Nana Palkar Smruti Samiti : एकमेकांना सहाय्य करणे हेच आपल्या सेवा कार्याचे मर्म : सुनील सप्रे

02 Mar 2026 12:28:41

nana palkar smruti samiti

मुंबई (Nana Palkar Smruti Samiti) : “ जीवनरक्षण आणि जीवननिर्माण या दोन कार्यांना आपल्या समाजकार्यामध्ये महत्त्व आहे. आपल्याकडे जे आधी काही त्यातून समाजाला मदत करण्याची भूमिका आपली असली पाहिजे. एकमेकांना सहाय्य करणे हेच आपल्या सेवा कार्याचे मर्म आहे “ असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा भारती दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील सप्रे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर नाना पालकर स्मृती समितीचे कार्याध्यक्ष डॉ. परेश नवलकर, अध्यक्ष डॉ. श्रीकांत बडवे, बोरिवली शाखेचे अध्यक्ष डॉ. अमेय देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.बोरिवली येथे नाना पालकर स्मृती समितीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की “ या कार्यक्रमाप्रसंगी मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी वर्षातून एकदा तरी देशातील विविध सेवा कार्यांना भेट द्यावी. समाजहिताचे काम जवळून पाहावे”

दि. ०१ मार्च रोजी, बोरिवलीच्या मोरेश्वर सेवा संघाच्या प्रांगणामध्ये नाना पालकर स्मृती समितीच्या माध्यमातून ' सेवाभावी पुरस्कार ' २०२६ पार पडला. या कार्यक्रमाला HDFC SECURITIES चे मुख्य क्रियानव्यन अधिकारी व पूर्ण वेळ संचालक आशिष राठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा भारती, दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील सप्रे प्रमुख वक्ते म्हणून या कार्यक्रमाला लाभले होते. मुंबई महानगर पालिकेच्या उपायुक्त (शिक्षण) डॉ. प्राची कोल्हटकर - जांभेकर यांच्या शुभहस्ते विशेष स्मरणिकेचे प्रकाशन पार पडले.

सेवाभावी पुरस्काराच्या माध्यमातून गोरेगावच्या परिवर्तन महिला संस्थेच्या कु. वर्षाताई परचुरे, कांदिवली येथील कर्करोग ग्रस्त रुग्णांचे सहायकर्ते सुरेश अग्रवाल, भक्तीवेदांता हॉस्पिटलच्या वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ती हेतल वर्मा यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. वर्षाताई परचुरे यांच्यावतीने त्यांच्या मातोश्रींना पुरस्कार स्वीकारला.

Powered By Sangraha 9.0