बेकार बाप!

19 Mar 2026 15:26:24
Jitendra Awhad
 
नुकतेच विधिमंडळाच्या अधिवेशनात महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकावरील चर्चेदरम्यान आ. जितेंद्र आव्हाड स्वतःच्या मुलीबाबतीत म्हणाले, "जातीच्या भिंती तोडायच्या असतील, तर मुलगी दुसर्‍या धर्मात द्यायला हरकत नाही. माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली.” पण, मुलगी काय वस्तू आहे की, ती कुणाला द्यायची? त्यामुळे वाटते की, स्वतःच्या मुलीला राजकीय स्वार्थासाठी ‘वस्तू’सारखे वापरणारे आव्हाड हे वैचारिकदृष्ट्या बेकार होतेच; पण एक बाप म्हणूनही बेकार आहेत, असे खेदाने म्हणावे लागेल. असो. आव्हाड खूप मोठे व्यक्तिस्वातंत्र्यवादी असल्याचा देखावा करतात. त्यांना राजकारण करायचे आहे आणि ते हिंदू धर्माच्या विरोधात. मात्र, इतर धर्माच्या सलोख्यात आहोत, हे त्यांना दाखवायचे आहे. त्यामुळे काही लोकांचे म्हणणे आहे की, जितेंद्र हे मुंब्य्रांचे जणू ‘आका’च होते. जर धर्माच्या नावाने भिंतीच पाडायच्या होत्या, तर मग त्यांनी ‘कौम’मध्ये तरी मुलीला द्यायचे. असे केले असते, तर पुरोगाम्यांची आवडती ‘गंगा-जमना तहजीब’ झाली असती. ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’ वगैरे वगैरे तथाकथित निधर्मीवृत्तीचे पालन झाले असते.
 
भरीसभर सासरेबुवा आहेत म्हणून ‘कौम’ने त्यांना आणखीन डोक्यावर घेतले असते. ‘कौमचे सासरे’ म्हणून मग एखाद्या पोरसवदा मुलीची त्यांना ‘कैसा हराया’ म्हणण्याची हिंमत झाली नसती. इतके सगळे फायदे असताना, त्यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मुलगी ख्रिस्ती घरात दिली? लेकीला त्या घरात दिल्याने हिंदू आणि ख्रिश्चनांमधील जी काही सांस्कृतिक भिंत होती, आहे, ती तुटली का? अर्थात, लेकीबद्दल मग ती जितेंद्र आव्हाडांची का असे ना, तिच्या वैयक्तिक जीवनाबाबत बोलण्याचा अधिकार कुणालाच नाही. पण, जितेंद्र आव्हाड यांनी लेकीच्या वैयक्तिक जीवनाला जगासमोर आणले. तेही आपण किती पुरोगामी, निधर्मी आहोत हे दाखवण्यासाठी! जुने-जाणते लोक सांगतात की, पाद्य्रांनी ब्रेडचा तुकडा विहिरीत टाकून हिंदूंना सांगितले होते की, ‘तुमचा धर्म बाटला.’ त्यानंतर हजारो अज्ञानी हिंदूंनी धर्मांतरण केले. पण, जितेंद्र यांच्या बाबतीत असे अज्ञान, लाचारी काही नव्हते. त्यांच्या लेकीच्या इच्छेनुसार, त्यांनी तिला ख्रिश्चन घरी ‘दिले’ असेल तर प्रश्नच नाही. पण, जितेंद्र म्हणतात त्यांनी तिला ‘दिली.’ पोटच्या मुलीला वस्तू समजून देवाणघेवाण करणारा जितेंद्र आव्हाड म्हणजे बेकार बाप!
 
टपोरी!
 
 
राहुल गांधी ‘टपोरी’सारखे वागतात. कुणाही महिलेशी ‘ए, तू’ करून बोलतात. कुणी मुलाखत देत असेल, तर तिथे येऊन हुल्लडबाजी करतात,” असे खा. कंगना राणावत म्हणाल्या. यावर काही लोकांचे म्हणणे आहे की, राहुल गांधींची ही ओळख नव्याने करण्यात आली आहे का? राहुल गांधींचे संसदेतले आणि संसदेबाहेरचे वर्तन हे टपोरीपेक्षा काय वेगळे होते का? हे तेच राहुल गांधी आहेत, जे म्हणाले होते की, "लोक मंदिरात मुलींना छेडण्यासाठी जातात.” मंदिराचा, देवाच्या भक्तांचा संबंध मुलींना प्रताडित करण्याशी लावणार्‍या राहुल गांधीची मानसिकता सभ्य आहे, असे म्हणू शकतो का? त्यांच्यामुळे महिलांना असुरक्षित वाटते, असेही कंगना म्हणाल्या. यावर त्या अभिनेत्री होत्या किंवा त्या अतिशय बिनधास्त वागतात, म्हणून त्यांचे म्हणणे गांभीर्याने घेऊ नये, असे नक्कीच काही काँग्रेसी म्हणतील. पण, महिला खासदार संसदेमध्ये बसलेल्या असताना त्यांच्या दिशेने ‘फ्लाईंग किस’ देणे, पंतप्रधान मोदींना बळेच मिठी मारणे आणि नंतर अतिशय छचोरपणे डोळे मिचकावणे हे कोणत्या सभ्यतेत येते?
 
दुसरीकडे त्यांची ‘भारत जोडो यात्रा’ही याच कारणासाठी कुप्रसिद्ध झाली होती. काँग्रेस पक्षाचा आमचा नेता आला म्हणत, काँग्रेसी कार्यकर्त्यांनी या यात्रेमध्ये स्थानिक आयाबायांना-लेकीसुनांना आणले होते. ही यात्रा ज्यांनी पाहिली त्यांना आठवत असेल की, राहुल त्या आयाबायांशी कशाप्रकारे भेटले. परदेशातच आहोत, या आविर्भावात त्यांनी भेटणार्‍या प्रत्येक मुली-महिलेशी गळाभेट घेतली होती. त्यावेळीही अनेकांना राहुल यांचे हे वर्तन खटकले होते. कुणी म्हणेल की, असे विचार करणार्‍यांची दृष्टी पापी आहे. पण, अजूनही समाजात स्त्री-पुरुषांसंदर्भात काही नियम आहेत आणि गावखेड्यात तर आजही आहेत. असे असताना ते ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान मुली-महिलांना अशाप्रकारे भेटले होते. बिचार्‍या महिला. नेत्याला भेटलो, असा आनंद व्यक्त करण्यापलीकडे त्यांच्या हातात काहीच नव्हते. अर्थात, राहुल गांधी असे का वागतात? तर, याचे उत्तर आहे, ते आणि त्यांचे गांधी खानदान आजही स्वतःला देशाचे राजे समजतात. आपण काहीही केले, तर लोकांनी ते मान्यच नव्हे; तर आवडून घ्यायला हवे, असे त्यांचे मत असते. थोडक्यात, कंगना त्यांना ‘टपोरी’ म्हणाल्या, यात काय नवीन?
 
 
Powered By Sangraha 9.0