दोडामार्ग-सावंतवाडीतील २५ गावांना 'इको-सेन्सिटिव्ह झोन'चे संरक्षण

02 Mar 2026 20:07:27
eco-sensitive zone

 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्यातील २५ गावांना पश्चिम घाटाच्या पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात केंद्र सरकारने समाविष्ट केले आहे (eco-sensitive zone). केंद्रीय पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाने त्यासंदर्भातील राजपत्र नुकतेच जारी केले आहे (eco-sensitive zone). या निर्णयामुळे दोन्ही तालुक्यातील या २५ गावांमध्ये खाणकाम आणि वृक्षतोडीवर बंदी लागू झाली आहे. (eco-sensitive zone)
 
 
पश्चिम घाटाच्या पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रासंदर्भात स्थापन केलेल्या गाडगीळ अभ्यास समितीने सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्यामधील गावांना पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट करुन घेण्याची शिफारस केली होती. या शिफारसीसंदर्भात निर्णय न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहीत याचिका दाखल करण्यात आली. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र वन विभागाला या दोन तालुक्याची पर्यावरणीय स्थिती आणि येथील गावांमधील वन्यजीवांच्या अधिवासासंदर्भात सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला होता. या आदेशानुसार वन विभागाने सर्वेक्षणाचे काम भारत सरकारच्या 'डब्लूआयआय' या संस्थेला दिले.
 
 
डब्लूआयआयच्या संशोधकांनी २०२१-२२ या काळात सर्वेक्षण पूर्ण करुन सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील २५ गावांचा समावेश पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात करण्याची मागणी केली होती. यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील १२ गावांचा आणि दोडामार्ग तालुक्यातील १३ गावांचा समावेश होता. सर्वेक्षणावेळी संशोधकांनी या २५ गावांमधून सहा वाघांची नोंद केली होती. याशिवाय काळा बिबट्या, खवले मांजर, रानकुत्रे अशा दुर्मीळ आणि संकटग्रस्त वन्यजीवांच्याही नोंदी करण्यात आल्या होत्या. या सर्वेक्षणाचा अहवाल स्वीकारुन मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सावंतवाडी-दोडामार्ग पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र घोषित करण्याचा आदेश दिला. त्याचे पालन करत राज्य सरकारने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करुन सावंतवाडी-दोडामार्गातील २५ गावांना पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राचा दर्जा दिलाय. त्यामुळे यापुढे या गावांमध्ये वृक्षतोडीबरोबर खाणकामास बंदी लागू झाली आहे.
 
या गावांचा समावेश
केसरी, फणसवडे, उडेली, दाभील-नेवली, सरमळे, ओटवणे, घारपी, असनिये, फुकेरी, तांबोळी, कोनशी, भालावल, भेकुर्ली, कुंभवडे, खडपडे, तळकट, झोळंबे, कोलझर, शिरवल, कुंब्रल, पणतूर्ली, उगाडे, भिकेकोनाळ, कळणे, पडवे माजगाव या गावांचा पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रामध्ये समावेश करुन घेण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0