पुण्यातील कडबनवाडीत लांडगा-कुत्र्याच्या मिलनातून संकरित पिल्लांचा जन्म; लांडग्यांकडून सांभाळ

18 Mar 2026 10:06:25
wolf-dog hybridisation



मुंबई (अक्षय मांडवकर) -
इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी गवताळ सफारी क्षेत्रामधून लांडगा आणि कुत्र्याच्या मिलनातून जन्मास आलेल्या पिल्लांची नोंद झाली आहे (wolf-dog hybridisation). महत्त्वाचे म्हणजे ही पिल्ले हुबेहुब कुत्र्याच्या पिल्लांसारखी दिसत असून त्यांचा सांभाळ दोन प्रौढ लांडग्यांकडून केला जात आहे (wolf-dog hybridisation). ही पिल्ले मोठी होऊन त्यांनी प्रजननास सुरुवात केल्यास लांडग्यांच्या जनुकीय साखळीला मोठा धोका निर्माण होणार आहे (wolf-dog hybridisation). त्यामुळे या पिल्लांना वेळीच वेगळे करणे गरजेचे असून पुणे वन विभाग या पिल्लांच्या नियोजनाबाबत 'भारतीय वन्यजीव संस्थान'सोबत चर्चा करणार आहे. (wolf-dog hybridisation)
 
 
'आययूसीएन'ने आपल्या लाल यादीत भारतीय राखी लांडग्याला 'व्हल्नरेबल' म्हणजेच 'असुरक्षित' श्रेणीत स्थान दिले आहे. महाराष्ट्रात देखील लांडग्याची हीच उपप्रजात आढळते. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये भटके कुत्रे हे लांडग्यांच्या कळपासोबत वावरताना दिसत आहेत. भटक्या कुत्र्यांचे अशा स्वरुपाचे आक्रमण हे मूळ जंगली लांडग्यांना तीन प्रकारे प्रभावित करताना दिसते. एक म्हणजे शिकारीसाठी स्पर्धेत वाढ, दुसरे म्हणजे 'कैनाईन डिस्टेंपर'चे संक्रमण आणि तिसरे म्हणजे संकर (हायब्रिटायजेशन). संकर प्रजातीचे असेच एक उदाहरण कडबनवाडीतून समोर आले असून त्याची दखल वन विभागाने घेतली आहे.

२०२५ च्या हिवाळ्यातील भारतीय राखी लांडग्याच्या विणीच्या हंगामात दी ग्रासलॅण्ड ट्रस्टने याठिकाणी कुत्रा आणि लांडग्याचे प्रत्यक्ष मिलन होतानाची छायाचित्रित नोंद केली. त्यानंतर आता या मिलनामधून जन्मास आलेल्या चार पिल्लांचाही नोंद झाली आहे. श्वान कुळातील प्राणी हे सामाजिकरित्या राहणारे प्राणी आहेत. याच सामाजिक हितसंबंधामुळे कडबनवाडीतील कुत्र्यासारख्या दिसणाऱ्या या चार पिल्लांचा सांभाळ दोन प्रौढ लांडगे करत आहेत. श्वान कुळातील प्रजातींमध्ये दोन वेगवेगळ्या प्रजातींचे एकमेकांसोबत होणाऱ्या संकराची अनेक उदाहरणे जगभरात आहेत. संकरित झालेल्या लांडग्यांचे दोन प्रकार प्राथमिक निरीक्षणाअंती पाहावयास मिळतात. ज्यामध्ये वर्तनात झालेले बदल आणि शाररिक बदल, असे दोन प्रकार आपण ढोबळमानाने पाडू शकतो. काही वेळा संकरित लांडग्यांचे वर्तन हे त्यांचा मूळ वर्तनाशी समरूप म्हणेज हिंस्त्र स्वरुपाचे असते. मात्र, त्याच्या अवयवाची ठेवण आणि रंगसंगती ही कुत्र्यांसारखी असते. तर दुसऱ्या प्रकारात शाररिक ठेवण ही मूळ जंगली लांडग्यासारखीच असते. परंतु, वर्तन हे कुत्र्यांसारखे मैत्रीपूर्ण झाल्यासारखे दिसते. वनक्षेत्र आणि गवताळ प्रदेशांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढलेला वावर पाहता भविष्यात राज्यात मूळ जंगली लांडगे शिल्लक राहतील का ? हा प्रश्न उपस्थित करण्याची आता वेळ आली आहे.
 
'डब्लूआयआय'सोबत चर्चेतून उपाययोजना
कडबनवाडीतील प्रकरणाची नोंद आम्ही घेतली आहे. लांडगा आणि कुत्रा यांच्या मिलनामधून जन्मास आलेल्या पिल्लांचे वेळीच नियोजन करणे आवश्यक असून यासंदर्भात शास्त्रीयरित्या उपाययोजना करण्यासाठी आम्ही भारतीय वन्यजीव संस्थान (डब्लूआयआय) सोबत चर्चा करणार आहोत. - आशिष ठाकरे, वनसंरक्षक, पुणे वन विभाग
प्रमाणभूत कार्यपद्धती (एसओपी) गरज
दी ग्रासलँड ट्रस्टने २०२३ पासून लांडगा आणि भटक्या कुत्र्यांमधील संकराच्या पाच भिन्न घटनांची नोंद केली असून वन विभागाला त्यासंबंधी वेळोवेळी कळवले देखील आहे. कडबनवाडीतील प्रकरणामध्ये सशक्त नराच्या अनुपस्थितीमुळे मादीने माजावर असल्यावर कुत्र्यासोबत मिलन केले ज्यामधून कुत्र्यासारख्या दिसणाऱ्या पिल्लांचेा जन्म झाला आहे. अशा प्रकारची पिल्ले मोठी झाल्यावर मूळ भारतीय राखी लांडग्याच्या जनुकीय साखळीला धोकादायक ठरणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने जन्मास येणाऱ्या पिल्लांचे वेळीच नियोजन करण्यासाठी राज्यपातळीवर एक प्रमाणभूत कार्यपद्धती (एसओपी) गरज आहे. जेणेकरुन अशा घटनांमध्ये वेळीच हस्तक्षेप करता येईल. याविषयी आमची पुणे वन विभागात चर्चा झाली आहे. - मिहीर गोडबोले, संस्थापक, ग्रासलॅण्ड ट्रस्ट
Powered By Sangraha 9.0