PM Narendra Modi : "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो...”, पंतप्रधान मोदींकडून निवृत्त होणाऱ्या खासदारांना शुभेच्छा!

18 Mar 2026 13:02:04
शरद पवार,देवेगौडा आणि खर्गे यांचा गौरव!

PM Narendra Modi Rajya Sabha Speech

मुंबई : (PM Narendra Modi Rajya Sabha Speech)
राज्यसभेतील निवृत्त होणाऱ्या खासदारांच्या निरोप समारंभाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी १८ मार्च रोजी राज्यसभेत भाषण केले. राज्यसभेच्या ३७ सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानिमित्त पंतप्रधान मोदींनी निवृत्त होणाऱ्या सर्व खासदारांच्या कामाचे आणि योगदानाचे कौतुक केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी एक महत्वाचं वक्तव्य केले. 'राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो', असं म्हणत राज्यसभेत निवृत्त होणाऱ्या खासदारांना पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्या.(PM Narendra Modi Rajya Sabha Speech)

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

"हा एक असा प्रसंग आहे जो दर दोन वर्षांनी या सभागृहातील आम्हा सर्वांना भावनिक करतो. संसदेत कायम अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा होत असते. प्रत्येक सदस्य एक विशिष्ट भूमिका बजावत असतो. प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे असते आणि ही भूमिका बजावत असताना काही चांगले-वाईट अनुभव येत असतात. मात्र, आज अशा क्षणी पक्षीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन एक समान आदराची भावना निर्माण होते. या ठिकाणी आज आपले काही सहकारी या सभागृहातून निरोप घेत आहेत, तर काही सहकारी पुन्हा सभागृहात येण्यासाठी निरोप घेत आहेत. सभागृहातून निरोप घेत असलेले काही सहकारी त्यांच्या जीवनात विशेष योगदान देण्यासाठी सभागृहातील अनुभव सोबत घेऊन पुढे जात आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो की राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो. भविष्य तुमची वाट पाहत असतं. तुमचा अनुभव आणि तुमचं योगदान राष्ट्रासाठी कायम सदैव राहील", असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.(PM Narendra Modi Rajya Sabha Speech)
 
 
शरद पवार,देवेगौडा आणि खर्गे यांचा गौरव!

 यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार, एच.डी. देवेगौडा आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रदीर्घ संसदीय अनुभवाचा विशेष उल्लेख करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. "सदन म्हणजे राष्ट्र घडवणारे विद्यापीठ आहे," असेही पंतप्रधान म्हणाले. 
हरिवंश सिंह, रामदास आठवले यांचं कौतुक

पंतप्रधान मोदींनी यावेळी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह यांच्या कामाचं कौतुक केलं. ते म्हणाले की, "त्यांनी सभागृहाचं कामकाज अत्यंत शांत, नम्र आणि संयमितपणे चालवलं. हरिवंशजींना सभागृहात दीर्घकाळ सेवा करण्याची संधी मिळाली. याआधी त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात काम केलेलं आहे." तसेच रिपाइंचे खासदार रामदास आठवले यांच्याही विनोदी शैलीचे कौतुक करत पंतप्रधान मोदी म्हणाले, "रामदास आठवले हेदेखील आज निवृत्त होत आहेत. मात्र, येथील कोणत्याही सदस्यांना त्यांची उणीव भासणार नाही. कारण सर्वांना खात्री आहे की ते उपहास आणि विनोदाची मेजवानी आपल्याला देत राहतील." (PM Narendra Modi Rajya Sabha Speech)





Powered By Sangraha 9.0