छत्रपती संभाजीनगरात ४०० किलो गोमांस जप्त; ८ जिवंत गायींची सुटका!

20 Mar 2026 17:52:04
Sambhajinagar Police Raid

मुंबई : (Sambhajinagar Police Raid) छत्रपती संभाजीनगरात गोतस्करीची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी सकाळी सुमारे ६.३० वाजता पोलिसांच्या विशेष पथकाने कुरेशी मोहल्ल्यातील एका संशयित शेडवर छापा टाकला. यात ४०० किलो गोमांस आणि ८ जिवंत गायींची तस्करी होत असल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळावरून काही शस्त्रसामग्रीही जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत सध्या इरफान कुरेशी, शेरा उर्फ हुजेफ आणि फराज कुरेशी यांच्यासह ८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
 
ही घटना छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीत घडली. अवैध पशुतस्करी आणि कत्तलीविरोधात कारवाई करताना पोलिसांनी मोठा साठा उघडकीस आणला. छाप्यात सुमारे ४०० किलो प्रतिबंधित गोमांस आढळले, जे नियमांनुसार जागेवरच खड्डा खोदून नष्ट करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हा साठा बेकायदेशीररित्या ठेवण्यात आला होता. कारवाईदरम्यान पोलिसांनी ८ जिवंत गायींची सुटका केली. या गायींना अवैध कत्तलीसाठी ठेवण्यात आल्याचा संशय आहे. सध्या त्यांना सुरक्षितरित्या गोशाळेत हलविण्यात आल्याची माहिती आहे.
 
घटनास्थळावरून तस्करीसाठी वापरले जाणारे वाहन, कत्तलीची साधने आणि दोऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत १० लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ८ आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम ३२५, प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ तसेच धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 
हेही वाचा : संभलमधील जामा मशिदीच्या सजावटीसाठी प्रशासनाचा स्पष्ट नकार!
 
पैठणमध्ये ५०० किलो गोमांस जप्त!
 
पैठण तालुक्यातील बालानगर शिवारातही गोमांस विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय. एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी पहाटे केलेल्या धडक कारवाईत ५०० किलो गोमांस आणि दोन दुचाकीसह लाखोंचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी गणी सांडू शेख, मेहमूद सत्तार शेख, मुजाहीद गणी शेख-कुरेशी, मुस्ताकीम गणी शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतलेय. सदर प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सध्या सुरु आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0