मुंबई: (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कडून मुंबईकरांना मोठा आर्थिक झटका बसण्याची शक्यता आहे. पाणीपट्टीत तब्बल ८ टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो लवकरच पालिका आयुक्तांकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. (BMC)
पाणीपुरवठ्याचा वाढता खर्च आणि २०२० पासून पाणीपट्टीत वाढ न झाल्यामुळे होत असलेले आर्थिक नुकसान लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जात आहे. या वाढीमुळे महापालिकेला होणारे संभाव्य १०० कोटी रुपयांहून अधिक नुकसान टाळण्याचा प्रयत्न आहे. (BMC)
सध्या पाणीपट्टीतून BMC ला दरवर्षी सुमारे २,३०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र पाइपलाइनची देखभाल, पाणी शुद्धीकरण, कर्मचाऱ्यांचा खर्च, राज्य सरकारला द्यावी लागणारी रॉयल्टी आणि वाढता वीज खर्च यामुळे आर्थिक ताण वाढत आहे. कोरोनाच्या काळात म्हणजे २०२० मध्ये महापालिकेचे आर्थिक गणित बिघडले होते. त्यानंतर २०२२ पर्यंत पाणीपट्टीत कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे गेल्या काही वर्षांत मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे. (BMC)
दरम्यान, महापौर रितू तावडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पाणीपट्टीवाढीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय बदलण्याची वेळ आली आहे. (BMC)
मुंबईला दररोज सुमारे ४,००० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. सात धरणांमधून येणाऱ्या या पाण्याच्या व्यवस्थापनासाठी मोठा खर्च येतो. त्यामुळे दरवर्षी जूनमध्ये ८ टक्के वाढ करण्याची पद्धत होती, मात्र गेल्या चार वर्षांत ती थांबवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा पाणीपट्टीवाढीचा प्रस्ताव समोर आल्याने मुंबईकरांच्या खिशाला झळ बसणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (BMC)