श्रीनगर, जम्मू व काश्मीर: (Srinagar violent protests) इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणमधील नागरिकांनी रस्त्यांवर उतरून फटाके फोडले आणि आनंद व्यक्त केला. मात्र भारतात, विशेषतः काश्मीर आणि लखनऊसह अनेक ठिकाणी कट्टरपंथींनी शोकसभा, मार्च आणि विरोध प्रदर्शन केले.
बेमिना परिसरात हिंसक निदर्शन
श्रीनगरमधील बेमिना परिसरात खामेनी यांच्या मृत्यूनंतर हजारो कट्टरपंथी जमा झाले आणि निदर्शनं केली आणि खामेनी यांचे फोटो व पोस्टर्स घेऊन निषेध नोंदवला. या निदर्शनांना हिंसक वळण लागले. जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि काही ठिकाणी लाठीचार्ज केला. प्रशासनाने परिसरात अतिरिक्त पोलिस व सुरक्षा दल तैनात केले, संचारबंदी लागू केली आणि इंटरनेट देखील बंद ठेवण्यात आले, जेणेकरून अचानक होणाऱ्या निदर्शनांवर नियंत्रण ठेवता येईल.
शाळा व महाविद्यालये बंद
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहराच्या उपनगरीय भागात निर्बंध अधिक कडकपणे लागू केले आहेत. सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. जवळजवळ तीन महिन्यांच्या हिवाळी सुट्टीनंतर, इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा आज पुन्हा सुरू होणार होत्या, परंतु प्रशासनाने सुरक्षा कारणास्तव अभ्यासक्रम व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. ही उपाययोजना तात्पुरती असून परिस्थिती नियंत्रणात आल्यावर हळूहळू उठवली जाईल.
मुख्यमंत्र्यांचा शांततेचा आग्रह
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह यांनी सर्व नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “शोक व्यक्त करणाऱ्या नागरिकांना शांतपणे दुःख व्यक्त करण्याची मुभा मिळावी. प्रशासनाने अत्यंत संयम दाखवून जबरदस्ती किंवा निर्बंध टाळले पाहिजेत.” मुख्यमंत्री म्हणाले की सरकार परराष्ट्र मंत्रालयासोबत समन्वय साधून, इराणमधील विद्यार्थ्यांसह सर्व रहिवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेत आहे.