शिवकीर्तनकार ‘माऊली’

18 Mar 2026 12:19:42
Gajanan Maharaj Wawhal
 
शिवरायांची प्रेरणा आणि तुकोबांची वाणी यांच्या संगमातून युवकांच्या मनात परिवर्तनाचं बीज पेरणार्‍या हभप गजानन महाराज वाव्हळ यांची गोष्ट...
 
महाराष्ट्र म्हणजे संतांची आणि शूरांची भूमी. अवघ्या हिंदुस्थानावर ज्यावेळी परकीय सत्तांनी, धर्मांध टोळ्यांनी गुलामगिरी लादली, त्यावेळी या सत्तेला आव्हान देणारे शूरवीर याच मराठी मुलखात जन्माला आले. रूढी-प्रथांच्या जोखडामुळे ज्यावेळी आपला समाजसुद्धा गलितगात्र झाला, त्यावेळी या समाजात चैतन्य निर्माण करण्याचे काम इथल्या संतांच्या शब्दांनी केलं. भारतभरामध्ये समाजसुधारणांची लाट येण्याआधी, इथल्या मातीत प्रबोधनाचं पर्व सुरू झालं. या प्रबोधनाची पालखी वाहणारी माणसं म्हणजे इथले सामान्य कष्टकरी, वारकरी. कीर्तनाच्या माध्यमातून माऊलींची ‘ओवी’ लोकांच्या कानी पडते आणि आत्मज्ञानाचा साक्षात्कार होतो, अशी अनुभूती आजवर अनेकांनी घेतली. तुकोबांच्या गाथेतील ‘अभंग’ नव्याने समजून घेणारी पिढी आजही आपल्याला सापडते. विचारांचा हाच वारसा घेऊन समाजमनाला दिशा देणारं नाव म्हणजे हभप गजानन महाराज वाव्हळ.
 
मराठवाड्याच्या मातीत, जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात एका छोट्याशा खेड्यात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून कष्ट, संघर्ष हा जणू जीवनाचाच एक अविभाज्य भाग बनला होता. लहानपणी शिक्षणामध्ये फारसं काही मन रमलं नाही. मात्र, अभिनय करणं, नाटकात भाग घेणं हे काम सुरू होतं. दादा कोंडके हे त्या काळचे सुपरस्टार. त्यांच्या चित्रपटांवर भाळलेली पिढी त्यांच्या अभिनयाचे धडे गिरवत होती. गजानन महाराज सांगतात की, "माझ्यासाठी तो काळच संपूर्ण वेगळा होता. पाटी-पुस्तक समोर असलं की, अक्षरांचीच मोडतोड व्हायची, काहीच कळायचं नाही.” तत्कालीन शिरस्त्यानुसार मग अशा विद्यार्थ्यांना शिक्षकांचा जबरी मार बसत असे. अशातच मांडलिक सरांनी मात्र, विद्यार्थ्यांना लळा लावला, समजावून सांगितलं आणि त्यांच्यात बदल घडवून आणला. गजानन महाराज दहावीला असताना परीक्षा पद्धतीमध्ये बदल झाला. अशातच वर्गातील २३ विद्यार्थ्यांपैकी केवळ सहा विद्यार्थी पास झाले, ज्यात सहावा क्रमांक गजानन महाराजांचा होता.
 
अशातच ‘सालकरी’ म्हणून मे महिन्यात त्यांनी शेतात काहीकाळ काम केलं. शेतात काम करत असताना आपल्या वडिलांनी आपल्यासाठी किती हालअपेष्टा सोसल्या, याची जाणीव झाली आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून गेला. दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील येवराई तालुक्यात त्यांनी उच्चशिक्षणाचा ध्यास घेतला. स्वतः आपली खोली शेणाने सारवत, त्यांनी जीवनसाधना सुरू केली. परिस्थितीचे चटके सोसत एकाच वेळी काम आणि शिक्षण अशा दोन्ही गोष्टी त्यांनी केल्या. गिरणीजवळच्या हौदातील पिठाने भाकर करण्याची वेळ त्यांच्यावर आली. मात्र, त्यांनी कुठल्याच टप्प्यावर पराभव स्वीकारला नाही. आपला अनुभव सांगताना ते म्हणतात की, "त्या काळात माझ्या समोर आदर्श होता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा. आंबेडकरांनी जर त्यांच्या काळात १८ तास अभ्यास केला असेल, तर आपण किमान दहा तास अभ्यास करायला हवा;” असा निर्धार करून त्यांनी शिक्षणाशी मैत्री केली. याच काळात काव्यलेखन, कथालेखनामुळे त्यांच्यातील एक सर्जनशील व्यक्ती घडत होता. छत्रपती संभाजीनगर येथे बिगारी कामगार म्हणूनसुद्धा त्यांनी काम केलं. अशातच त्यांना बारावीला ६४ टक्के मिळाले आणि मग त्यांनी मागे वळून बघितलं नाही.
 
कला शाखेमध्ये पदवीचा अभ्यास करताना एका बाजूला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ते आपला सहभाग नोंदवायचे, तर दुसर्‍या बाजूला समाजहिताचा वसासुद्धा त्यांनी घेतला होता. वाचनालय तयार करणं, बंजारा समाजातील महिलांना मदत करणं अशा अनेक गोष्टींमधून त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची चमक दाखवून दिली. दरम्यानच्या काळात अशोक हजारे यांच्या मार्गदर्शनातून त्यांना योग्य ती दिशा मिळाली. पुढे त्यांनी मराठवाडा विद्यापीठातून उच्चशिक्षण घेतले.
 
२००६ साली ते पुण्यात आले. विद्येच्या माहेरीसुद्धा त्यांनी जीवनाचा वेगळा अनुभव घेतला. काहीकाळ तिथल्या सन्याशांच्या आश्रमात ते २७ जणांसाठी स्वतः जेवण बनवायचे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवायला सुरुवात केली. जीवनाला अखेर दिशा सापडली. बर्‍याचदा नोकरी, त्यातून येणारं स्थैर्य हा माणसांच्या जीवनातील परमोच्च बिंदू असतो. मात्र, यातच समाधान मानल्यावर वाढ खुंटते. गजानन महाराजांना या काळात एक गोष्ट लक्षात आली की, शिक्षक हा बाराही महिने शिक्षकच असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांवर ते विद्यार्थ्यांना घेऊन जाऊ लागले. अशातच एकदा एकेठिकाणी श्रोत्यांसमोर व्याख्यान दिल्यानंतर जेव्हा एका वयोवृद्ध आजींनी त्यांचं कौतुक केलं, त्यानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
 
छत्रपतींचा वारसा आणि तुकोबांची वाणी त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांसमोर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. ‘शिवविचार जागर’ अभियानाच्या माध्यमातून त्यांनी युवकांना घडवण्याचा ‘शिवसंकल्प’ केला. ‘शिवचरित्र’ मालिकेचं व्याख्यान असो किंवा लाठी-काठीचं प्रशिक्षण, येणार्‍या पिढीच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत तेवत ठेवायची, हा विचार त्यांनी आपल्या कार्यातून सार्थकी लावला. ‘मी मरेपर्यंत धोतर नेसणार,’ अशी खूणगाठ पक्की करून त्यांनी स्वदेशीचा विचार आपल्या आचरणातून दाखवून दिला. आज वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर त्यांच्या कीर्तनाच्या व्हिडिओ क्लिप्स लाखोंच्या संख्येने बघितल्या जातात. येणार्‍या काळात त्यांना अनाथ मुलांवर छत्रछाया धरणारं अनाथाश्रम बांधायची त्यांची इच्छा आहे. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा!
 
 
Powered By Sangraha 9.0