दि. १२ मार्च रोजी ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’ने ‘FIS’च्या सहकार्याने संदेश कॉलेज, टागोर नगर, विक्रोळी पूर्व, मुंबई येथे भव्य विज्ञान प्रदर्शन (KOW-३) आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता व नावीन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना विज्ञान-तंत्रज्ञानाशी संबंधित कल्पना व कार्यरत मॉडेल्स सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा होता. त्यानिमित्ताने या कार्यक्रमाचा मागोवा या लेखात घेतला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते पारंपरिक दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर सरस्वती वंदना व विद्यार्थ्यांनी सादर केलेले स्वागत गीत झाले. प्रमुख पाहुणे व ‘सेवा सहयोग फांऊडेशन’च्या पदाधिकार्यांच्या हस्ते प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन झाले. उद्घाटनादरम्यान मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले व वैज्ञानिक कल्पना व नवकल्पनांचा शोध सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिले. मुंबई परिसरातील एकूण १३ शाळांनी सहभाग नोंदवून ४१ विज्ञान मॉडेल्स सादर केली. प्रदर्शन दोन गटांत विभागले होते: कनिष्ठ गट: इयत्ता पाचवी ते सातवी वरिष्ठ गट: इयत्ता आठवी ते दहावी.
विद्यार्थ्यांनी सौरऊर्जा, सौरकार, जलसंधारण, गॅसगळती नियंत्रण प्रणाली, पर्यावरण संरक्षण व आधुनिक तंत्रज्ञान उपाय यांसारख्या विविध विषयांवर नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. यामध्ये विशेष आकर्षणे होती. प्रदर्शनात विद्यार्थी व अभ्यागतांचे लक्ष वेधून घेणारी अनेक प्रात्यक्षिके व उपक्रम होते. जसे थ्रीडी प्रिंटिंग, DIY (स्वतः करा) उपक्रम, रोबोटिस प्रात्यक्षिके, फूट रॉकेट्स, फायर रॉकेट्स, सोडा रॉकेट्स वगैरे शाळांमधून मॉडेल्स आणण्यासाठी वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती. सहभागी विद्यार्थी व शिक्षकांसाठी चहा, नाश्ता व दुपारचे जेवण पुरवण्यात आले. सहभागी शाळांव्यतिरिक्त जवळच्या चार शाळा व सहा अभ्यासकेंद्रांतील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन मॉडेल्स व प्रात्यक्षिके उत्साहाने पाहिली.
सर्व मॉडेल्सचे मूल्यांकन तज्ज्ञ परीक्षकांनी केले. कामगिरी व नावीन्य यांच्या आधारे कनिष्ठ व वरिष्ठ दोन्ही गटांत पारितोषिके देण्यात आली. प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक, उत्तेजनार्थ पारितोषिक, सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार, प्रश्नमंजुषा स्पर्धा पारितोषिके इत्यादी कार्यक्रमामुळे हा दिवस विशेष स्मरणात राहिला. यावेळी सर्व सहभागी विद्यार्थी व शाळांना त्यांच्या प्रयत्नांच्या सन्मानार्थ प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रयत्नांनी मॉडेल्स बनवले होते. खरे तर या विद्यार्थ्यांच्या घरी तशी विज्ञानाची पार्श्वभूमी नव्हती. कष्टकरी पालकांची ही हुषार मुले होती.
विज्ञानाची कास त्यांनी धरली होती. तर्कसुसंगत वैज्ञानिकता ही त्यांच्या ठायी रूजली होती. त्यामुळेच या प्रदर्शनीमध्ये सहभागी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी तयार केलेेले मॉडेल हे पारितोषिक प्राप्त होते. त्यामुळेच या प्रदर्शनीच्या परिक्षकांना परिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळताना खूप कष्ट पडले. यावेळी बी.एड. महाविद्यालयाच्या प्राध्यापक डॉ. लोंढे मॅडम,दशरथ जाधव,रामचंद्र जाधव, मयूर गांगुर्डे - CSR प्रमुख, FIS ,सेवा सहयोग फाऊंडेशनचे संचालक किशोर मोघे, सेवा सहयोग प्रकल्प अधिकारी अभिनंदन साहाए- ऑपरेशन प्रमुख आकाश गुप्ते, साहाय्यक व्यवस्थापक सुषमा शिंदे साहाय्यक व्यवस्थापक जितेंद्र कामली उपस्थित होते. शिक्षक व पाहुण्यांनी विज्ञान शिक्षणाला चालना देण्यासाठी व विद्यार्थ्यांना त्यांची सर्जनशीलता व नावीन्य दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’च्या प्रयत्नांचे कौतुक केले.
‘सेवा सहयोग KOW-३ विज्ञान प्रदर्शन २०२६’ यशस्वीपणे पार पडले व त्यात विद्यार्थी व शिक्षकांचा उत्साही सहभाग लाभला. प्रदर्शनामुळे तरुण विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक कुतूहल व नावीन्यपूर्ण विचार विकसित होण्यास प्रोत्साहन मिळाले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शन व ‘वन्दे मातरम्’ने झाला.