मानवतेचा उत्सव : जागतिक महिला दिन

18 Mar 2026 14:05:29
Women
 
नुकत्याच संपन्न झालेल्या ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने स्त्रीविश्वाचे अनेकविध कंगोरे उलगडणारा हा लेख...
 
इतिहास लिहिणार्‍यांच्या हातात बहुतेक वेळा तलवारी होत्या, राजदंड होते, साम्राज्यांचे नकाशे होते; पण इतिहास जगवणार्‍या हातात चूल होती, मूल होते, पुस्तक होते आणि कधीकधी क्रांतीची मशालही होती. तो हात स्त्रीचा होता. सभ्यतेच्या सुरुवातीच्या पहिल्या पावलांपासून आजच्या अवकाशयुगापर्यंत मानवतेचा प्रवास जर आपण काळजीपूर्वक वाचला तर त्यामध्ये एका स्त्रीचा श्वास आहे, तिच्या पावलांचा आवाज आहे, तिच्या सहनशीलतेचा समुद्र आहे आणि तिच्या विद्रोहाची आग आहे.
 
भारतीय सभ्यतेच्या अतिप्राचीन पहाटेच्या काळात, जेव्हा वेदांचे मंत्र जंगलातील आश्रमांमध्ये गुंजत होते, तेव्हा त्या सभांमध्ये एक स्त्री उभी राहते, गार्गी. ती नम्रतेने प्रश्न विचारत नाही; ती विश्वाच्या मुळावर हात ठेवून विचारते, "हे जग कोणत्या सत्यावर उभे आहे?” हा प्रश्न केवळ याज्ज्ञवल्याला नव्हता; तो संपूर्ण मानवतेला होता. त्या सभेत दुसरी एक स्त्री उभी होती, मैत्रेयी. तिच्यासमोर संपत्तीचा डोंगर ठेवला गेला. पण तिने विचारले, "याने मला अमरत्व मिळेल का?” आणि जेव्हा उत्तर "नाही” असे आले, तेव्हा तिने संपत्ती नाकारली आणि ज्ञानाची निवड केली. त्या क्षणी भारतीय संस्कृतीने जगाला सांगितले, स्त्री ही केवळ घराची राखण करणारी नाही; ती सत्याच्या शोधाची सहप्रवासी आहे!
 
पण, इतिहास हा फक्त आश्रमांच्या शांततेत घडलेला नाही. तो बाजारात, रस्त्यावर, चिखलात, संघर्षात घडला आहे आणि तिथेही स्त्री उभी आहे. संतपरंपरेत जनाबाई चक्क विठ्ठलाला म्हणते, "देवा, माझे काम कर.” मुक्ताबाई संतांच्या सभेत पुरुषांना उपदेश देते. बहिणाबाई चौधरी आपल्या ओल्या मातीच्या हातांनी जीवनाचे तत्त्वज्ञान लिहितात. त्यांच्या शब्दांतून एक गोष्ट स्पष्ट दिसते, स्त्री ही केवळ सहनशील नाही; ती विचार करणारी आहे.
 
मराठी साहित्यात जेव्हा विद्रोहाची भाषा जन्माला आली, तेव्हा त्या भाषेला एक धार दिली, नामदेव ढसाळ यांनी. ढसाळांच्या शब्दांत स्त्री ही देव्हार्‍यातील मूर्ती नाही; ती कामाठीपुराच्या अंधार्‍या गल्लीतील जिवंत ज्वाला आहे. ती समाजाच्या दांभिकतेला आरसा दाखवणारी आग आहे. ती प्रेम आहे, पण ती विद्रोहही आहे. ढसाळांच्या कवितेत स्त्री कधी अश्रू बनते, कधी वीज बनते, कधी धगधगणारी राख बनते; पण ती कधीही शांत होत नाही.
 
कुसुमाग्रजांच्या लेखणीत स्त्री म्हणजे मानवतेच्या स्वप्नांचा उजेड आहे. मल्लिका अमर शेख यांच्या शब्दांत स्त्री म्हणजे स्वतःच्या जखमांवर कविता लिहिणारी चेतना आहे. महादेवी वर्मा म्हणतात, "स्त्री ही अपूर्ण कविता आहे, जी अजून पूर्ण व्हायची आहे.” रवींद्रनाथ टागोरांनी लिहिले, "स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे मानवतेच्या आत्म्याचे स्वातंत्र्य.”
 
जगाच्या दुसर्‍या टोकालादेखील स्त्रीचे हे रूप दिसते. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात ओलंप दे गूज लिहिते, "स्त्री जन्माला येते, तेव्हा ती स्वातंत्र्य घेऊन येते.” इंग्लंडमध्ये मेरी वॉलस्टोनक्राफ्ट म्हणते, "स्त्रीला शिक्षण द्या; ती समाज बदलून टाकेल.” सिमोन द बोव्हार लिहिते, "स्त्री ही जन्मतः स्त्री नसते; समाज तिला बनवतो.”
 
पण, इतिहासाचा रस्ता अजूनही सोपा नव्हता. समाजाने स्त्रीला अनेकदा बाजूला ढकलले, तिच्या स्वप्नांवर कुलूप लावले, तिच्या आवाजावर पडदा टाकला. पण प्रत्येक वेळी स्त्री पुन्हा उठली. कधी पुस्तक घेऊन, कधी आंदोलन करून कधी कविता घेऊन! भारतात सावित्रीबाई फुले उभी राहते, हातात पुस्तक घेऊन. समाज तिच्यावर दगड फेकतो, पण ती शाळेचा दरवाजा बंद होऊ देत नाही. महात्मा गांधींच्या आंदोलनात कस्तुरबा गांधी शांतपणे क्रांती घडवतात. सरोजिनी नायडू काव्य आणि राजकारण यांचा सुंदर संगम घडवतात. जगाच्या दुसर्‍या बाजूला रोजा पार्क्स एका बसमध्ये बसते आणि उठण्यास नकार देते. त्या एका क्षणाने संपूर्ण जगाला स्वाभिमानाचा अर्थ शिकवला. पाकिस्तानमध्ये मलाला युसुफझाई शिक्षणासाठी गोळी झेलते; पण तिचा आवाज थांबत नाही. विज्ञानाच्या युगात स्त्री आकाशालाही गाठते. मेरी युरी प्रयोगशाळेतून जग बदलते. भारतातील कल्पना चावला अवकाशात झेप घेते. पृथ्वीच्या सीमांना ओलांडताना ती जगाला सांगते, स्वप्नांना सीमा नसतात!
 
आज भारताच्या सर्वोच्च संविधानिक पदावर द्रौपदी मुर्मू विराजमान आहेत, एका आदिवासी समाजातून आलेली स्त्री. हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा नाही; तो इतिहासाच्या दीर्घ संघर्षाचा परिणाम आहे. महिला दिन हा केवळ फुलांचा आणि शुभेच्छांचा दिवस नाही. हा दिवस स्मरणाचा आहे, त्या लाखो स्त्रियांचा, ज्यांनी इतिहास लिहिला; पण ज्यांची नावे पुस्तकांत आली नाहीत. त्या आईंचा, ज्यांनी मुलांना स्वप्ने दिली. त्या शेतकरी स्त्रियांचा, ज्यांनी जमिनीला जीवन दिले. त्या कामगार स्त्रियांचा, ज्यांनी शहरांना उभे केले. कारण सत्य इतके साधे आहे, सभ्यता पुरुषांनी बांधली असेल, पण ती टिकवली स्त्रियांनी!
 
स्त्री म्हणजे जन्म देणारी शक्ती. पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, ती भविष्य घडवणारी शक्ती आहे. ती समाजाला संवेदनशीलता देते, न्यायाची जाणीव देते आणि मानवतेला करुणेची भाषा शिकवते. जागतिक महिला दिनी आपण जगातील प्रत्येक स्त्रीला सलाम करतो. कारण, इतिहासाच्या प्रत्येक वळणावर, सभ्यतेच्या प्रत्येक संघर्षात, मानवतेच्या प्रत्येक स्वप्नात- एक स्त्री उभी आहे. त्यामुळे महिला दिन आणि त्यानंतर साधारण महिनाभर सुरू असलेला उत्सव हा केवळ महिला दिनाचा उत्सव नसतो, तर तो मानवतेच्या आत्म्याचा उत्सव आहे, तो त्या ज्वालेचा उत्सव आहे, जी कधी विझत नाही, स्त्रीच्या अस्तित्वाची ज्वाला, स्त्रीत्वाच्या या अखंड ज्वालेला मानाचा त्रिवार मुजरा!
 
-विजय इंगळे
 
 
 
Powered By Sangraha 9.0