PM Modi : पश्चिम आशियातील सध्याची परिस्थिती आमच्यासाठी चिंतेचा विषय : पंतप्रधान नरेंद्र मोदी

02 Mar 2026 17:09:22
PM Modi
 
नवी दिल्ली : (PM Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिनांक ०२ मार्च २०२६ रोजी मध्यपूर्वेतील संकटामुळे भारत चिंतित असल्याचे म्हटले. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याबरोबर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “पश्चिम आशियातील सध्याची परिस्थिती आमच्यासाठी अत्यंत चिंतेचा विषय आहे. भारत संवादाच्या माध्यमातून सर्व संघर्ष सोडवले जावेत याचे समर्थन करतो. या भागात असलेल्या सर्व भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सर्व देशांबरोबर मिळून काम करत राहू.”
 
जगभर सध्या अनेक तणावांचे वातावरण आहे. भारताची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही नेहमी शांतता आणि स्थिरता कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे, आणि जेव्हा दोन लोकशाही एकत्र उभ्या राहतात, तेव्हा शांततेचा आवाज आणखी सशक्त होतो. भारत संवाद आणि राजनैतिक कूटनीतिद्वारे सर्व वाद सोडवण्यास समर्थन देतो.
 
मध्यपूर्वेतील तणावाची पार्श्वभूमी 
मध्यपूर्वेत तणावाचे प्रमुख कारण इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त लष्करी कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे निधन झाले. यावर प्रतिक्रिया म्हणून इराणने इस्रायलसह खाडी देशांमधील अमेरिकी लष्करी तळांवर प्रत्युत्तर हल्ले केले. लेबनॉनमधील कट्टरपंथी इस्लामिक संघटना हिजबुल्लाने खामेनी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हल्ले सुरू केले, ज्यामुळे संघर्ष अधिक तीव्र झाला. इस्रायलने हिजबुल्लाच्या विरोधात कारवाई केली, ज्यात लेबनॉनमध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
 
शांतता आणि संवादाचा आग्रह
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोर देऊन सांगितले की, सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून, संकटातून बाहेर पडण्यासाठी चर्चेशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. जागतिक पातळीवर तणावाचे वातावरण असताना भारत शांततेच्या मार्गावर ठाम राहील आणि आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहे. पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले की भारत सर्व देशांसोबत सहकार्य करून संवादाद्वारे प्रश्न सोडवण्याच्या भूमिकेवर ठाम आहे.
 

द्विपक्षीय चर्चा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर पंतप्रधान मोदींनी भारत आणि कॅनडा यांच्यात युरेनियम करारावर स्वाक्षऱ्या केल्याचे जाहीर केले. तसेच, दोन्ही देश स्मॉल मॉड्युलर रिऍक्टर्स क्षेत्रात संयुक्तपणे काम करणार असल्याचेही जाहीर झाले. यापूर्वी सोमवारी मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर (पुर्वीचे ट्विटरवर) सांगितले कि, त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि शत्रुत्व लवकर संपवण्यावर भर दिला.
 
खाडी देशांमधील भारतीय नागरिकांची सुरक्षितता
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, खाडी देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित परत आणण्यासाठी सरकार पूर्ण तयारीत आहे. परदेशातील भारतीय दूतावास व मिशनशी सतत संपर्कात आहेत. युक्रेनमधील संकटादरम्यान भारताने आपले नागरिक सुरक्षित परत आणले होते, आणि जिथे जिथे भारतीय आहेत, तिथे त्यांची सुरक्षा सर्वोच्च प्राथमिकता राहणार आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले की, भारत नेहमीच शांतता, स्थैर्य आणि संवादाच्या मार्गावर ठाम राहील. जागतिक स्तरावरील तणावाचे वातावरण आणि मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीवर भारताची भूमिका जबाबदारीने ठरविली आहे. या परिस्थितीत भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसह, शांतता आणि संघर्ष निवारण यासाठी संवादावर भर देणे महत्त्वाचे आहे.
Powered By Sangraha 9.0