संरक्षित सागरी प्रजातींची मासेमारी करणाऱ्यांवर करडी नजर; वन विभाग झाला सर्तक

02 Mar 2026 21:37:08
 illegal trade of protected marine species
 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील संरक्षित सागरी प्रजातींबाबती जनजागृती करुन त्यांची मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी (वन्यजीव) कांदळवन कक्षाला दिले आहेत (illegal trade of protected marine species). वन्यजीव संरक्षण कायाद्याअंतर्गत संरक्षित असलेला पाकट मासा कोल्हापूर येथून पकडल्यामुळे हे आदेश देण्यात आले आहे (illegal trade of protected marine species). राज्यात ज्याप्रमाणे संरक्षित वन्यजीवांबाबत जागृती आहे, त्या प्रकारची जागृती ही सागरी संरक्षित जीवांबाबत नाही. त्यामुळे कोल्हापूरसारख्या कारवाई करण्याबरोबरच सागरी संरक्षित प्रजातींबाबत जनजागृती करण्याचीही गरज आहे. (illegal trade of protected marine species)
 
 
 
 
शार्क, स्टिंगरे, गिटारफिश, वेजफिश आणि इलेक्ट्रिक रे अशा संरक्षित व अत्यंत संकटग्रस्त सागरी प्रजातींची या बंदरांवर सहजपणे आढळून येतात. मुंबईतील तसेच कोकण किनारपट्टीवरील प्रमुख मासे उतरवण्याचे केंद्र आणि बाजारांमध्ये नियमितपणे या संरक्षित सागरी प्रजाती आढळून येतात. कोल्हापूरातील फुलेवाडी येथे २५ फेब्रुवारी रोजी शाॅर्टफिन डेव्हिल रे हा पाकट मासा आढळून आला. ही प्रजात वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत प्रथम श्रेणीत म्हणजेच वाघाच्या संरक्षण दर्जाच्या श्रेणीत समाविष्ट आहे. त्यामुळे या माशाची विक्री करणाऱ्यास कोल्हापूर वन विभागाने अटक केली. हे प्रकार वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ उल्लंघनाबरोबरच संकटग्रस्त प्रजातींना नामशेष होण्याच्या अधिक जवळ घेऊन जात असल्याने याबाबत राज्यस्तरावर कारवाई करण्याची विनंती साताऱ्याचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षकांना पत्राव्दारे केली होती. या पत्राची दखल घेत प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी कांदळवन कक्ष आणि ठाणे-कोल्हापूरच्या प्रादेशिक व वन्यजीव विभागाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
 
 
 
प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, "मुंबई आणि कोकण किनारपट्टीवरील मासळी उतरविण्याच्या केंद्रावर मोठ्या संख्येने संरक्षित सागरी प्रजाती पकडून आणल्या जात आहेत. या प्रजाती वन्यजीव संरक्षण कायदा, सायटीस आणि आययूसीएनच्या संरक्षण यादीत संरक्षित आहेत. ससून डॉक, भाऊ चा धक्का, मिरकरवाडा (रत्नागिरी), हर्णे (दापोली), अलिबाग, पालघर आणि इतर मासेमारी केंद्रांवर अशा प्रजातींची खुली विक्री करण्यात आली आहे. वरील बाब लक्षात घेता कांदळवन कक्ष, प्रादेशिक वन विभाग आणि वन्यजीव विभागाने मत्स्यव्यवसाय विभागाशी समन्वय साधून जनजागृती आणि मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई करावी."
 
 
मुंबईतील मासे उतार केंद्रांवर केलेल्या क्षेत्रीय निरीक्षणांदरम्यान खालील संरक्षित रे व शार्क प्रजाती (IUCN स्थितीसह) आढळून आल्या आहेत -
रे व संबंधित प्रजाती :
* स्मूथ नोज वेजफिश (Rhynchobatus laevis) – अतिशय संकटग्रस्त
* शॉर्ट टेल व्हिपरे (Maculabatis bineeshi) – अतिशय संकटग्रस्त
* बो-माउथ गिटारफिश (Rhina ancylostomus) – अतिशय संकटग्रस्त
* ग्रॅन्युलेटेड गिटारफिश (Glaucostegus granulatus) – अतिशय संकटग्रस्त
* स्पाइन टेल डेव्हिल रे (Mobula mobular) – संकटग्रस्त
* हनीकॉम्ब व्हिपरे (Himantura undulata) – संकटग्रस्त
* ब्लिकर्स व्हिपरे (Pateobatis bleekeri) – संकटग्रस्त
* व्हाईट स्पॉटेड व्हिपरे (Maculabatis gerrardi) – संकटग्रस्त
* रेटिक्युलेट व्हिपरे (Himantura uarnak) – संकटग्रस्त
* लाँगहेडेड ईगल रे (Aetobatus flagellum) – संकटग्रस्त
* लाँगटेल बटरफ्लाय रे (Gymnura poecilura) – असुरक्षित
* व्हाईट स्पॉटेड ईगल रे (Aetobatus ocellatus) – असुरक्षित
* अरेबियन ड्वार्फ व्हिपरे (Brevitrygon walga) – जवळपास संकटग्रस्त
* गल्फ टॉरपीडो (Torpedo sinuspersici) – माहिती अपुरी
 
 
शार्क प्रजाती :
* स्कॅलप्ड हॅमरहेड शार्क (Sphyrna lewini) – अतिशय संकटग्रस्त
* ब्रॉडफिन शार्क (Lamiopsis temminckii) – संकटग्रस्त
* कॉमन ब्लॅकटिप शार्क (Carcharhinus limbatus) – असुरक्षित
* मिल्क शार्क (Rhizoprionodon acutus) – असुरक्षित
* स्पॉट-टेल शार्क (Carcharhinus sorrah) – जवळपास संकटग्रस्त
* अरेबियन कार्पेट शार्क (Chiloscyllium arabicum) – जवळपास संकटग्रस्त
* स्पेड नोज शार्क (Scoliodon laticaudus) – जवळपास संकटग्रस्त
Powered By Sangraha 9.0