मुंबई : (Namaz at Malad Railway Station) मालाड रेल्वे स्थानक परिसरात सामूहिक नमाज अदा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस आणि रेल्वे प्रशासनाने आरोपींविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. मुस्ताक बाबू लोन, सोहेब सदाकत शाह आणि बिस्मिल्लाह दीन अंसारी यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवून त्यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे. हे तिघेही व्यवसायाने फेरीवाले असल्याचे सांगितले जाते. भाजप नेते किरिट सोमय्या यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत सार्वजनिक ठिकाणी सामूहिक नमाज अदा करणे हे गंभीर उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा : Delhi fire accident: दिल्लीतील पालम मेट्रो स्टेशन परिसरात भीषण आग, ३ चिमुकल्यांसह ७ जणांचा जळून मृत्यू
किरिट सोमय्या यांनी मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर चार्जशीटची प्रत शेअर केली. त्यांनी सांगितले की, मजिस्ट्रेट न्यायालयाने मुस्ताक बाबू लोन, सोहेब सदाकत शाह आणि बिस्मिल्लाह दीन अंसारी यांच्यावर ५०० रुपयांचा दंड ठोठावून कडक इशारा दिलाय. स्टेशन मास्टरांनी केलेल्या तक्रारीनुसार रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे कायद्याच्या कलम १४७ अंतर्गत गुन्हा दाखल केला. रेल्वे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १६८ अंतर्गत आरोपींना नोटीस पाठवली. किरिट सोमय्या यांनी असा दावा केला की, ही घटना एकदाच नव्हे तर अनेक वेळा घडली आहे. याबाबत त्यांनी प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली होती.