'रोजा'दरम्यान कॅफेटेरियात जेवणावर बंदी; कॅनडातील शाळेचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात

18 Mar 2026 15:50:38
Lunch Ban During Ramadan
मुंबई : (Lunch Ban During Ramadan) कॅनडातील एका शाळेने समावेशकतेच्या नावाखाली घेतलेल्या एका वादग्रस्त निर्णयामुळे येथील गैर-मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कॅलगरी येथील ‘फेअरव्ह्यू स्कूल’ने रमजानदरम्यान रोजा पाळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ कॅफेटेरिया (भोजनालय) मध्ये जेवणावर बंदी घातली आहे. शाळा प्रशासनाच्या या निर्णयानंतर जे विद्यार्थी रोजा पाळत नाहीत, त्यांनाही दुपारच्या सुटीत उपाशी राहणे किंवा जेवण्यासाठी दुसरी जागा शोधणे भाग पडत आहे. सोशल मीडियावर या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत असून, इतर विद्यार्थ्यांवर धार्मिक प्रथा लादण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला जात आहे.
पालकांना पाठवलेल्या शाळेच्या अधिकृत ई-मेलनुसार, चौथी ते सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी लंच ब्रेकच्या पहिल्या अर्ध्या वेळेत कॅफेटेरियामध्ये खाण्यावर बंदी असेल. तर सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी परिस्थिती आणखी कठीण आहे. त्यांच्या संपूर्ण एका तासाच्या सुटीत लंच रूममध्ये खाण्यावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. शाळेतील ९११ विद्यार्थ्यांपैकी जे रोजा पाळत नाहीत, त्यांनी कुठे जाऊन जेवायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा : मालाड रेल्वे स्थानकात सामुहिक नमाज पठण; तीघांविरोधात गुन्हा दाखल
 
सामान्यतः इस्लाम धर्मात रोजा पाळणे हे किशोरावस्थेनंतर (१३–१४ वर्षे) अनिवार्य मानले जाते. मात्र फेअरव्ह्यू स्कूलने हा नियम चौथीच्या विद्यार्थ्यांनाही लागू केला आहे, ज्यांचे वय केवळ ९ वर्षे आहे. यामुळे जे विद्यार्थी रोजा पाळत नाहीत, त्यांच्यासाठी हा निर्णय ‘क्रूर’ असल्याची टीका होत आहे. कारण त्यांना रोज बसून जेवणाऱ्या ठिकाणी जाण्यासही मनाई करण्यात येत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0