मुंबई: (Prajakta Mali Post) मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या अभिनय, नृत्य आणि निवेदन कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या प्राजक्तानं आता आयुष्यात एक नवं पाऊल टाकलं आहे. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्राजक्तानं नुकतीच एक खास पोस्ट शेअर करत सांगितलं की, ती आता 'आर्ट ऑफ लिव्हिंग' च्या ‘हॅपिनेस प्रोग्राम’ची अधिकृत शिक्षिका बनली आहे. यासाठी तिनं गेल्या १५ दिवसांत कठोर प्रशिक्षण घेतल्याचंही तिनं नमूद केलं. (Prajakta Mali Post)
तिच्या पोस्टमध्ये प्राजक्तानं सांगितलं की, या प्रशिक्षणादरम्यान तिनं पूर्णपणे स्वतःकडे लक्ष केंद्रित केलं. फोनचा वापर टाळणं, बाहेरचं अन्न न खाणं आणि दररोज ‘पद्मसाधना’ करणं, अशा शिस्तबद्ध दिनचर्येतून तिनं हा प्रवास पूर्ण केला. मात्र, प्राजक्ताच्या या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि थोडीशी चिंता निर्माण झाली होती. ती आता अभिनय सोडणार का? असा प्रश्न अनेकांना पडला. तिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव झाला. (Prajakta Mali Post)
इंडस्ट्री सोडतेय का?
मात्र, प्राजक्तानं पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे की, ती अभिनय क्षेत्र सोडत नाही. “अजिबात फिल्म इंडस्ट्री सोडून कुठेही जात नाहीय,” असं तिनं ठामपणे सांगितलं आहे. त्यामुळे चाहत्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे. (Prajakta Mali Post)
अभिनेत्री, नृत्यांगना, निवेदिका, कवयित्री आणि उद्योजिका अशी विविध ओळख असलेल्या प्राजक्तानं आता शिक्षिका म्हणूनही नवा अध्याय सुरू केला आहे. लवकरच ती ‘हॅपिनेस प्रोग्राम’ शिकवणार असल्याचंही तिनं जाहीर केलं आहे. एकीकडे आध्यात्मिक आणि वैयक्तिक विकासाचा प्रवास सुरू ठेवत, तर दुसरीकडे अभिनय क्षेत्रातही सक्रिय राहण्याचा तिचा निर्णय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ठरत आहे. (Prajakta Mali Post)