प्रख्यात लेखक आणि विचारवंत युअल नोआह हरारी याचं एक वाक्य आहे, “असंबद्ध माहितीने भरलेल्या जगामध्ये स्पष्टता असणे, ही एका प्रकारची शक्ती आहे!” जगभरात काय चाललं आहे याची माहिती, आपल्याला अवघ्या काही क्षणांत मिळते. अर्थात, ही केवळ माहितीच्या स्तरावरच राहते. या माहितीचं रूपांतर बोध किंवा ज्ञानामध्ये अत्यंत कमी वेळा होतं. आजच्या आपल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात समोर असलेली माहिती खरी आहे की खोटी, याची झडती घेऊनच आपल्याला पुढे जावे लागते. एकीकडे माहितीचा भडिमार होत राहतो आणि दुसऱ्या बाजूला अर्धी माणसं त्याला प्रमाण मानून पुढे जातात; तर काही माणसं सत्यशोधाच्या मागे लागतात. काही दिवसांपूर्वी असाच काहीसा प्रकार समोर आला. अमेरिकेतील ताम्पा विमानतळाने, पायजाम्यावर बंदी घातल्याची माहिती त्यांच्या अधिकृत समाजमाध्यमांवरून प्रसारित झाली!
यामुळे समाजमाध्यमांवर हलकल्लोळच माजला. अमेरिकेसारख्या स्वातंत्र्याचा पुरस्कार व गौरव करणाऱ्या राष्ट्रामध्ये हे व्हावे, हीच बाब अनेकांना पटणारी नव्हती. कोणी काय कपडे घालावे, हे सांगण्याचा अधिकार यांना कुणी दिला? असे मत अनेकांनी व्यक्त केले. मात्र, व्यक्तिस्वातंत्र्यासाठी रणात उतरलेल्यांच्या पदरी नंतर निराशाच आली. वास्तविक, ताम्पा विमानतळाने मुद्दामहून गंमत म्हणून ती पोस्ट केली होती. मागील काही काळापासून अशाच प्रकारच्या हलके-फुलक्या विनोदी पोस्ट समाज माध्यमांवर करत, लोकांशी संवाद साधण्याचं काम त्यांच्याद्वारे केले जात होते. समाज माध्यमे कंटेंटसाठी, व्ह्यूजसाठी ओळखली जातात. नव्हे, आकड्यांवरच या समाजमाध्यमांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे नाना क्लृप्त्या करून, लोकांचे लक्ष वेधून घेण्याचे काम बरीच मंडळी करत असतात. सद्यस्थितीत कुठल्याही पेहरावावर बंदी नसली, तरी अनेकांनी विमानतळाच्या या नव्या नियमाचे स्वागतसुद्धा केले होते.
आपण जी वस्त्रं परिधान करतो, त्यातून आपल्या संस्कृतीचे, भोवतालाचे दर्शन घडते. माणसं ज्यावेळेला विमानात बसून राष्ट्राच्या सीमा ओलांडतात, त्यावेळेला किमान शिस्तबद्ध नीटनेटका पेहराव असावा, असं मतही अनेकांनी व्यक्त केले. दुसऱ्या बाजूला, अशा प्रकारच्या चौकटीबद्ध पेहरावापेक्षा, ‘कम्फर्ट’ या गोष्टीला काहीजण महत्त्व देताना दिसले. त्यामुळे ‘वस्त्रसंस्कृती’ या परिभाषेतसुद्धा अनेक मतप्रवाह, आपल्याला अनुभवायला मिळतात. पण मतप्रवाह वेगळे असले, तरीसुद्धा एका व्यापक हितासाठी कधीकधी प्रशासनाला काही गोष्टींवर निर्बंध आणावेच लागतात. मात्र, दरवेळेला अशा पद्धतीचे निर्बंध हटवण्यात शहाणपण असतेच असे नाही. उदाहरणार्थ, थायलॅण्ड, सिंगापूर अशा देशांमधील विमानतळावर ‘ड्युरिन’ हे फळ घेऊन जाण्यास सक्त मनाई असते.
या फळाला ‘फळांचा राजा’ असे जरी म्हटले गेले असले, तरी त्याचा वास अत्यंत उग्र आणि खराब असतो. विमानातील बंदिस्त वातावरणात हा वास पसरू नये, म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला. अशातच, थायलंडमध्ये गेलेल्या एका चिनी कुटुंबाचा व्हिडिओ मागच्या वर्षी व्हायरल झाला होता. विमानतळाबाहेरच त्यांनी साडेपाच किलो ’ड्युरिन’ फस्त केले. महागडे फळ फेकून कसे द्यावे, असा विचार केला आणि विमानतळाच्या बाहेरच कार्यक्रम सुरू झाला. अखेर एवढी फळे फस्त केल्यानंतर या कुटुंबातील मुलाने “यापुढे जन्मात या फळाचे तोंड बघणार नाही,” अशी प्रतिज्ञाही घेतली. यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हशा पिकवणाऱ्या प्रतिक्रियांची लाटच बघायला मिळाली. काहींनी या कुटुंबीयांच्या पोटांचं नंतर काय झालं? अशी चेष्टाही केली; तर काहींनी विमानातील सहप्रवाशांबद्दल हळहळ व्यक्त केली. “खाऊन माजावे, पण टाकून माजू नये,” या म्हणीची प्रचितीच इथे आली.
समाजमाध्यमांवर आपल्याला नेहमीच अशा पद्धतीच्या आगळ्या-वेगळ्या गोष्टी, ऐकायला, बघायला मिळतात. आजच्या आपल्या जीवनामध्ये कुठलीही एक स्थिती शाश्वत राहिलेली नाही. त्यातही समोर आलेली माहिती खरी आहे की खोटी, इथपासूनच आपल्या संघर्षाला सुरुवात होते. नंतर त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांच्या पावसात आपल्यालादेखील भिजत राहावंच लागतं. अशावेळी माणसाचा विवेक जागृत असणं किती महत्त्वाचं आहे, याची पुन्हा पुन्हा प्रचिती येते. कारण पायजमा घातला काय किंवा फळ खाल्लं काय, शेवटी दोन्हींचा परिणाम आपल्यालाच भोगायचा आहे!