मुंबई क्लीन लीग’ची दमदार सुरुवात! अभिनेता अक्षय कुमार यांचे स्वच्छतेसाठी नागरिकांना आवाहन

17 Mar 2026 21:23:28

Akshay Kumar
 
मुंबई (The Mumbai Clean League 2026) : “मुंबई प्रत्येकाला सामावून घेते, त्यामुळे तिला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे,” असे आवाहन अभिनेता पद्मश्री अक्षय कुमार यांनी केले. त्यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘मुंबई क्लीन लीग’ या स्वच्छताविषयक स्पर्धेच्या नोंदणीला मंगळवार पासून सुरुवात झाली.
महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने आयोजित या स्पर्धेचा उद्देश मुंबई शहर आणि उपनगर अधिक स्वच्छ व सुंदर ठेवणे हा आहे. मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात आमदार अमित साटम, उपमहापौर संजय घाडी, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर तसेच आयुक्त भूषण गगराणी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अक्षय कुमार यांनी सांगितले की, स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे. ‘मुंबई क्लीन लीग’मुळे नागरिक, संस्था आणि सेलिब्रिटी यांचा सहभाग वाढून स्पर्धात्मक वातावरण तयार होईल आणि स्वच्छतेला चालना मिळेल.

महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले की, नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी ही स्पर्धा विविध गटांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. यात प्रशासकीय विभाग, निवासी संकुल, झोपडपट्टी परिसर, वाणिज्यिक आस्थापना, रुग्णालये, शाळा, उपाहारगृहे, रस्ते, उद्याने, बाजारपेठा तसेच परिसर दत्तक घेण्याचा विशेष गट यांचा समावेश आहे.
स्पर्धेसाठी नोंदणी प्रक्रिया १७ मार्चपासून सुरू झाली असून इच्छुक नागरिक आणि संस्थांना महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा क्यूआर कोडद्वारे नोंदणी करता येणार आहे. पारदर्शकतेसाठी प्रत्येक नोंदणीकृत घटकाचे मूल्यमापन रिअल टाइममध्ये पाहण्याची सुविधाही उपलब्ध असेल.
आकर्षक पारितोषिक
या स्पर्धेत विविध गटांसाठी लाखो रुपयांचे आकर्षक पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. स्वच्छ प्रशासकीय विभाग (नगरसेवक गट) मध्ये प्रथम क्रमांकासाठी १ कोटी रुपये, तर इतर गटांमध्येही ५ ते १५ लाख रुपयांपर्यंत बक्षिसे देण्यात येणार आहेत. संपूर्ण स्पर्धेचे मूल्यमापन त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Powered By Sangraha 9.0