओळख जर वर्गवारीनुसार नोंद करायची गरज असेल; तर ही चाचणी होणे गरजेचे आहे. लिंगजाणीव ही लपवून न ठेवता, तिचा स्वीकार करणे आणि त्यानुसार सन्मानाने जगणे, हेच कोणत्याही लिंगाच्या माणसासाठी अभिप्रेत आहे. ओळख लपवणे हा एकप्रकारे गुन्हाच आहे. अर्थात, काहीवेळा स्वत:ची जनुकीय गुणसूत्रे काय आहेत, याबाबतही सगळ्यांनाच माहिती नसते. पण, त्याबाबत माहिती झाले तरी ते स्वीकारून आपल्याला काय हवे, तसे जगणे महत्त्वाचे आहे. यावर प्रश्न असा आहे की, खरेच अंतःप्रेरणेने आणि जनुकीय गुणसूत्रांच्या बदलामुळे एखाद्या व्यक्तीला पुरुष असून स्त्री किंवा स्त्री असून पुरुष व्हावेसे वाटत असेल, तर त्याने ती ओळख अवश्य मिळवायला हवीच. पण, ओळख मिळवल्यानंतर पुढे काय? हा प्रश्न निरंतर आणि चिरंतन आहे. ट्रम्प यांच्या विधानाने आणि २०२८ साली होणार्या ‘ऑलिम्पिक’ने या प्रश्नाला ऐरणीवर आणले आहे एवढेच!