(झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील इचक ब्लॉकमधील बर्का खुर्द पंचायतमध्ये सुमारे ६७ कुटुंबांतील १२० लोकांनी ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू धर्मात ‘घरवापसी’ केली, त्यावेळील छायाचित्र. सौजन्य — IANS)
मुंबई : धर्मस्वातंत्र्य विधेयकाला विधानसभेत मंजुरी मिळाल्यानंतर राज्यात याबाबत विविध स्तरांवर प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषतः धर्मांतरानंतर पुन्हा ‘घरवापसी’ केलेल्या महिलांनी या विधेयकाला पाठिंबा दर्शवलाय. त्यांच्या मते, अशा प्रकारच्या कायद्यामुळे जबरदस्ती, फसवणूक किंवा आमिषांद्वारे होणाऱ्या धर्मांतरांवर आळा बसण्यास मदत होईल.
काही महिलांनी सांगितले की, स्वतःच्या अनुभवातून त्यांनी धर्मांतर प्रक्रियेत आलेल्या अडचणींचा सामना केला असून, या पार्श्वभूमीवर सरकारचा हा निर्णय दिलासादायक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या पालकांनीही या विधेयकाचे समर्थन करत, अशा घटनांपासून इतर कुटुंबांचे संरक्षण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. एकीकडे समर्थन आणि दुसरीकडे विरोध अशा प्रतिक्रिया उमटत असताना, धर्मस्वातंत्र्य विधेयक प्रत्यक्षात लागू झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विशेषतः धर्मांतरानंतर पुन्हा ‘घरवापसी’ केलेल्या मुंबईतील महिलांनी या विधेयकाला पाठिंबा दर्शवला आहे. दै. 'मुंबई तरुण भारत'शी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर त्यांनी बातचीत केली. त्यामुळे सदर महिलांची गोपनीयता अबाधित ठेवण्याासाठी प्रतिक्रिया घेताना त्यांची नावे बदलण्यात आली आहेत.
शाळा कॉलेजातील मुलींकडून ब्रेनवॉश
माझ्या दोन्ही अल्पवयीन मुली नमाज पडतात आणि रोजेही ठेवतात, त्यांच्याच शाळा कॉलेजांमधील मुली त्यांचे ब्रेनवॉश करत आहेत. धर्मांतरण विरोधी कायदा आल्यामुळे माझ्या मुली त्यातून वाचतील अशी आशा आहे.
- रेणुका मकवाना (सांताक्रुज)
जिहादी वृत्तीला समूळ नष्ट करणारा कायदा
मुस्लिम माणसाशी लग्न करून अनेक वर्षे त्रास सहन केल्यानंतर मी पुन्हा माझ्या दोन्हीही मुलांसह हिंदू धर्मात घरवापसी केली आहे. पंधरा-सोळा वर्षांच्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांना धर्मांतरित करणाऱ्या जिहादी वृत्तीला समूळ नष्ट करणारा कायदा बनत असेल तर त्याचे स्वागतच आहे.
- सीमा मुखोपाध्याय (मालवणी)
...तर धर्मांतरणाच्या दृष्ट चक्रात मी फसले नसते
मी मुस्लिम झाले होते, पण मुस्लिम म्हणून मला मरायचे नव्हते. माझ्या दोन्ही मुलींचे लग्न मला हिंदू मुलांशीच करून द्यायचे होते. म्हणून लग्नाच्या २३ वर्षानंतर मी माझ्या दोन्ही मुलींसाठी हिंदू धर्म स्वीकारला. मी कोवळ्या वयात असताना जर कठोर कायदे असते आणि मला सावरणारं कोणी भेटलं असतं तर धर्मांतरणाच्या दृष्ट चक्रात मी फसले नसते. सरकारच्या सदर भूमिकेचे मी स्वागतच करते.
- शोभा देसाई (दहिसर)
जिहादींना जन्माची अद्दल घडायला हवी
अजमलने माझ्याशी प्रेमाचे नाटक केले, फसवून मुसलमान बनवून निकाह केला. मी जेवत असताना जबरदस्ती माझ्या ताटात बिफ (गोमांस) वाढले, न खाल्ल्यास मारहाण केली. सतत अमानुष छळ केल्यानंतर मी माझ्या तान्ह्या बाळासह घर सोडले. दुष्टचक्रात अडकल्यानंतरच धर्मांतरण जिहाद काय असतो, ते मला कळले. धर्मस्वातंत्र्य कायदा येतोच आहे तर तो खूप कठोर असायला हवा. या जिहादींना जन्माची अद्दल घडायला हवी.
- उपासना मातंग (अंबोजवाडी, मालवणी)