‘एकात्म मानवतावादा’चे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय

18 Mar 2026 11:54:49
Deendayal Upadhyaya
 
रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष आणि ‘एकात्म मानवतावादा’च्या सिद्धांताचे प्रणेते म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय. भारतीय जनता पक्षातर्फे सध्या देशभरात राबविल्या जाणार्‍या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियाना’च्या निमित्ताने त्यांच्या ‘एकात्म मानवतावादा’च्या तत्त्वज्ञानाचे चिंतन करणारा हा लेख...
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सध्या शताब्दी वर्ष सुरू असून, शताब्दी वर्षानिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ प्रचारक आणि कार्यकर्त्यांच्या खडतर प्रवासाचे आणि कठीण कार्याचे देशभरात स्मरण केले जात आहे. संघाच्या ज्येष्ठ प्रचारकांमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याचे स्मरणसुद्धा मग ओघाने आलेच. भारतीय राजकारणामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय साधी राहणी व प्रामाणिकपणा, समाजाप्रती उदात्त विचार इत्यादीसाठी ओळखले जातात. तसेच त्यांनी राजकीय क्षेत्रात सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि ‘एकात्म मानवतावाद’, ‘अंत्योदया’चा उदात्त विचारसुद्धा मांडला. आपल्या भारतीय ऋषिमुनींनी प्राचीन काळात ‘उपनिषदा’मध्ये ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ हा विचार मांडला आहे, सर्व लोक-मानव सुखी असोत.
 
सर्व रोगमुक्त असोत. सर्वांना शुभ व चांगलेच दिवस यावे. एकूणच, सर्व जगाच्या कल्याणाची भावना उपरोक्त श्लोकामध्ये व्यक्त केलेली आहे. तसेच ७०० वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर माऊली यांनीसुद्धा ‘जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात|’ जगातील प्रत्येक प्राण्याला, मानवाला त्याने जे चांगले इच्छिले आहे, ते मिळो अशी विश्वमंगलाची, विश्वकल्याणाची प्रार्थना पसायदानात केली आहे. भारतीय ऋषींनी उपनिषद तथा ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानामधील जे भारतीय दर्शन आहे, तोच भारतीय सुसंगत विचार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी ‘अंत्योदय’ आणि ‘एकात्म मानवतावाद’ रूपाने समाजासमोर मांडला आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतातील एक महान विचारवंत, तत्त्वज्ञ आणि राजकीय नेते होते. भारतीय संस्कृती आणि परंपरांवर आधारित समाजातील शेवटच्या घटकाच्या विकासाचे दिशादर्शन त्यांनी साध्या आणि सोप्या भाषेत केलेले आहे. म्हणूनच, त्यांना ‘एकात्म मानवतावाद’ आणि ‘अंत्योदय विचाराचे शिल्पकार’सुद्धा म्हणतात.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक
 
भारतीय राजकारणामध्ये साधी राहणी व उदात्त विचाराची पेरणी करणार्‍या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म दि. २५ सप्टेंबर १९१६ रोजी उत्तर प्रदेशातील नागला चंद्रभान, जि. मथुरा येथे झाला. लहानपणीच त्यांचे आई-वडील वारले. त्यामुळे त्यांनी अनेक अडचणींवर मात करून कानपूर येथे पदवी व आग्य्राला पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते. ते अतिशय बुद्धिमान व अभ्यासू विद्यार्थी होते. पदवीचे शिक्षण सुरू असताना, विद्यार्थीदशेतच त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेशी संपर्क आला आणि ते संघशाखेत नियमित जाऊ लागले. संघसंस्थापक डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार, श्री गोळवलकर गुरुजी व भाऊराव देवरस यांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. पुढे त्यांचे संघ अधिकार्‍यांसोबत संबंध इतके घनिष्ठ झाले की, त्यांनी देश, समाजसेवा आणि राष्ट्रीय विचारांचा प्रसार करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक होण्याचा निर्णय घेतला.
 
संघाच्या कार्यपद्धतीनुसार संघ-शिक्षावर्गाचे शिक्षण पूर्ण करून ते १९४२ साली संघाचे प्रचारक म्हणून दीनदयाळजी बाहेर पडले. उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे जिल्हा प्रचारक म्हणून त्यांचे कार्यक्षेत्र होते. संघाच्या विविध जबाबदार्‍या पार पाडत, त्यांनी संघाचे ज्येष्ठ प्रचारक भाऊराव देवरस यांच्यासोबत उत्तर प्रदेश सहप्रांत प्रचारक म्हणून दायित्वाचे निर्वाहनसुद्धा केले होते. उत्तर प्रदेशातील लखनौ, कानपूर, प्रयागराज, वाराणसी येथे त्यांनी संघाचे प्रचारक म्हणून संघकार्य उभे केले होते. पुढे त्यांनी भारतीय राजकारणात प्रवेश केला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक ते भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय महासचिव असा प्रवास करीत, ते भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय प्रमुख नेतेसुद्धा झाले होते.
 
भारतीय जनसंघाचे अध्यक्ष
 
महात्मा गांधी यांच्या हत्येचा आरोप करून संघावर १९४८ साली बंदी घालण्यात आली होती आणि काही महिन्यांनी बंदी उठली; परंतु त्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणणे ऐकणारे राजकीय क्षेत्रात कोणीच नव्हते, ना राजकीय पक्ष किंवा प्रसारमाध्यमेसुद्धा नव्हती. तेव्हा राजकीय क्षेत्रात सांस्कृतिक राष्ट्रवादाचा विचार मांडणारी राजकीय संघटना असावी, म्हणून ‘जनसंघ’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेला. दि. २१ ऑक्टोबर १९५१ रोजी दिल्लीमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वात ‘भारतीय जनसंघ’ स्थापन करण्यात आला. देशात स्वातंत्र्यानंतर राष्ट्रवादी विचार मांडणारा एक मजबूत राजकीय पक्ष उभा राहावा, या उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेऊन जनसंघाची स्थापना झाली होती. सुरुवातीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक पंडित दीनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी, नानाजी देशमुख, लालकृष्ण अडवाणी, सुंदरसिंह भंडारी, कुशाभाऊ ठाकरे यांसारख्या नेत्यांनी पक्षाच्या वाढीसाठी मोठे योगदान दिले.
 
पंडित दीनदयाळ उपाध्याय संघटनेचे महासचिव होते आणि त्यांच्या नेतृत्वात संघटनेची ताकद वाढत होती. त्यांनी ‘एकात्म मानवतावाद’ आणि ‘अंत्योदय’ ही विचारसरणी मांडली, जी जनसंघाच्या धोरणांचा आधार बनली व त्या विचारधारेच्या आधारावर भारतीय जनसंघ देशात फोफावला. सामान्य माणसाला धोरण पटू लागले. जनसंघाचे प्रमुख पुढारी असलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची केरळमध्ये कालिकत येथे दि. २९ डिसेंबर १९६७ रोजी झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात अध्यक्षपदी निवड झाली होती. त्या काळात झालेल्या लोकसभा निवडणुकीत यशसुद्धा मिळत होते. वर्षे १९६२ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनसंघाचे १४ खासदार, तर १९६७च्या लोकसभा निवडणुकीत जवळपास ३५ खासदार लोकसभेमध्ये निवडून आले होते. वर्ष १९७७ मध्ये जनता पार्टी सरकारमध्ये जनसंघाचे जवळपास ९० खासदार होते. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, नानाजी देशमुख, सिकंदर बख्त मंत्रीसुद्धा झाले होते.
 
‘एकात्म मानवतावाद’-एक भारतीय विचारदर्शन
 
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी ‘एकात्म मानवतावाद’ ही विचारसरणी मांडली. त्यांच्या तत्त्वज्ञानानुसार, माणसाचा सर्वांगीण विकास महत्त्वाचा असून समाज, अर्थव्यवस्था आणि संस्कृती यांचा समतोल राखून देशाचा विकास व्हावा, असा त्यांचा विचार होता. भारतीय संस्कृती व परंपरांवर आधारित विकासाची दिशा त्यांनी सुचवून भारतीय संस्कृतीवर आधारित महत्त्वपूर्ण तत्त्वज्ञान मांडले आहे. तसेच त्यांनी सखोल चिंतन करून राजकीय क्षेत्रात ‘अंत्योदय’चा विचारसुद्धा मांडला. त्या काळात पाश्चात्त्य देशांमध्ये भांडवलशाही आणि साम्यवाद या विचारधारा प्रचलित होत्या. परंतु, त्या विचारधारा पूर्णपणे मानवकल्याण साधू शकणारा नाहीत, अशी त्यांची स्पष्ट धारणा होती. त्यामुळे त्यांनी भारतीय परंपरेवर आधारित एक नवा मार्ग शोधला होता. ‘एकात्म मानवतावादा’नुसार माणूस फक्त शरीर नसून, त्यामध्ये शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा तथा व्यष्टी, समष्टी, सृष्टी, परमेष्ठी चार घटक असतात. त्यामुळे माणसाचा विकासही या सर्व घटकांचा विचार करूनच झाला पाहिजे. केवळ आर्थिक प्रगती किंवा भौतिक सुख यालाच महत्त्व देणे योग्य नाही. नैतिकता, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विकासही तितकाच आवश्यक असून, त्यांच्या तत्त्वज्ञानात समाजाला एक कुटुंब मानले गेले आहे.
 
समाजातील सर्व घटक एकमेकांशी पूरक असून समन्वय, सहकार्य आणि बंधुभावसुद्धा महत्त्वाचा असल्याची त्यांची धारणा होती. तसेच देशाचा विकास करताना भारतीय संस्कृती, परंपरा आणि मूल्ये यांची जपणूक करणे, ‘एकात्म मानवतावादा’चा मुख्य उद्देश म्हणजे सर्वांच्या कल्याणाचा विचार करणे होय आणि समतोल विकास घडवून आणणे होय. त्यांचा हा उदात्त विचार उपनिषदामधील ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ या भारतीय तत्त्वाशी सुसंगत सुद्धा आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जेमतेम ५१ वर्षांचे आयुष्य लाभले होते. परंतु, अल्प कालावधीत त्यांना राष्ट्रीय नेतृत्वाचा मान मिळाला होता. त्यांनी संघटना वाढविण्यासोबतच समाजकारण, राजकारण, अर्थकारण इत्यादी विषयावर ‘राष्ट्रधर्म’, ‘पांचजन्य’, ‘दैनिक स्वदेश’, ‘ऑर्गनायजर’मधून सखोल चिंतन आणि विपुल लेखनसुद्धा केले. दि. ११ फेब्रुवारी १९६८ रोजी मुगलसराय येथून पाटणा येथे पक्षकार्यासाठी रेल्वेने जात असताना रेल्वेच्या डब्यात त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे गूढ आजही कायम असून, एका थोर चिंतकाचे व ध्येय समर्पित जीवनाची अखेर मुगलसाराय रेल्वे स्टेशनवर झाली होती. आजचे राजकीय कार्यकर्ते तथा नवीन पिढ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या निःस्वार्थ जीवनकार्याची माहिती व्हावी आणि प्रेरणा मिळावी, म्हणून हा लेखप्रपंच.
 
 
- आ. निरंजन डावखरे
(लेखक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनकार्याचे अभ्यासक तथा महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आहेत.)
 
 
 
Powered By Sangraha 9.0