वंचितांचा लढवय्या नरेश

17 Mar 2026 12:09:48
Naresh Bhagwane
 
ठाण्यापासून ते अखिल भारतीय स्तरावर वाल्मीकी समाज आणि अनुसूचित जाती-जमातींच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत, संघटनबद्ध सामाजिक चळवळ उभी करणारे नरेश अंगुरी सोहनलाल भगवाने यांच्याविषयी...
 
समाजातील वंचित घटकांचे प्रश्न मांडणे, अन्यायाविरोधात संघटितपणे उभे राहणे आणि सामाजिक न्यायाच्या दिशेने सातत्याने प्रयत्न करणे, ही समाजकार्यातील महत्त्वाची जबाबदारी मानली जाते. या विचारातून ठाणे शहरात आणि देशभरातील वाल्मीकी समाज, तसेच अनुसूचित जाती-जमातींच्या प्रश्नांसाठी सक्रियपणे काम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून नरेश भगवाने यांची ओळख.
उत्तर प्रदेशातील बुलंद शहर जिल्ह्यातील लाडपूर हे त्यांचे मूळ गाव असले, तरी नरेश अनेक वर्षांपासून ठाणे येथे स्थायिक आहेत. दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच समाजकार्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहून काम सुरू ठेवले.
 
समाजातील सामाजिक आणि आर्थिक विषमता त्यांच्या अनुभवातून स्पष्ट होत गेली. विशेषतः वाल्मीकी समाजातील अनेक कुटुंबांना भेडसावणार्‍या अडचणी त्यांनी जवळून अनुभवल्या. अस्पृश्यतेची भावना, अंधश्रद्धा, जातिभेद, सावकारी प्रथा, रोजंदारी कामगारांवरील अन्याय, तसेच स्त्रियांवरील अत्याचार यांसारख्या प्रश्नांविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला. समाजातील लोकांना संघटित करणे आणि समस्यांवर सामूहिक मार्ग शोधणे, ही त्यांची कार्यपद्धती राहिली आहे.
स्त्रियांचे शिक्षण आणि सक्षमीकरण या विषयाकडेही त्यांनी विशेष लक्ष दिले. मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व समाजात पोहोचावे, यासाठी विविध उपक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. ‘बेटी बचाव’ या संकल्पनेवर आधारित जनजागृती कार्यक्रमांच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाबाबत सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच सफाई कर्मचार्‍यांचे रोखलेले वेतन मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणे, कामगारांच्या अडचणी मांडणे आणि अनुसूचित जाती-जमातींशी संबंधित विविध प्रश्नांसाठी आवाज उठवणे या कामांत त्यांनी सक्रिय भूमिका बजावली.
 
सामाजिक अन्यायाविरोधात उभे राहणे, हीच खरी समाजसेवा असल्याची भूमिका त्यांच्या कार्यातून दिसून येते. हाथरस अत्याचार प्रकरण, बदलापूर अत्याचार प्रकरण यांसारख्या संवेदनशील घटनांबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित सभा, निषेध मोर्चे, ‘लाँग मार्च’ आणि धरणे आंदोलनांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. वाल्मीकी समाजाच्या संघटनबद्ध कार्यासाठी त्यांनी अनेक सामाजिक कार्यक्रम, अधिवेशने आणि सभा आयोजित करण्यामध्ये पुढाकार घेतला. त्यांच्या नेतृत्वात समाजाच्या विविध मागण्यांसाठी अनेकवेळा चर्चा, बैठका आणि अधिवेशने आयोजित करण्यात आली. समाजातील लोकांना एकत्र आणून त्यांच्या प्रश्नांवर संवाद साधणे आणि प्रशासनापर्यंत त्या मागण्या पोहोचवणे, हे त्यांच्या कामाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य.
 
ठाणे शहरात वाल्मीकी समाजासाठी स्वतंत्र सभागृह उभारण्याची, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा निर्माण करण्याची मागणी त्यांनी सातत्याने मांडली. समाजाला एकत्र येण्यासाठी आणि सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम राबवण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध व्हावी, हा या मागण्यांमागील मुख्य उद्देश होता. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. ‘कोविड-१९’ महामारीच्या कठीण काळातही त्यांनी समाजसेवेची परंपरा कायम ठेवली. ‘लॉकडाऊन’च्या काळात अनेक कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत गरजू नागरिकांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आणि आवश्यक ते वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्याच्या कामात त्यांनी सहभाग घेतला. संकटाच्या काळात समाजासोबत उभे राहण्याची गरज त्यांनी कृतीतून दाखवून दिली.
 
समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेत, ठाणे महानगरपालिकेच्या महापौरांच्या हस्ते ‘ठाणे गुणिजन’ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. महर्षी वाल्मीकी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा जोतिराव फुले यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत, नरेश भगवाने सामाजिक कार्य करत आहेत. समाजात शिक्षण, स्वाभिमान आणि संघटन यांचे महत्त्व त्यांनी नेहमी अधोरेखित केले आहे. ‘बहुजन विकास संघ’ या संस्थेच्या माध्यमातून ते समाजकार्यात सक्रिय आहेत. या संस्थेच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना संघटित करणे, शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे, सामाजिक प्रश्नांवर संवाद घडवून आणणे आणि समाजाच्या विविध मागण्यांसाठी संघटित प्रयत्न करणे, हे काम सुरू आहे. वाल्मीकी समाज शिक्षित, स्वयंसक्षम, स्वावलंबी आणि आत्मनिर्भर व्हावा, ही त्यांची भूमिका. तसेच जातिप्रमाणपत्राचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा आणि वाल्मीकी समाजाचा मूलनिवासी समाजात समावेश व्हावा, ही मागणी त्यांनी सातत्याने मांडली. समाजाला प्रगत आणि सन्मानाने जगणारा समाज म्हणून ओळख मिळावी, हेच त्यांच्या कार्यामागील प्रमुख ध्येय. ठाण्यात सुरू झालेला हा समाजकार्याचा प्रवास आज व्यापक स्तरावर समाजाच्या प्रश्नांवर आवाज उठवणार्‍या चळवळीच्या स्वरूपात पुढे येताना दिसतो. संघटनबद्ध प्रयत्न, सामाजिक बांधिलकी आणि सातत्यपूर्ण कार्य यांच्या जोरावर नरेश भगवाने आपली चळवळ सक्रिय ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत, त्यांच्या सकारात्मक प्रयत्नांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वतीने शुभेच्छा.
 
 
- सागर देवरे
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0